नाशिक | शैलेंद्र तनपुरे- सल्लागार संपादक
सध्या नाशिकमध्ये चाललेय तरी काय, या गावोगावीच्या लोकांच्या प्रश्नाने डोके भणाणले आहे. कथित हनी ट्रॅपच्या प्रकाराने दररोज नवनव्या रंगील्या कहाण्या पुढे येत असल्याने त्यावर रवंथ करण्यात अनेक रिकामटेकड्यांचा टाइमपास होत आहे. हे विषयच असे आहेत की भल्याभल्यांना त्यात डोकावसे वाटणे ओघाने आलेच. आंबटशौकिनांना तर त्यात आणखी भर टाकण्याची उबळ येते, परिणामी हा विषय मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच चाललाय. सध्या तर या पलिकडे जगण्याचे आणखीही काही विषय आहेत, याचाही लोकांना विसर पडला की काय असे वाटू लागले आहे.
एकतर हनी ट्रॅप विषय तोंडी लावायला आहेच, त्यातच आता आमदार अन् मंत्र्यांच्या बेताल बडबडीने त्याला फोडणी दिली गेली आहे. कोणी टॉवेल व बनियानवर हाणामार्या काय करते, कोणी भर सभागृहातच रमी काय खेळतोय, गावाच्या पारावर एकमेकांच्या कुळाचा उद्धार करावा तसा विधानसभेत आमदार परस्परांच्या कुलंगड्या काय काढताय, आमदारांचे समर्थक विधिमंडळ आवारातच फ्री स्टाईल मारामारी काय करताय, सारेच सुन्न करणारे! हे असे चालू राहिल्याने लोकांनाही पोटापाण्याच्या समस्या सोडून हा बिनपैशाचा तमाशा पाहूनच ढेकर द्यावासा वाटत असेल.
सामाजिक प्रश्नांचा सारा पायाच आजच्या पुढार्यांनी उखडून टाकला आहे. लोकांना अशा विषयांमध्ये गुंतवून ठेवले की ते आपले हिताचे मुद्दे विसरुन जातात, याचे भान मात्र या मंडळींना नेमके असते. आता बघा ना. अकरावी प्रवेशाचा अगदी साधा रुटीन विषय. दहावीचा निकाल लागून अडीच महिने उलटले. अद्याप अकरावीचे प्रवेशही झालेले नसल्याने वर्ग सुरु होण्याचा प्रश्नच नाही. वयात आलेली मुले तब्बल सत्तर-पंचाहत्तर दिवस रिकामे आहेत. रिकामे डोके सैतानाचे घर असते, असे आपले पूर्वज सांगायचे. आता असे बोलण्याचीही चोरी. पण, ज्यांनी आपल्या भल्याचा वसा घेतलाय अशा लोकप्रतिनिधींनाही या विषयाची काहीही पडलेली नाही. कारण राज्य विधिमंडळाचे अधिवेशन उपरोल्लेखित भलत्याच विषयांनी वाजतगाजत राहिले.
अकरावीचे वर्ग अडीच महिने झाले तरी सुरु झालेले नाहीत. राज्यभरातील साधारण तेरा लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा विषय. पण ना विरोधी पक्षातील, ना सत्तारुढ गटातील आमदारांनी हा विषय चर्चेला घेतला. पहिलीपासून सक्तीचे कोणते विषय असावे की असू नये यावरुन सारे राज्य पेटू शकते. पण महिनोमहिने दहावी उत्तीर्ण विद्यार्थी चकाट्या मारत बसले आहेत, प्राध्यापकांनाही रिकाम्या वर्गात येरझार्या मारण्याशिवाय काम नाही, शिक्षण संस्थाचालकांना या प्राध्यापकांना आता फुकटचा पगार द्यावा लागणार म्हणून पोटात गोळा आलेला असणार. परंतु शिक्षण खाते मात्र ढिम्म आहे. दररोज नवनवी कारणे फेकत आला दिवस ढकलत आहेत. ना आमदारांना, ना शिक्षणमंत्र्यांना याची चिंता! आतापावेतो फक्त दुसरी फेरी पार पडली आहे. अशा किती फेर्या होतील, याचा थांगपत्ता कोणालाही नाही. त्या कधी संपतील हे देखील खात्रीशीर कोणी सांगायला तयार नाही.
सध्याच्या गतीनुसार अकरावीचे वर्ग साधारण सप्टेंबर अखेर सुरु होतील, असे वाटते. समजा, ते तसे झाले तरी मार्चपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा हा प्राध्यापकांपुढे प्रश्न असेल. अशातच दिवाळी तसेच नैमित्तिक सुट्या असतीलच. समजा, त्यांना म्हणजेच सुट्यांनाच रजा दिली तर अनेकांच्या भावना दुखावू शकतील. आमच्याच सणासुदीला असे का म्हणून कोणी अस्मितावादी आला तर या रजाही रद्द होतील. खरे तर करोनाकाळाने बिघडविलेला जीवनव्यवहार आताशा कुठे रुळावर यायला सुरुवात झाली होती. जूनमध्ये सुरु होणारा शैक्षणिक हंगाम पुन्हा त्याचवेळी सुरु होण्याची आशा निर्माण झाली होती. कारण १३ मे रोजीच दहावीचा निकाल लागला होता. त्यानंतरच्या प्रवेशाच्या सोपस्काराला खरा तर किती वेळ लागायला हवा, याला काही ताळतंत्रच राहिलेले नाही. एकाही जाणत्याने हे काय चालले आहे, प्रवेशप्रक्रियेला एवढा वेळ का लागतो आहे असे विचारण्याची आजपर्यंत तसदी घेतली नाही.
मुळात हे असे चिंतेचे विषय आहेत, हेच जर समजत नसेल तर मग सारेच मुसळ केरात जाणार. आपले राज्य कसे देशात पहिल्या क्रमांकावर आहे, परदेशी गुंतवणुकीत कसे आपण आघाडीवर आहोत, आपल्याकडे कसा गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे, अशा गमजा सत्तारुढ मारत असतात. ते जर खरे मानले तर या गुंतवणुकीतून उभ्या राहणार्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याची आपली क्षमता आहे का, याचा किमान विचार तरी आपण कधी करणार आहोत का? आजही परप्रांतीयांच्याच जीवावर ही मनुष्यबळाची भूक भागविणार असू तर आपण आपल्या राज्यातील मुलांच्या भवितव्याशी खेळत आहोत, असे वाटत नाही का? उच्च माध्यमिक शिक्षणाची जर ही अवस्था असेल तर पुढील शिक्षणाचा विचारही करता येणार नाही.
केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे हे प्रवेश होणार असल्यामुळे हा सारा विलंब असल्याचे कारण कदाचित तोंडावर फेकलेही जाईल. पण मग जर आपल्याकडे अशा प्रणालीच्या जलद निर्णयाची तांत्रिक क्षमताच नसेल तर कशाच्या भरवशावर ही केंद्रीय व्यवस्था उभी केली. कोणीतरी हे प्रश्न विचारणार आहेत की नाही. एक आख्खी पिढी केवळ उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी महिनोमहिने फक्त वाट पाहण्यात खर्ची पडणार असेल तर त्यांचे भविष्य ‘रामभरोसे’च राहणार. अर्थात ‘एक लोटा जल सारी मुसीबतोंका हल’ अशा वैचारिक वादळात रमलेल्या विद्यमान पालकांनाही दर सोमवारी शंकराच्या पिंड़ीवर पाणी टाकण्यात समाधान वाटत असेल तर अकरावीचे वा तत्सम शैक्षणिक समस्यांचे काहीही झाले तरी कोणाला फरक पडतो. ‘यथा प्रजा तथा राजा..’ दुसरे काय !..




