Tuesday, December 10, 2024
Homeमहाराष्ट्रलक्ष्मण हाकेंच्या भेटीला आलेल्या वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावरुन फोन; म्हणाले….

लक्ष्मण हाकेंच्या भेटीला आलेल्या वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावरुन फोन; म्हणाले….

जालना | Jalana
गेल्या ८ दिवसांपासून ओबीसी आरक्षण बचावाची मागणी करत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत. याठिकाणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. आज वडेट्टीवारांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यावेळी ओबीसी समाजाच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत विजय वडेट्टीवारांनी व्यासपीठावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्याच (21 जून) त्या ठिकाणी शिष्टमंडळ पाठवत असल्याचे सांगितले. ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी ओबीसीच्या लढ्याच्या पुस्तकात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे नाव लिहिले जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. सरकारने भावनांची कदर करावी, असेही त्यांनी उपोषणस्थळी बोलताना सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, वडेट्टीवार यांनी फोनवरून मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी मंत्र्यांना पाठवा, या हजार लोकांच्या भावना असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलत असताना वडेट्टीवार यांनी फोन थेट स्पीकरवर लावत मुख्यमंत्री काय बोलत आहेत याची माहिती उपस्थितांना दिली.

दरम्यान, ओबीसी समाजाच्या मागण्या समजून घेण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ उद्या पाठवतो, ते उपोषणकर्त्यांची चर्चा करतील असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवारांच्या फोनवरून दिले आहे. एक ओबीसी समाजात जन्मलेला कार्यकर्ता म्हणून मी ओबीसीच्या पाठीमागे उभे राहावे हे माझे कर्तव्य आहे. ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीतून मी कुठेही मागे येणार नाही. सत्ता आणि पद येत जात असतात. मंत्री असतानाही त्याची पर्वा न करता समाजाच्या पाठीशी उभा राहिलो आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आमच्या हक्काचं हिरावून घेण्याची भीती वाटते असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

दरम्यान, सगेसोयरे मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी उपोषण करत आंदोलन केले होते. त्यांनी सरकारला पुन्हा एकदा अल्टीमेटम दिला आहे. या संदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी गिरीश महाजन यांनी सांगितल्यानुसार न्यायालयात तो मुद्दा टिकणार नाही, तर मग अध्यादेश कशाला काढता? अशी विचारणा केली. जे समाज एकमेकांच्या सुख दुःखामध्ये होते ते आता एकमेकांच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. आम्ही छोट्या जातींमध्ये आहोत म्हणून एकत्र येत नाही. याचा अर्थ तुम्ही आमच्या छातीवर नाचावे असे नसल्याचे ते म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या