Friday, February 6, 2026
Homeनगरसात तालुक्यात होणार कांदा लागवडीची तपासणी

सात तालुक्यात होणार कांदा लागवडीची तपासणी

13 हजार हेक्टरवर लागवड असतांना 20 हजार 626 हेक्टरचा विमा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात खरीप हंगामात कांदा पिकाची 12 हजार 986.4 हेक्टरवर लागवड झालेली असतांना प्रत्यक्षात 20 हजार 626.42 हेक्टर कांदा पिकाचा विमा उतरवण्यात आलेला आहे. यामुळे कृषी आयुक्तालयाच्या आदेशानूसार जिल्ह्यातील सात तालुक्यात प्रत्यक्षात झालेली कांदा लागवड आणि पिक विमा क्षेत्र याची संबंधीत शेतकर्‍याच्या शेतात जावून तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत आदेश जिल्हास्तरावरून कृषी विभागाने तालुका कृषी विभागाला दिले आहेत.

- Advertisement -

चालू वर्षीच्या खरीप हंगामात नगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव आणि पाथर्डी या तालुक्यात 12 हजार 986.4 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झालेली असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडे आहे. याच काळात 20 हजार 626.42 टेक्टरवरील कांदा पिकाचा पिक विमा उतरवण्यात आलेला आहे. सरकारच्यावतीने दोन वर्षापासून एक रुपयात पिक विमा योजना राबवण्यात येत आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत गेल्या दोन वर्षांपासून शेतकर्‍यांना केवळ एक रुपयात या योजनेत सहभागी होता येते. शेतकर्‍यांच्या विमा हप्त्याची रक्कम राज्य सरकार भरते, त्यासोबत विमा उतरवितांना शेतकरी स्वतःच पिकाची नोंद करतो व यावेळी विमा उतरविलेल्या पिकाची कोणतीही पडताळणी होत नाही. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास विमा उतरवलेल्या क्षेत्रानुसार शेतकर्‍याला नुकसान भरपाई मिळते. याचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

YouTube video player

दरम्यान, अन्य पिकांच्या तुलनेत कांदा पिकाला जादा नुकसान भरपाई आहे. हेक्टरी 80 हजार रुपयांची भरपाई मिळते. यामुळेच कांदा पिकाचे पिक विमा उतरवण्यात बनवेगीरी करण्यात येत असल्याचा असल्याचा संशय विमा कंपन्यांनी कृषी आयुक्तालयाकडे केला आहे. नगर, नाशिक, पुणे, धुळे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर व बीड या जिल्ह्यात हा प्रकार झाल्याचा संशय आहे. याबाबत कृषी आयुक्तालयाकडे तक्रार आल्यानंतर राज्याच्या कृषी विभागाकडून याबाबत जिल्हास्तरावर संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पीक विमा योजनेत विमा उतरविलेल्या पिकाच्या क्षेत्राची तपासणी होत नसल्याने, तसेच कांदा पिकाला सर्वाधिक नुकसानभरपाई मिळत असल्याने असे प्रकार होत असल्याचे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

कांदा पिकाची विमा संरक्षित रक्कम सर्वाधिक 80 हजार हेक्टर आहे. पिकाच्या नुकसानीच्या 50 टक्के नुकसानभरपाई मिळाली, तरी ही रक्कम अन्य खरीप पिकांच्या तुलनेत जास्त आहे, तसेच कोणत्याही पिकाचे विमा संरक्षण घेतले, तरी राज्य सरकार विम्याच्या हप्ताच्या 100 टक्के रक्कम भरते. त्यामुळे शेतकरी शेतात कांदा पीक नसतानाही विमा उतरवत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. यामुळे आता जिल्ह्यातील सात तालुक्यात कांदा पिकाच्या लागवडीची पडताळणी करणार आहे. यात प्रत्यक्षात विमा उतरवलेल्या शेतकर्‍याच्या शेतात जावून कांदा पिक आहे की नाही याची तपासणी तालुका पातळीवरील कृषी विभागाचे अधिकारी करून याबाबतचा अहवाल जिल्हा कृषी अधिक्षक यांना पाठवणार आहेत.

लागवड व विमा
संगमनेर 2 हजार 343 हेक्टर (4 हजार 622.18 विमा) 197.28 टक्के जादा
श्रीरामपूर 3.40 हेक्टर (100.6 विमा) 2 हजार 960.59 टक्के जादा
राहुरी 112 हेक्टर (832.92 विमा) 743.68 टक्के जादा,
नेवासा 275 हेक्टर (1 हजार 244. 93 विमा) 452.70 टक्के जादा,
श्रीगोंदा 6 हजार 309 हेक्टर (8 हजार 855.33 विमा) 140.36 टक्के जादा,
कोपरगाव लागवडीची माहिती उपलब्ध नाही (224)
पाथर्डी 3 हजार 944 हेक्टर (4 हजार 746.28 विमा) 120.34 टक्के जादा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...