Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : नाशिक महापालिकेची पत वाढता वाढता वाढे!

पडसाद : नाशिक महापालिकेची पत वाढता वाढता वाढे!

नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. ‘देशदूत’ – संपादक

सिंहस्थ तोंडावर आला असताना नाशिक शहरात विकासकामांची एकच धूम उडाली आहे. ठिकठिकाणची रस्त्यांसह इतरही कामे एकाचवेळी सुरू झाल्याने नाशिककरांची अडचण होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. रस्ते कामांमुळे उडणारी धूळ, वाहतूक कोंडी, इंधनाच्या धुरांमुळे तसेच कर्णकर्कश हॉर्न वाजविल्यामुळे होत असलेले ध्वनी व वायू प्रदूषण यामुळेही अनेक नाशिककर वैतागलेले आहेत. रस्त्यांच्या कामांमुळे केली गेलेली पर्यायी व्यवस्था पुरेशी तर नाहीच; पण तेथेही काही ना काही कामे सुरू असल्याने लोकांची अवस्था एक ना धड भाराभार चिंध्या अशी झाली आहे. अशातच, पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचा दट्ट्या उगारल्यामुळे संतापात त्याचीही भर पडत आहे. तरीही जी काही कामे होत आहेत, ती सिंहस्थासाठीच्या विकासाचा एक भाग असल्यामुळे लोक चडफडत का होईना पण ती सहन करीत आहेत.

- Advertisement -

अशी सारी स्थिती असतानाच उष्म्याच्या तडाख्यात एखादी मंद वार्‍याची झुळूक यावी आणि तशाही अवस्थेत छान वाटावे असा प्रसंग नाशिक महापालिकेच्या नशिबी आला आहे. थोडक्यात, तमाम नाशिककरांच्याही अर्थातच नशिबात हा योग आला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महापालिकेने हरित रोखे काढण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे लिस्टिंग परवा शेअर बाजारात झाले तेव्हा त्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून सर्वांनाच आनंद झाला. गेल्या डिसेंबरमध्ये अशाच रीतीने पालिकेने क्लीन गोदावरी बाँडच्या माध्यमातून दोनशे कोटी उभारले होते. आता हरित रोख्यांच्या माध्यमातूनही दोनशे कोटी उभारले जात आहेत.

सार्वजनिक बाजारातून अशा रीतीने कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्याची पद्धत तशी नवी नसली तरी महापालिकेसारख्या संस्थांनी तो उभारणे आणि त्याला उत्तम प्रतिसाद लाभणे या स्वतंत्र गोष्टी आहेत. नाशिक महापालिका यात यशस्वी झाली, याबद्दल पालिका प्रशासनाचे अभिनंदन. मुळात, असे कर्जरोखे काढले जातात तेव्हा गुंतवणुकदार संबंधित कंपनी वा संस्थांची आर्थिक पत व रकमेच्या परतीची हमी विचारात घेत असतात. यापूर्वीही काही वर्षांपूर्वी पालिकेने पाचशे कोटींची कर्जउभारणी केली तेव्हाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता तीन महिन्यांच्या अंतराने दोनदा कर्जरोखे काढून पालिकेने चारशे कोटींची उभारणी केली. याचाच अर्थ पतबाजारात पालिकेची आर्थिक पत उत्तम आहे. परतीच्या रकमेची हमी असल्याचा गुंतवणुकदारांमध्ये विश्वास आहे.

अपेक्षित रकमेच्या अधिक पैसा मिळणे ही विश्वासाची हमी असते. पालिकेने ती कमावलेली दिसते, यात खरा आनंद आहे. आपण पालिकेच्या बर्‍यावाईट कारभाराबद्दल नेहमीच बोलत असतो, किंबहुना पालिकेतील गैरप्रकारांबद्दलही बरेच काही लिहून येत असते. अशा सार्‍या गोष्टींचा संस्थेच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम होत असतो. सुदैवाने नाशिक महापालिकेबाबत असे काही घडलेले नाही. गुंतवणुकदारांनी इतर कोणत्याही मुद्यांकडे लक्ष न देता कर्जरोख्यांमध्ये विश्वासाने गुंतवणूक केली, हा पालिकेत काम करणार्‍या प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामाचाही गौरव आहे. हे बाँड शेअर बाजारात लिस्टिंग करतानाच्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महापालिकेप्रमाणेच असे इनोव्हेटिव्ह फंड उभारून विकासाला निधीचे बळ देण्याचे आवाहन केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर नाशिकचा आदर्श घेऊन इतर पालिकांनीही पुढे आल्यास एक हजार कोटींपर्यंत निधी उभारणी करता येऊ शकतो, त्यासाठी केंद्राने अर्थसंकल्पातच तशी तरतूद केल्याचे सांगितले.

प्रथम खासगी व आता सार्वजनिकरित्या असे दोन्ही कर्जरोखे जारी करून नाशिक महापालिकेने भांडवली बाजारात प्रवेश केला, याबद्दल सरकारतर्फे अधिकृतरित्या आनंद व्यक्त करण्यात आला. पालिकेच्या या उपक्रमामुळे याकरिता देण्यात येणारे प्रोत्साहन मूल्य देखील दोनशे कोटींपर्यंत वाढविण्यात आले आहेत. पालिकेच्या या अर्थसाक्षरतेमुळे केंद्र शासनाच्या प्रोत्साहन मूल्य आणि अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून नाशिक महापालिकेला यापुढे बिनव्याजी पैसे मिळणार आहेत. हा तर बोनस झाला. मराठीत ‘धिटाई खाई मिठाई’ अशी एक उक्ती आहे. नाशिक महापालिकेने अल्पावधीत दोन पद्धतीचे बाँड काढून दाखविलेल्या धिटाईने त्यांना राज्य व केंद्र शासनाच्या धोरणात्मक पाठिंब्याची मिठाई मिळवून दिली आहे. या रोख्यांद्वारे उभारलेल्या निधीचा विनियोग सार्वजनिक हिताच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी केला जाणार आहे. शहरी विकासातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठीही त्याची मदत होऊ शकेल.

पत बाजारात एकदा अशी विश्वासार्हता निर्माण झाली की मग वारंवार निधी उभारण्यासाठी फारशी अडचण येणार नाही. खरे तर मधल्या काळात प्रशासकीय राजवट असल्यामुळे आर्थिक शिस्तीला एक दिशा मिळाली. त्याचा हा परिपाक निश्चितच आहे. आयुक्त मनीषा खत्री यांच्या कार्यक्षम व कठोर निर्णय प्रक्रियेमुळे हे शक्य झाले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आर्थिक शिस्त ही अशा सार्वजनिक संस्थांच्या मजबूत पायाभरणीसाठी अत्यंत उपयुक्त असते. आज नाशिक महापालिकेने ती स्थिती मिळविली असली तरी आता लोकप्रतिनिधींच्या काळात तीच विश्वासार्ह आर्थिक शिस्त पाळणे गरजेचे ठरणार आहे. सुदैवाने महापौर हिमगौरी आहेर-आडके या संस्था व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकार असल्याने त्यांची योग्य व दिशादर्शक साथ प्रशासनाला मिळेल आणि त्याचमुळे येत्या काही महिन्यात नाशिकचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, अशी आशा.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...