Friday, June 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : पक्षांतरातील लाडके अन् दोडके !

पडसाद : पक्षांतरातील लाडके अन् दोडके !

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

महापालिका निवडणुकीस आता अवघे पाच दिवस राहिलेले असले तरी अजूनही हवा तसा वेग प्रचाराने घेतलेला दिसत नाही. राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभांना सुरुवात झाल्याने आता निवडणुकीत रंग भरत जातील. परंतु, अद्याप कोणीही नाशिकच्या मुलभूत प्रश्नांना हात घातलेला नाही. नाशिककरांना नेमके काय हवे याची कोणालाही फिकीर पडलेली नाही. भारतीय जनता पक्षाने तर अमृतवचन नावाने जाहिरनामा प्रसिद्ध करून सिंहस्थाच्या आयोजनावरच अधिक भर दिलेला दिसतो. शब्दच्छल करण्यात भाजप नेत्यांएवढे माहीर कोणीच नसतील. सर्वांचे वचन वा जाहीरनामे तर भाजपचे काय तर अमृतवचन.

- Advertisement -

आपण सर्वांपेक्षा दोन अंगुळं वर असल्याचा हा अहंकार नव्हे तर काय. बरं अमृतवचन कोणी द्यावे, ज्यांनी पक्षातील जुन्या जाणत्या, निष्ठावानांना दूर लोटून भ्रष्ट, गुंड वा नामचीन गुन्हेगारांना पक्षात घेऊन आम जनतेचीही फिकीर न करता उमेदवारी देऊ केली अशा पक्षाने अमृतवचन शब्द देखील खरे तर उच्चारू नये. हिंदू संस्कृतीचे जर ते खरोखरच पुरस्कर्ते असतील तर अमृताचा असा अपभ्रंश करणे तरी योग्य नाही. राज्यातील इतर महापालिकांमधील बंडखोरांना पक्षातून बाहेरचा मार्ग दाखविला जात असताना नाशिकमधील दोन डझनावर बंडखोरांना मात्र अजूनही गोंजारले जात असल्याबद्दल पक्षातच संभ्रम आहे. याचाच अर्थ काही ठिकाणी पक्षापेक्षा बंडखोर विजयी होण्याची त्यांना अधिक खात्री वाटत असावी. कारण, हे बंडखोर असले तरी उद्या निवडून आले तरी आमचेच असतील ना, असे मासलेवाईक उत्तर एका नेत्याने दिले. भाजपने जनाची नाही पण मनाची तरी ठेवावी अशी प्रतिक्रिया एका जुन्या कार्यकर्त्यानेच व्यक्त केली, ती किती रास्त होती याची प्रचिती आली.

बंडखोरांवर कारवाई का केली जात नाही, याचे काही एक कारण संघटनेतील नेते देत नाहीत. परिणामी, अनेक ठिकाणी अधिकृत उमेदवारांची पाचावर धारण बसली आहे. अशीच काहीशी गत त्यांचेच सत्तेतील मित्र असलेल्या पण नाशिकसह काही ठिकाणी विरोधात असलेल्या शिवसेनेची झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेनेदेखील अनेक ठिकाणी ऐनवेळेस पक्षात आलेल्यांना पावन करून घेतले आहे. गंमत म्हणजे ज्यांना भाजपने नाकारले अशांना पक्षात घेऊन शिवसेना काय मिळवू पहात आहे हे कळत नाही. दशरथ पाटील व अशोक मुर्तडक या दोघा माजी महापौरांनी तसेच माजी आमदार नितीन भोसले यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला.

तिघांचेही खरे तर मूळ आणि कुळ तसे शिवसेनेचेच. फक्त आता त्यात शिंदेंच्या शिवसेनेची भर पडली इतकेच. दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम यांनी सात-आठ महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. तरीही त्यांना अगदी अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारली गेली. ती देखील सहा महिन्यांपूर्वी भाजपमधूनच मनसेत गेलेले त्यांचेच काका दिनकर यांच्या पुन्हा स्वगृही आल्याने. याबाबत ना पाटलांना, ना त्यांच्या मुलांना आणि सर्वात महत्वाचे म्हणणे ना भाजप वा शिवसेनेला ना खेद ना खंत. दिनकर पाटील व त्यांचे चिरंजीव अमोल यांना पक्षात येताच उमेदवारी मिळाली तर प्रेम यांनाही पक्षातून बाहेर पडल्यावर शिवसेनेत लागलीच उमेदवारी मिळाली. अशा प्रकरणात कोणी कोणाला बोल लावावा असा प्रश्न पडतो.

नितीन भोसले हे तर एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे दिवसही भाजपमध्ये राहिले नाहीत. म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी (शप) पक्ष सोडला तो त्यांच्या वहिनी वैशाली यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपने अट टाकली म्हणून. या अटीशर्तीमुळे संपूर्ण भोसले कुटुंबीय भाजपात गेले. परंतु तेथे गेल्यावर आपण फसविले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणारेही दुसरे तिसरे कोणी नसून त्यांच्याच वहिनींचे भाऊ, शाहू खैरे हे असल्याचे भोसलेंनीच एका व्हिडीओद्वारे जाहीर केले. त्यामुळे भोसलेंनी शिवसेनेत प्रवेश केला व त्यांना लागलीच त्यांनी उमेदवारीही दिली. अशीच गत अशोक मुर्तडक यांची. त्यांनी मनसेतून उबाठात प्रवेश करून फार दिवस झाले नव्हते. तरीही त्यांच्या मार्गदर्शकांच्या विनंतीनुसार ते सगळे पॅनल भाजपमध्ये गेले. पण त्यांनी अगदी वेचून या माजी महापौरांनाच बाजूला केले. मुर्तडक यांची प्रचंड गोची झाली. त्यांनी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला.

आयताच उमेदवार हाती लागल्याने शिवसेनेने लागलीच त्यांना पुरस्कृत केले. नंतर त्यांनी रीतसर पक्षात प्रवेश केला. या तिघांचेही एका अर्थाने राजकीय वर्तुळ पूर्ण झाले. एकेकाळी सगळेच शिवसेनेत होते. आता पुन्हा ते एक झाले खरे, फक्त त्यांच्या मतदारांना ही पक्षांतराची सवय पचनी पडायला हवी. एकीकडे असे अगदी ऐनवेळी टिळा लावण्याचे उद्योग सुरू असतानाच उबाठातून दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत आलेल्या माजी नगरसविका रंजना बोराडे यांना उमेदवारी दिली खरी; पण त्यांच्या सोबतचे तिघेही अधिकृत उमेदवार हे त्यांना टाळून अपक्षाला सोबत घेऊन फिरत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करूनही फायदा झालेला नाही. लाडकी बहीणही कशी दोडकी होते आणि भाऊ देखील कसे दोडके होतात याचे हे विदारक दर्शन.

ताज्या बातम्या

ऑपरेशन

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमधील शहीदांची नावे पहिल्यांदाच जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi'ऑपरेशन सिंदूर'मध्येभारतीय जवानांनी भीमपराक्रम गाजवत पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली. भारतीय जवानांच्या आक्रमणासमोर पाकिस्तानने अक्षरशः गुडघे टेकले आणि युद्धविरामाची...