नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादकीय
वेदनेला जात, पात, धर्म किंवा रंग नसतो, ती केवळ मानवी दुःखाची भाषा बोलते. शारीरिक असो वा मानसिक, वेदना प्रत्येकाला सारखीच बोचते, हे वैश्विक सत्य असले तरी अलीकडे हीच वेदना देखील जातीपातीत वा धर्माधर्मात वाटली जाऊ लागली आहे. हल्लीच्या पुढार्यांनी तर वेदनेचीच टिंगल टवाळी चालविली आहे. आमचा तो बाळ्या व दुसर्याचे ते कार्टे असे वेदनेबाबतही चालू झाले आहे.
नाशिकमध्ये सध्या लैंगिक, मानसिक वगैरे शोषणाच्या ज्या काही घटना उघडकीस आल्या आहेत, त्यात हा भेदभाव प्रकर्षाने पुढे आल्याने त्याची दखल घ्यावी लागते आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाच्या भयंकर घटना पुढे आल्या, नंतर रवींद्र एरंडेच्या साधारण त्याच आशयाच्या भानगडी बाहेर आल्या. लागलीच काही दिवसांनी एका बहुराष्ट्रीय कंपनीतील अशाच छळ व शोषणाच्या घटनांची पुनरावृत्ती झालेली पहावयास मिळाली.
एकीकडे नाशिकमध्ये हे काय चालले आहे, याची उत्तरे देताना नाशिककरांना नको नको झाले होते. आता त्यात एका नवीनच प्रश्नावलीने भांबावलेपण आले आहे. खरात प्रकरण घडले, त्यात राजकीय मंडळींचा विशेषत्वाने सहभाग राहिल्यामुळे असेल; पण नाशिकच्या एकाही लोकप्रतिनिधीने त्याविरोधात ना आवाज उठविला ना निषेधाचे दोन शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. पैकी देवयानी फरांदे, सीमा हिरे व सरोज अहिरे या तीन आमदार महिला असल्याने खरातच्या वासनेला बळी पडलेल्या पीडितांची बाजू घेऊन त्या भगिनींना न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांना वाटले नाही. नंतर घडलेल्या एरंडे प्रकरणात तर पीडिता या अत्यंत गोरगरीब घरातील आहेत. त्यांनाही दिलाशाची गरज होती. त्याबाबतही या लोकप्रतिनिधींनी कानावर हात ठेवले. एवढेच नव्हे तर त्यांच्या राजकीय पक्षांनीही दोन हात दूर राहणेच पसंत केले.
या दोन घटनांपैकी खरात प्रकरणात राजकीय महिलेचा समावेश दिसत असल्याने सुषमा अंधारे, अंजली दमानिया, रुपाली ठोंबरे पाटील आदी राज्यस्तरीय महिला नेत्यांनी जोरदार आवाज उठविला. परंतु, याच नेत्यांनी नंतर उघडकीस आलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीतील महिलांचे जबरदस्तीने धर्मांतर, छळ व शोषण याबाबत चकार शब्द काढला नाही. अंधारे या ठाकरेंच्या शिवसेनेच्या, रुपाली ठोंबरे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तर अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. बहुराष्ट्रीय कंपनीतील प्रकरण हे धर्मांतराशी संबंधित आहे. त्यात मुस्लीम तरुणांनी केलेल्या हिंदू तरुणींच्या छळाचा भाग असल्याने भारतीय जनता पक्षाला लागलीच त्यात फार मोठी संधी वाटली.
लागलीच नाशिकच्या नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी कंपनी कार्यालयावर धडक मोर्चा नेत बराच गोंधळ घातला. या मंडळींची ही प्रतिक्रिया अवास्तव नव्हती. ती रास्तच होती. परंतु, मग खरात व एरंडे प्रकरणातही महिलांचे झालेले लैंगिक शोषण त्यांना दिसले नाही का? तेव्हा कोणीही साधा निषेधाचा सूरही लावला नाही. तीनही महिला आमदारांनी तर जणू आपला काय संबंध, अशा आविर्भावात या विषयाची बोळवण केली. परंतु, ठराविक धर्माच्या लोकांचा सहभाग दिसताच, त्यांच्यातील हिंदू शेरनी जागा झाल्या आणि त्यांनी या गंभीर प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. खरात व एरंडे प्रकरणातील पीडिताही हिंदूच होत्या, त्यांनाही वेदना झाल्या असतील हे त्यांना दिसले नाही. संशयित आरोपी हे हिंदू असल्याने त्यांच्या लेखी कदाचित हा अन्याय नसावा. कारण हिंदू हे कोणावरच अन्याय करू शकत नाहीत, अशी धारणा त्यांनी बनवून ठेवली आहे. खरात, एरंडे प्रकरणं डोळ्यासमोर उघडकीस येत असताना त्यांनी डोळे बंद करून घ्यावे ही अत्यंत गंभीर बाब आहे. हीच बाब अंधारे वगैरेंची. त्यांनीही कंपनीतील धर्मांतर प्रकरणी मिठाची गुळणी धरून ठेवली आहे.
या प्रकरणातील व आधीच्या घटनेतील पीडिता या महिलाच आहेत ना? दोन्ही घटनांमधील प्रत्येकीच्या वेदना तर सारख्याच आहेत ना? मग एकावर भाष्य करायचे आणि दुसर्या घटनेवर हाताची घडी तोंडावर बोट हे काय चालले आहे, आपल्या देशात? अन्याय कोण करतो व पीडित कोण यावर यांच्या भावना अन् संवेदना अवलंबून राहू लागल्या आहेत. यानिमित्ताने एका अनाम कवीच्या वेदनेची धग नुकतीच वाचायला मिळाली. ती तशीच्या तशी येथे देत आहे. ती वाचल्यावर तरी संबंधितांच्या बधीर झालेल्या संवेदना जाग्या व्हाव्यात. कवी अनाम असला तरी त्यातील शब्द न् शब्द दांभिक पुरोगामी व स्वयंघोषित धर्मरक्षकांच्या वर्तनावर शाब्दिक कोरडे ओढताना दिसतो. सजग, संवेदनशील माणसांची हताशा अशाने कमी होऊ शकेल.
वेदनेला जातपात नसते
रक्त सारखेच लाल,
वेदना सारखीच लाल.
जात पात धर्म विचारून,
नाही येत ती…
ती येते जेव्हा,
काळीज फाटते,
आणि डोळे पाणावतात.
ती रडताना नाही पाहत,
कोण दलित, कोण सवर्ण?
ती हसताना नाही पाहत,
कोण हिंदू, कोण मुसलमान?
काट्याची टोचणी,
सर्वांनाच वेदना देते.
मृत्यूची सावली,
सर्वांनाच भिवविते.
मग माणसाने का असावे,
माणसापासून दुरावलेले?
वेदनेला जातपात नसते,
ती माणसाची, माणसाशी…
अखंड कहाणी आहे!




