Tuesday, September 1, 2026
Homeराजकीयठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची...

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

मुंबई । Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची दारे उघडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. फुटीचे आणि राजकीय उलथापालथीचे केंद्र ठरलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या गटाला जबर धक्का देण्याच्या तयारीत असून ‘ऑपरेशन टायगर पार्ट २’ सक्रिय झाल्याच्या बातम्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील २० आमदारांपैकी तब्बल १४ आमदार सध्या एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. यापूर्वी ठाकरे गटाचे ६ खासदार आपल्या गोटात खेचून ‘ऑपरेशन टायगर’चा पहिला टप्पा यशस्वी करणाऱ्या शिंदेंनी आता आमदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. या १४ आमदारांना पक्षात आणण्याची आणि ऑपरेशन पार पाडण्याची जबाबदारी शिंदेंनी आपल्या मंत्रिमंडळातील कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन वजनदार मंत्र्यांवर सोपवल्याचे समजते.

या ऑपरेशनमध्ये समाविष्ट असलेल्या आमदारांपैकी काहींनी सरकारमध्ये महत्त्वाच्या खात्यांची आणि मंत्रिपदांची मागणी केली आहे, तर काहींना विविध शासकीय महामंडळांचे अध्यक्षपद किंवा राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ही बोलणी अंतिम टप्प्यात असून, आगामी नवरात्रौत्सवापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय विस्फोट घडून येऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी २ वाजता तातडीने दिल्ली दौऱ्यावर रवाना होत आहेत. विशेष म्हणजे, शिंदे यांचा हा दिल्ली दौरा अत्यंत गुप्त आणि ‘रिझर्व्ह’ स्वरूपाचा ठेवण्यात आला आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर ते भाजपच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत.

त्याचप्रमाणे, २ सप्टेंबरपासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हांबाबतची अंतिम सुनावणी पुन्हा सुरू होत आहे. या सुनावणीच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात पक्षाची बाजू मांडणाऱ्या दिग्गज वकिलांच्या टीमसोबतही शिंदे दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार नाहीत.

दुसरीकडे, मुंबई महापालिकेवर आपला भगवा फडकवण्यासाठी शिंदे गटाची नजर ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांवरही आहे. आधी खासदार, मग आमदार आणि आता नगरसेवक अशा तिहेरी रणनीतीमुळे ठाकरे गटाला मोठे भगदाड पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता ‘ऑपरेशन टायगर पार्ट २’ खरोखरच यशस्वी ठरून ठाकरे गटाला नव्याने हादरा बसणार की ठाकरे गट यातून सावरणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Cabinet Meeting Decisions : मंत्रिमंडळ बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय!

0
मुंबई । Mumbai आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार...