अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येथील मार्केट यार्डातील एका कांदा व्यापार्याची आंध्र प्रदेशातील व्यापार्याने तब्बल 81 लाख 67 हजार 240 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. कांद्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करूनही उर्वरित रक्कम न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित व्यापार्याने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी चौकशीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विकास किशोर वाघ (वय 35, रा. वाघगल्ली, नालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. वाघ हे अहिल्यानगर मार्केट यार्ड तसेच नेप्ती नाका येथील कांदा बाजारात खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची आंध्र प्रदेशातील श्रीनिवास ट्रेडर्सचा मालक परमात्मा मारीशेट्टी याच्याशी ओळख झाली. या ओळखीच्या व परस्पर विश्वासाच्या आधारे नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत वाघ यांनी मारीशेट्टी याला मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री केली.
या कालावधीत 2 कोटी 29 लाख 68 हजार 251 रुपयांचा कांदा माल ट्रान्सपोर्टद्वारे आंध्र प्रदेशात पाठवण्यात आला. सुरुवातीला व्यवहार सुरळीत सुरू असल्याने वाघ यांनी पुढील मालही पाठवला. मात्र, मारीशेट्टी याने या रकमेपैकी केवळ 1 कोटी 48 लाख 1 हजार 11 रुपयेच अदा केले. उर्वरित 81 लाख 67 हजार 240 रुपये देण्यास त्यांनी वारंवार टाळाटाळ केल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे.
पैसे कधी देतो, कधी देतो असे सांगत वेळकाढूपणा सुरू ठेवण्यात आला. त्यामुळे संशय बळावल्याने वाघ यांनी थेट आंध्र प्रदेशातील श्रीनिवास ट्रेडर्सचे कार्यालय गाठले. तेथेही मारीशेट्टी यांनी तीन महिन्यांच्या आत संपूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले. मात्र, तीन महिने उलटूनही पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर पुन्हा संपर्क साधल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येऊ लागली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने वाघ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी परमात्मा मारीशेट्टी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास पोलीस करत आहेत. व्यवहारात वाढत चाललेल्या फसवणुकीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.





