Friday, May 3, 2024
Homeधुळेसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक

सोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक

उसनवार दिलेले पैस मागितल्याचा राग; दिवसभर तणाव; नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

सोनगीर  – 

उसनवार दिलेले पैसे परत मागितल्याचा राग येऊन तिघांनी एकास जिवंत जाळले. जळालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत मृत व्यक्तीच्या मृत्यूपूर्व जबाबावरून सोनगीर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून  पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण होते.

- Advertisement -

दरम्यान मृताचे नातेवाईक व अन्य लोकांनी सोनगीर पोलीस ठाण्याच्या आवारात काही काळ ठिय्या आंदोलन करून  आरोपींना तत्काळ शासन करावे, अशी मागणी लावून धरली होती. अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांनी जमावाला शांत करत पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. या प्रकरणात आरोपींना तत्काळ शासन होईल, यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला.

सोनगीर फाट्याच्या पुढे दोंडाईच्या रस्त्याला लागून असलेल्या बंद पडलेल्या भांड्यांच्या कारखान्याच्या पडीत जागेवर अंधारात कोणीतरी अज्ञात व्यक्ती जळत असून तो वाचण्यासाठी आरडाओरड करत असल्याची माहिती दि. 17 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सोनगीर पोलिसांना फोनव्दारे कळविण्यात आली. त्यानंतर एपीआय प्रकाश पाटील यांच्यासह सहकार्‍यांनी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी धाव घेऊन सदर व्यक्तीला उपस्थित इतर व्यक्तींच्या सहाय्याने मिळेल त्या साधनांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावर लागलेली आग विझविली. सदर व्यक्ती गावातील चिंच गल्लीत राहणारा नंदू आधार पाटील  (वय 41) असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी आपणास गावातील घनश्याम नाना गुजर व इतर दोन व्यक्तीने येथे बोलावून पेटवून दिले, असे त्याने पोलिसांकडे सांगितले. दरम्यान गंभीर भाजलेल्या नंदू पाटील यास पोलिसांनी 108 रुग्णवाहिकेत द्वारे धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. नंदु पाटील यांचा मृत्यूपूर्व जबाब नोदंविण्यात आला होता. त्यानुसार सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सोनगिर फाट्यावर मला घनश्याम गुजर भेटला असता, माझे पैसे परत कर यासाठी मी त्याच्याकडे तगादा केला. त्यावेळी घनश्यामने त्याच्या मोटर सायकलवर मला बसवले व तुला पैसे देतो, असे सांगून दोंडाईचा रस्त्याजवळ सब स्टेशन जवळ मोटरसायकल थांबून मला उतरवले. आमच्यात वाद सुरू झाला असता दोन अज्ञात अनोळखी इसम मोटरसायकलवरून तेथे आले.  तिघांनी मला मारहाण केली  घनश्यामने गाडीच्या डिक्कीतून पेट्रोलची बाटली काढून अंगावर टाकून पेटवून दिले. त्यानंतर तिघे मोटरसायकलवरून पळाले, असा जबाब नंदू पाटील याने नोंदवला आहे. यावरून सोनगीर पोलिसात रात्री तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

90 टक्के भाजलेल्या नंदू पाटील यांचा उपचार सुरू असतांना पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. घटना रात्री घडली व तिची वार्ता सकाळी गावात पसरली आणि चौकाचौकात या घटनेबद्दल चर्चा सुरू झाली. दरम्यान सोनगीर पोलिसांनी जलद हालचाली करून घनश्याम नाना गुजर व श्रीकांत प्रकाश गुजर, मंगेश गिरीश गुजर यांनाही ताब्यात घेतले.

घटनेतील अमृत नंदू पाटील त्याचा मोठा भाऊ देविदास लहान भाऊ युवराज हे तिघे भाऊ खाजगी वाहन चालवण्याचा व्यवसाय करतात. मृत नंदूचे गावातील अनेकांशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते.

नातेवाईक संतप्त, पोलिस ठाण्यात ठिय्या

खूनाच्या घटनेची माहिती मिळतात येथील चिंच गल्ली, पाटील गल्ली परिसरात तणाव पसरला. नंदू पाटील याचे धुळे येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी बारा वाजेच्या सुमारास नंदू पाटीलच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेले नातेवाईक व गावातील काही लोकांनी गर्दी करून सोनगीर पोलीस ठाणे गाठले. तेथे आरोपींच्या विरोधात घोषणा दिल्या. नंदू पाटीलला न्याय द्या, आरोपींना तत्काळ शिक्षा करा, अशी मागणी लावून धरत ठिय्या दिला. हे ठिय्या आंदोलन सुमारे एक तास सुरू होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, सोनगीरचे एपीआय प्रकाश पाटील यांनी संतप्त जमावाची समजूत काढून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे जमाव शांत झाला. व  अंत्ययात्रेसाठी रवाना झाला.

वस्तीत तणाव 

वस्ती शेजारी शेजारी असल्याने घटनेतील मृत नंदू पाटील हा चिंच गल्ली, पाटील गल्ली या भागातील राहणारा होता. तर संशयित आरोपी चिंच गल्लीला लागून असलेल्या गुजर गल्लीतील राहणारे आहे. यामुळे शेजारी शेजारी असलेल्या दोन्ही वस्तीत तणाव पसरला आहे.

घटनास्थळाची पाहणी 

नंदू पाटील ज्याठिकाणी जळत होता. त्या भांड्यांच्या कारखान्याच्या पडीत जागेची अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी पाहणी करून तपासी अधिकारी एपीआय प्रकाश पाटील यांना मार्गदर्शक सूचना केल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश पाटील तपास करीत आहेत.

संतप्त महिलांचा आरोपीच्या घरावर हल्ला

नंदू पाटील यांची अंत्ययात्रा आटोपून परत येत असलेल्या काही संतप्त महिलांनी गुजर गल्लीतील संशयित आरोपींच्या घरावर हल्ला केला. एका आरोपीच्या घरात घुसून घराची घरातील सामानाची नासधूस केली. वेळीच पोलीस पोचल्याने तोडफोड करणार्‍या महिला पांगल्या. यामुळे गुजर गल्ली परिसरात तणाव पसरला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या