अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मोबाईलवरील ग्रिंडर अॅपव्दारे अनोळखी व्यक्तीशी मैत्री प्रस्थापित करून तिला भेटण्यासाठी निर्जनस्थळी बोलावून मारहाण करीत लुटमार करणार्या तिघांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपींकडून दुचाकी, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 2 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथील एका व्यक्तीने कोतवाली पोलीस ठाण्यात 5 सप्टेंबर रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीशी आरोपींनी मोबाईलवरील ग्रिंडर अॅपच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी लिंक रोड, केडगाव येथे भेटण्यासाठी फिर्यादीस बोलावण्यात आले. त्यानुसार फिर्यादी तेथे गेले असता आरोपींनी संगनमत करून त्यांना मारहाण केली. एकूण 12 हजार 500 रूपयांची रक्कम बळजबरीने काढून घेतली.
पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान हा गुन्हा यश मनोज भिंगारदिवे (वय 21, रा. संजयनगर, श्रीरामपूर), सिध्दांत दत्तात्रय जगताप (वय 22) आणि सुमित संजय गायकवाड (वय 22, दोघे रा. इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन, अहिल्यानगर) या तिघांनी केल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना शिताफीने अटक केली.




