Thursday, July 23, 2026
HomeराजकीयOmraje Nimbalkar : नुसत्या चर्चेने मी तीन दिवसांत वाईट झालो का?; ओमराजे...

Omraje Nimbalkar : नुसत्या चर्चेने मी तीन दिवसांत वाईट झालो का?; ओमराजे निंबाळकर यांचा सवाल, घेणार मोठा निर्णय

पुणे । Pune

राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विविध चर्चांच्या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर आपली मौन सोडले आहे. पुण्यातून धाराशिवकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी अत्यंत भावनिक आणि आक्रमक संवाद साधला. “गेल्या तीन दिवसांत केवळ सुरू असलेल्या चर्चांमुळे मी इतका वाईट झालो का? माझ्या कुटुंबाचा उद्धार केला गेला, मला रीलस्टार म्हणून हिणवले गेले. मात्र, मी आता थेट धाराशिवला जात असून, गोवर्धनवाडी येथे कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच माझा पुढील निर्णय जाहीर करेन,” अशी घोषणा ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. आज दुपारी ४ वाजता होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

वडिलांच्या (पवनराजे निंबाळकर) हत्येचा उल्लेख करताना खासदार ओमराजे कमालीचे भावूक झाले होते. ते म्हणाले, “३ जून २००६ रोजी आमच्या कुटुंबाने आणि समद काझी यांच्या परिवाराने जी वेदना भोगली होती, तशीच वेदना न्यायालयाच्या निकालानंतर काल पुन्हा भोगावी लागली. न्यायालयाने हे राजकीय वैमनस्य होते हे मान्य केले, मग माझ्या वडिलांना मारले कोणी? हा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. सामान्य जनता सर्व काही जाणून आहे. जो न्याय माझ्या कुटुंबाला मिळायला हवा होता, तो मिळाला नाही. आम्ही या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात (हायकोर्टात) दाद मागणार आहोत.” वडिलांची हत्या ही पूर्णपणे राजकीय होती आणि एका माणसाला मारून राजकीय विरोधक संपत नाही, हे आपल्याला दाखवून द्यायचे होते, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

गेल्या काही दिवसांत झालेल्या टीकेवर नाराजी व्यक्त करताना ओमराजे म्हणाले, “मी चार दिवसांत कोणताही निर्णय जाहीर केला नसतानाही माझ्या अख्ख्या कुटुंबावर टीका करण्यात आली. ओमराजे ज्यांच्या उपयोगी पडला, तीच माणसे आज घरातील व्यक्तींचा उद्धार करत आहेत. मला ‘रीलस्टार’ म्हणून हिणवले गेले, पण रीलस्टार असलेल्या माणसाला जनता कधी मते टाकते का? जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे आणि मी सामान्य माणूस असल्याने मला कोणत्याही विशेष सुरक्षेची गरज नाही.”

यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी स्थानिक निवडणुकांवरून पक्षातल्याच काही बाबींवर बोट ठेवले. “लोकसभा आणि विधानसभेत पैशांची प्रचंड ताकद असतानाही जनता आमच्या पाठीशी राहिली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रातील एकही पंचायत समिती किंवा नगरपालिका ‘मशाल’ चिन्हावर निवडून येऊ शकली नाही. मी, आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी, सोपल साहेब आम्ही २४ तास जनतेसाठी काम करतो. तरीही आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना, जसे की सोमनाथ गुरव यांना तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले. पराभवाची ही हेटाळणी का झाली, याचा शोध घेणे गरजेचे आहे. माझे कार्यकर्ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे किंवा ड्रग्ज डीलर नव्हते, मग असे का झाले? याच प्रश्नाचे उत्तर मला शोधायचे आहे,” असे ते म्हणाले.

आपल्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. माझी जी काही राजकीय भूमिका असेल ती आजच्या चर्चेनंतर स्पष्ट होईल. परंतु, आदरणीय उद्धवजी, आदित्यजी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबाबद्दल माझ्या मुखातून कधीही अवाक्षर निघालेले नाही आणि निघणारही नाही. माझी एक खोटी मुलाखत छापून आली, मी जे बोललोच नाही ते छापल्या गेल्याने मला अत्यंत दुःख झाले आहे.” खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या या स्पष्टोक्तीनंतर आणि आज कार्यकर्त्यांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर धाराशिवच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

ताज्या बातम्या

Rahata : दारणा, गंगापूर आणि कडवा धरणही ओव्हरफ्लो

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता व कोपरगाव तालुक्यांच्या शेतीचे भवितव्य अवलंबून असणार्‍या नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर धरणाच्या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने दारणा, गंगापूर, कडवा, भावली,...