मुंबई / प्रतिनिधी Mumbai
महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ७ ऑक्टोबर पर्यंत तब्बल ३७ लाख ९३ हजार ५१ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी दिली.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा, २०२६’ विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानुसार महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख, समान अधिकार आणि सरकारी कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकरी महिला प्रमाणपत्र देण्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे.
राज्यातील ८९५ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन ६८ हजार ४३६ महिलांना शेतकरी महिला प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. ग्रामसभा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांमध्ये शेतकरी महिलांना प्रमाणपत्र वितरित केले जाते. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात नोंदणी होत आहे, अशी माहिती भरणे यांनी दिली.
सर्वाधिक अर्ज प्राप्त झालेले जिल्हे
यवतमाळ ………२ लाख ५३ हजार ४३९
सातारा…………२ लाख १४ हजार ७८७
नाशिक ………….२ लाख १० हजार ३२७
पुणे………………१ लाख ७३ हजार ४९




