अहिल्यानगर |सचिन दसपुते| Ahilyanagar
शहरातील वाढत्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी आता नवीन भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्यातील कलम 111 आणि 112 या प्रभावी तरतुदींचा वापर सुरू केला असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या चार गंभीर गुन्ह्यांमध्ये ‘संघटित गुन्हेगारी’ची वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यास पोलिसांना मोठे बळ मिळाले असून, शहरात गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला आहे.
नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये संघटित गुन्हेगारीसंदर्भात प्रथमच स्पष्ट आणि कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. जुन्या भारतीय दंड संहितेत (आयपीसी) अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर थेट कारवाई करण्यासाठी ठोस तरतूद नव्हती. त्यामुळे अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे टोळीगुन्हे असूनही आरोपींवर प्रभावी कारवाई करण्यात अडचणी येत होत्या. मात्र, बीएनएसमधील कलम 111 आणि 112 मुळे आता पोलिसांना अशा टोळ्यांविरोधात तातडीने आणि अधिक कठोर कारवाई करता येत आहे.
एखाद्या टोळीने किंवा गटाने आर्थिक अथवा इतर फायद्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने सातत्याने गंभीर गुन्हे करणे, हे संघटित गुन्हेगारीच्या व्याख्येत येते. खंडणी उकळणे, धमकी देणे, अपहरण, अवैध तस्करी, चोरी, हिंसक हल्ले किंवा आर्थिक फसवणूक यांसारखे गुन्हे जर टोळीच्या माध्यमातून केले जात असतील, तर त्या प्रकरणात बीएनएसचे वाढीव कलम लागू केले जाऊ शकते. संघटित गुन्हेगारीचे कलम लावण्यासाठी संबंधित टोळीविरोधात मागील 10 वर्षांत किमान तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेले गुन्हे दाखल असणे आवश्यक आहे. त्यापैकी किमान दोन गुन्ह्यांत दोषारोपपत्र दाखल झालेले किंवा न्यायालयाने त्याची दखल घेतलेली असावी लागते. संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हा प्रस्ताव पोलीस उपअधीक्षकांच्या परवानगीने अप्पर पोलीस अधीक्षकांकडे पाठवतात. पडताळणीनंतर अप्पर पोलीस अधीक्षक कलम 111 लागू करण्यास मंजुरी देतात, तर कलम 112 बाबत मंजुरीचा अधिकार पोलीस उपअधीक्षकांकडे असतो.
एकदा संघटित गुन्हेगारीचे कलम लागू झाल्यानंतर संबंधित खटला सत्र न्यायालयात चालविला जातो. या गुन्ह्यांमध्ये किमान पाच वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद असून, न्यायालय आरोपींना 10 लाख रूपयांपर्यंत दंडही ठोठावू शकते. अहिल्यानगर शहरात सध्या चार महत्त्वाच्या प्रकरणांत बीएनएसच्या वाढीव कलमांचा वापर करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात भविष्य सांगण्याच्या नावाखाली वृध्दांना जाळ्यात ओढून फसवणूक करणार्या दोन आरोपींविरोधात संघटित गुन्हेगारीचे कलम लावण्यात आले आहे. तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात चौघांविरोधातही ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तल करणार्या दोघांच्या टोळीविरोधात संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम लागू करण्यात आले आहे. याशिवाय कोतवाली पोलीस ठाण्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करून विक्री करणार्या आणखी एका टोळीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 112 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सलग कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
निर्भय पथकामुळे दिलासा
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भरोसा सेलच्या माध्यमातून ‘निर्भय पथक’ सक्रिय करण्यात आले आहे. शाळा आणि महाविद्यालय परिसरात छेडछाडीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पथक नियमित गस्त घालत आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, छेडछाडीच्या घटनांमध्ये घट झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. शाळा-महाविद्यालय परिसरातील वातावरण अधिक सुरक्षित बनविण्याचा प्रयत्न होत आहे.
नशेखोरांवर वचक
डॉ. टिपरसे यांनी केवळ संघटित गुन्हेगारीवरच लक्ष केंद्रीत न करता शहरातील रात्रीच्या गुन्हेगारीवरही नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. शहरातील 25 ते 30 ब्लॉक स्पॉटवर रात्रीच्या वेळी अचानक भेटी देऊन नशेत फिरणार्या आणि संशयित हालचाली करणार्यांवर कारवाई केली जात आहे. या मोहिमेमुळे गुन्हे करण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘डिबी’तील अंतर्गत राजकारण चिंतेचा विषय
एकीकडे शहर पोलिसांची संघटित गुन्हेगारीविरोधातील मोहीम कौतुकास्पद ठरत असताना, दुसरीकडे गुन्हे शोध पथकातील (डिबी) अंतर्गत राजकारणामुळे तपासकामावर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. शहरातील तिन्ही पोलीस ठाण्यांतील काही अंमलदारांची मक्तेदारी वाढल्याने काम करणार्या इतर कर्मचार्यांना संधी मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. काही अंमलदारांची मुजोरी इतकी वाढली आहे की, इतर अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्यासमोर टिकू शकत नसल्याचे बोलले जात आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून गुन्हे शोध पथक अधिक कार्यक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे.
‘खाकी’ची शिस्तही महत्त्वाची
शहरातील काही पोलीस कर्मचारी कायम सिव्हिल ड्रेसमध्ये वावरत असल्याची बाबही चर्चेचा विषय ठरत आहे. पोलिसांच्या अंगावर खाकी वर्दी असल्यास नागरिकांमध्ये विश्वास आणि गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होतो. एखादी घटना घडल्यास वर्दीतील पोलीस तत्काळ हस्तक्षेप करू शकतो. मात्र, सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या कर्मचार्यांवर हल्ल्याचा धोका अधिक असतो किंवा ते घटनास्थळ टाळण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक पोलीस कर्मचार्याने आवश्यकतेनुसार खाकी वर्दीतच ड्युटी करावी, याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.




