Wednesday, May 7, 2025
Home Blog Page 12316

ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार वाढले; उद्योजकाचे बनावट इ-मेलद्वारे साडेचार लाख लंपास

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

सोशल मीडियाद्वारे आमिषे तसेच बँक खात्याबाबत भीती दाखवून डेबिट कार्ड तसेच बँक खात्याची माहिती घेऊन ऑनलाईन परस्पर पैसे गायब करत गंडा घालण्याच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली असून शहरातील सुशिक्षित वर्गही यास बळी पडत असल्याचे समोर येत आहे. नुकताच शहरातील एका उद्योजगास साडेचार लाख तर एका युवतीस 41 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला.

शहरातील एका उद्योजकास बँकेचा बनावट इ-मेल बनवून त्याद्वारे मेल पाठवत बँक खाते तात्पुरते सस्पेंड केल्याचे भासवून सुमारे साडेचार लाख रुपयांना गंडवल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला.

या प्रकरणी नीलेश पुरुषोत्तम डहाणूकर (39, रा. कॉलेजरोड) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. डहाणूकर यांच्या फिर्यादीनुसार संशयिताने दि. 5 ते 21 नोव्हेंबरदरम्यान हा गंडा घातला. संशयिताने नीलेश यांच्या ओम साई मोल्डस् अ‍ॅण्ड प्लॅस्टिक कंपनीच्या इ-मेलवर बनावट इ-मेल अ‍ॅड्रेसवरून मेेल केले. तसेच तुमचे बँक खाते तात्पुरते सस्पेंड केले जात असल्याचे सांगितले. तसेच नीलेश यांना एका बँक खात्याची माहिती देत त्यात पैसे भरण्यास सांगितले.

त्यानुसार नीलेश यांनी भामट्याने दिलेल्या बँक खात्यात 4 लाख 42 हजार 536 रुपये भरले. त्यानंतर नीलेश यांनी चौकशी केली असता त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

शहरातील एका तरुणीस नोकरी देण्याचे आमिष दाखवून संशयिताने तिच्या बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने 41 हजार रुपये काढून घेतले. संशयिताने तरुणीस फोन करून तिच्यासह बहिणीस नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवलेे. तसेच दोघींच्या बँक खात्याची माहिती घेतल्यानंतर संशयिताने परस्पर पैसे काढून तरुणीस गंडा घातला. या प्रकरणी तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

भद्रकालीत जुगार अड्ड्यावर छापा; सहा जुगारींची धरपकड, विशेष पथकाची कारवाई

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

भद्रकाली परिसरात छापा आज (दि.3) दुपारी मारून पोलीस आयुक्तांच्या अवैध धंदेविरोधी पथकाने सहा जुगारींची धरपकड केली. तर त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व इतर असे साडे अट्टावीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सलीम वसीम शेख (व्दारका), इम्रान इजाज शेख(26, रा. खडकाळी), नितीन पुरुषोत्तम वाडेकर (32, रा. पेठरोड), गजानन नारायण भोरकडे (26, भीमवाडी, भद्रकाली), सुरेश बबन धोत्रे (40, रा. फुलेनगर), गणेश एकनाथ कुमावत (42, र, कुंभारवाडा) अशी पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

भद्रकालीतील तलावाडी परिसरात दुपारीअडीचच्या सुमारास पथकाने ही कारवाई केली. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तलावाडी येथील सादीक मेमन यांच्या नवीन बांधकाम सुरु असलेल्या गाळ्यात हा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कुंदन सोनोने यांच्या पथकाने दुपारी छापा टाकला.

सर्व सहा संशयित यावेळी हे मटका जुगार खेळताना आढळले. त्यामुळे पथकाने या संशयित जुगार्‍यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 28 हजार 594 रुपयांचे जुगाराचे साहित्य, रोकड, मोबाइल असा मु्द्देमाल जप्त केला आहे. तसेच या सहा संशयितांसह सादीक मेमन यांच्याविरोधातही भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस मतदानाला बसणार आळा; मोबाईल नंबर जोडणार मतदार नोंदणी क्रमांकास

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

राष्ट्रीय मतदार पडताळणी मोहिमेअंतर्गत देशभरात मतदारांची घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. बीएलओवर या मोहीमेची जबाबदारी आहे. मतदारांचे मोबाईल नंबर, आधार, पॅनकार्ड, जन्मदाखल्यांसह अत्यावश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करत पडताळणी करावी लागणार आहे. त्यामुळे भविष्यात बोगस मतदानाला आळा बसेल. बीएलओंच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी 10 बीएलओंमागे एक सुपरवायझर नेमण्यात आला आहे.

मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमाअंतर्गत दुबार, स्थलांतरीत, मृत्यू झालेल्या मतदारांची नावे कमी करणे, अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदाराच्या नावांचा समावेश केला जात आहे. काही ठिकाणी बोगस नोंदणी केली जाते. त्यामुळे आयोगाने या सर्वच बाबींवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आता प्रत्येक मतदारांचा मोबाईल नंबर त्याच्या मतदार नोंदणी क्रमांकास जोडला जाणार आहे. त्यावरच त्याला मॅसेजही दिले जातील. त्यामुळे एक व्यक्ती एकच ठिकाणी आपले नाव नोंदवू शकेल.

एका नंबरला एकच खाते उघडता येईल. त्याचे लॉगीन आयडी, पासवर्डही त्याला तयार करावे लागेल. त्यावरच वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येईल. त्यानंतर त्याला लॉगींन करता येईल. त्यामुळे एकापेक्षा जास्त नावांना हा नंबर वापरता येणार नाही. आयोगाने सुरु केलेल्या या उपक्रमात सर्वच मतदारांनी स्वत:हून पुढे येत पडताळणी करुन घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

मतदार पडताळणीचा सुरु करण्यात आलेल्या मोहीमेंतर्गत बीएलओंनी प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक मतदाराची पडताळणी करावयाची आहे. शिवाय आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये त्यांची माहिती भरुन नंतर कुटुंब प्रमुखांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक केले आहे.

जि. प. त अनुकंपा तत्त्वावर 62 जणांना नियुक्तीपत्र

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषद अंतर्गत शासकीय सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सामावून घेण्यासाठी जिल्हा परिषदेत मंगळवारी (दि.3) झालेल्या पडताळणीनंतर 62 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नियुक्तीपत्र देण्यात आली.

जिल्हा परिषदेत 2015 मध्ये अनुकंपा तत्त्वावर भरती झाल्यानंतर चार वर्षांपासून रिक्त झालेल्या जागा अनुकंपा तत्त्वावर भराव्यात यासाठी 296 उमेदवार इच्छुक होते. जिल्हा परिषदेने त्यांची भरती करण्याचा निर्णय करण्यासाठी त्यांच्याकडून शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज मागवले. त्यानुसार त्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली होती. यापूर्वी देखील या उमेदवारांना वेळीवेळी कागदपत्रे छाननीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, कधी मुख्य कार्यकारी अधिकारी नाही तर कधी बैठक घेण्यासाठी वेळच मिळत नसल्यामुळे या बैठका झाल्या नाहीत.

विधानसभा निवडणुकी दरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा उमेदवारांना कागदपत्रे घेऊन बोलवले खरे. मात्र, याच दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने शासनाकडे अनुकंप नियुक्तीच्या अनुषगांने परिचर नियुक्ती संदर्भात मागविण्यात आलेले मार्गदर्शन पत्र प्राप्त झाले. या पत्रात सद्यस्थितीत सर्व जिल्हा परिषदेकडील 2019 मधील पदभरती मध्ये वर्ग-4 ची पदे भरण्यात येत नाहीत. त्यामुळे पदभरतीत समावेश नसलेली पदे अनुकंपा नियुक्तीसाठी ग्राह्य धरता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच ज्येष्ठता सुची तयार करून नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले.

याचाच अर्थ परिचरांना अनुकंपा नियुक्ती प्रक्रीयेत नियुक्ती देता येणार नसल्याचे आदेश देण्यात आले होते. यावर जिल्हा परिषदेने पुन्हा शासनाकडे मार्गदर्शन मागविले असता, त्यावर शासनाने रिक्त जागांच्या 20 टक्के गट क व ड मधून सर्व पदे भरावीत, असा आदेश काढला. पात्र उमेदवारांना मंगळवारी कागदपत्र तपासणीसाठी बोलविण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, महेंद्र पवार, रणजीत पगारे, मंगेश केदारे, किशोर पवार, प्रमोद ढोले, शिवराम बोटे उपस्थित होते.

पदनिहाय नियुक्ती
विस्तार अधिकारी-1
वरिष्ठ सहायक-1
परिचर-18
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-1
आरोग्य सेवक-23
स्थापत्य सहायक-4
शिक्षण सेवक-4
अंगणवाडी पर्यवेक्षिका-1
कंत्राटी ग्रामसेवक-7
पशुधन पर्यवेक्षक-2
एकूण-62

निवृत्तीनाथ संस्थान जमीन विक्रीला स्थगिती द्यावी; विश्वस्तांचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या जमीनींची विक्री केली जाऊ नये, अशी मागणी निवृत्तीनाथ संस्थान विश्वस्तांनी केली आहे. सोमवारी (दि.2) याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले. या प्रकरणी डोईफोडे यांनी प्रातंधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर येथील गट नं. 354 ही जमीन जुन्या दस्तऐवजावरील नोंद बघता इनामी जमिन आहे. ही जमिन निवृत्तीनाथ महाराज मंदिरासाठी असल्याची कागदोपत्री स्पष्ट नोंद आहे. याबाबत देवस्थानच्या पाच विश्वस्तांनी या जमीनीच्या खरेदी-विक्रीबाबत तत्काळ मनाई हुकूम काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी प्राताधिकार्‍यंना या संदर्भात खरेदी विक्रीच्या व्यवहार स्थगीत करण्याच्या सूचना दिल्याचे विश्वस्तांनी सांगितले.

संस्थांनेचे विश्वस्त त्र्यंबक गायकवाड, ललिता शिंदे, पुंडलिक थेटे, जिजाबाई लोंढे, पंडित कोल्हे, रामभाऊ मुळाणे यांनी निवेदन देताना गाव नमुना नं. 3 च्या 1 ते 20 नक्कलीनुसार नोंद वहीतील अनुक्रमांक 14 व 19 अन्वये गट नं. 354 हा देवस्थान इनाम असलेले कागदपत्रे दिली आहेत. तत्कालीन तहसीलदार कार्यालयाने इनाम रद्द करून भोगवटदार 1 नोंद केल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच या जमीनीवरी इनाम रद्द करण्याच्या कारवाईची चौकशी करून संबधित जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारांना मनाई हूकुम करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोणीत श्रीरामपूर येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी चार आरोपी शिरूर, येवल्यातून अटकेत

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

लोणी (वार्ताहर)- रविवारी लोणीत गोळीबार करून श्रीरामपूर येथील तरुणाची हत्या करून पसार झालेल्या सातपैकी चार आरोपींना येवला व शिरूर येथून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. उर्वरित तिघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

रविवार दि. 1 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील हॉटेल साईछत्रमध्ये श्रीरामपूर येथील फरदिन अबू कुरेशी या तरुणावर बंदुकीतून गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील सातही आरोपी पसार झाले होते. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शिर्डीचे विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा ठावठिकाणा शोधला.

पुणे जिल्ह्यातील शिरूर व नाशिक जिल्ह्यातील येवला येथून चार आरोपी जेरबंद करण्यात त्यांना यश आले. संतोष सुरेश कांबळे, सिराज आयुब शेख, शाहरुख शहा पठाण हे श्रीरामपूर येथील तर अरुण चौधरी हा लोणी येथील आरोपी गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत पकडले. उर्वरित उमेश नागरे, अक्षय बनसोड व शुभम कदम या लोणीतील तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

आरोपींना जेरबंद करणार्‍या पथकात पो. हे. काँ. दत्ता हिंगडे, मनोहर गोसावी, अण्णा पवार, शंकर चौधरी, रवींद्र कर्डिले, विजय वेठेकर, संदीप घोडके, संतोष लोढे, संदीप दरंदले, भागीनाथ पंचमुख, योगेश सातपुते, सागर ससाणे, रवींद्र घुंगासे, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ, रवी सोनटक्के, मेघराज कोल्हे, सचिन आडबल, विजय ठोंबरे, मयूर गायकवाड, बबन बेरड आदींचा समावेश होता.सर्व आरोपी लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पकडलेल्या आरोपीपैकी सिराज शेख याच्यावर श्रीरामपूर, अहमदनगर पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. संतोष कांबळे याच्याविरुद्ध ठाणे, पुणे, जेजुरी, राहुरी, संगमनेर येथे सात गुन्हे दाखल आहेत. तर शाहरुख शहा याच्याविरुद्ध पुणे व औरंगाबाद जिल्ह्यात चार गुन्हे दाखल आहेत.

जिल्ह्यातील सोसायट्यांच्या थकीत कर्जांची माहिती शासनाने मागवली

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- सरसकट कर्जमाफी तसेच अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांंना आणखी मदत देण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठका घेत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्राथमिक सहकारी सोसायट्यांकडील 1 ऑक्टोबर 2019 व 31 ऑक्टोबर 2019 अखेरची अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदत कर्जाची येणेबाकी तसेच व्याजाची माहिती त्वरीत शासनाने मागविली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा बँकेकडून सर्व तालुका विकास अधिकार्‍यांना पत्र पाठविले आहे.

ही माहिती 10 डिसेंबर 2019 पूर्वी मुख्य कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही माहिती शासनास अत्यंत तातडीने द्यावयाची असल्याने ती प्राधान्याने द्यावी असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा बँकेचे 1500  कोटींचे कर्ज थकीत

वसुली 39 टक्क्यांवर अडकली, शेतकर्‍यांच्या नजरा संपूर्ण कर्जमाफीकडे

गेल्यावर्षी दुष्काळ आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमुळे जिल्हा बँकेच्या वसुलीला खीळ बसली होती. यंदा देखील ती परिस्थिती कायम आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या 2 लाख 32 हजार सभासद शेतकर्‍यांना 732 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळालेली आहे. मात्र, त्यानंतर देखील जिल्हा बँकेची 1500 कोटी रुपयांची थकबाकी असून आता शेतकर्‍यांच्या नजरा या संपूर्ण कर्जमाफीकडे असल्याने त्याचा परिणाम बँकेच्या वसुलीवर झाल्याचे सांगण्यात आले.

सरकारच्यावतीने देण्यात येणार्‍या कर्जमाफी योजनेचा लाभ थकीत कर्जानूसार देण्यात येतो. गेल्यावर्षी जिल्हा बँकेच्यावतीने 1 हजार 11 कोटी रुपयांचे खरीप तर 41 कोटी रुपयांचे रब्बी कर्ज वाटप करण्यात आले होते. यापैकी दीड लाख, प्रोत्साहनपर आणि दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर तसेच नियमित कर्जाची रक्कम भरल्यानंतर बँकेची विद्यमान परिस्थितीत 1500 कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याची माहिती बँक प्रशासनाने दिली.

मार्च 2019 अखेर बँकेच्या एकूण कर्जाच्या 37 टक्के वसूली झालेली होती. त्यात नोव्हेंबरअखेर अवघी 2 टक्के वाढ झाली असून वसूलीची टक्केवारी 39 टक्क्यांवर अडकलेली आहे. आता राज्यात अस्तित्वात आलेल्या महाआघाडी सरकारने शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करण्यासोबतच संपूर्ण कर्जमाफीची करण्याचा विचार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता शेतकर्‍यांच्या नजरा सरकारच्या निर्णयाकडे लागला आहे. सरकार कर्जमाफीबाबत काय निर्णय घेणार यावर जिल्हा बँकेच्या वसूलीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

साखर कारखानदारीला 2800 कोटींचे कर्ज
जिल्हा बँकेने साखर कारखानदारीला सुमारे 2 हजार 800कोटी रुपयांचे कर्ज दिलेले असून ही साखर गाळप कमी-जास्त झालेले तरी त्याचा या कर्जावर परिणाम होणार नसल्याचा विश्‍वास जिल्हा बँकेला आहे. कारखान्यांच्या साखरेवर बँकेचे नियंत्रण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

2 लाख 46 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अवकाळी पाऊसग्रस्त : शेतकर्‍यांसह प्रशासन दुसर्‍या हप्त्याच्या प्रतीक्षेत

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 135 कोटीच्या रक्कमेचा पहिला हप्ता पाठविण्यात आला होता. या रक्कमेपैकी जवळपास 100 टक्के रक्कम 2 लाख 45 हजार 547 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

दरम्यान, मदतीचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग झाला असून आता शेतकर्‍यांसह जिल्हा प्रशासनाच्या नजरा सरकारकडून पाठविण्यात येणार्‍या दुसर्‍या आणि तिसर्‍या हप्त्याकडे आहेत. मदतीचा दुसरा हप्ता सोमवारीच येणार असल्याचे संकेत प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले होते. मात्र, आता कशामुळे मदतीची प्रक्रिया लांबली हे कोणालाच सांगता येत नसल्याचे चित्र आहे.

नगरसह राज्यात सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नगर जिल्ह्यात 4 लाख 54 हजार हेक्टरवर शेतकर्‍यांचे 449 कोटी रुपयांच्या नुकसानीचा पंचनामा करून जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठविला होता. त्यानुसार राज्य सरकारने या नुकसान भरपाईपोटी 135 कोटी रुपयांचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. या भरपाईच्या रक्कमेची जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्या सुचनेनूसार मराठी अद्य अक्षरांप्रमाणे महसूल मंडल, गावे आणि शेतकर्‍यांच्या नावानुसार वर्गीकरण करून पहिल्या टप्प्यातील भरपाईची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे.

सरकारने जिरायत आणि बागायत भागातील पिकांसाठी सरकट 8 हजार रुपये आणि फळबागांना 18 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मदतीची रक्कम जिल्ह्याला पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यात नगर, जामखेड, नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याचे तहसीलदार यांनी आधी सरकट जिरायत आणि बागायत भागातील शेतकरी यांची निवड करून त्यांना भरपाई दिलेली आहे. यामुळे या तालुक्यातील फळबागा असणार्‍या शेतकर्‍यांना अद्याप मदत मिळालेली नाही. पुढील टप्प्यात या शेतकर्‍यांना मदती देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मदत मिळालेले शेतकरी
नगर 17 हजार 654, अकोले 19 हजार 447, जामखेड 4 हजार 841, कर्जत 13 हजार 393, कोपरगाव 13 हजार 683, नेवासा 23 हजार 724, पारनेर 23 हजार 622, पाथर्डी 33 हजार 987, राहुरी 14 हजार 291, संगमनेर 24 हजार 498, शेवगाव 19 हजार 972, श्रीगोंदा 15 हजार 213, श्रीरामपूर 11 हजार 925 आणि राहाता 9 हजार 306 यांचा समावेश आहे.

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव/यावल – 

कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या किनगाव येथील विवाहितेचा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास निधन झाले.

या महिलेची शस्त्रक्रिया किनगाव ग्रामीण रुग्णालयात झाली होती. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेचे पती गिरीश पाटील यांच्यासह नातेवाईकांनी केला आहे.

गिरीश माधवराव पाटील (रा. किनगाव, ता. यावल) हे टेलरिंगचे काम करतात. त्यांची पत्नी सुनीता गिरीश पाटील (वय 32) व दोन अपत्य भूमिका आणि कुणाल असा त्यांचा परिवार आहे.

गिरीश पाटील यांनी सुनीता यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासाठी किनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात 23 नोव्हेंबर रोजी दाखल केले होते. शस्त्रक्रिया देखील त्याच दिवशी झाली.

सात दिवसांनंतर त्यांच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळे या महिलेस जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात 30 नोव्हेंबर रोजी दाखल केले. मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शस्त्रक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे जखम भरली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला.

यावल पोलिसात नोंद

किनगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत महिलेचे पती गिरीश पाटील यांच्यासह नातेवाईकांनी केला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

कोल्हार येथे एकाच रात्रीत सात घरफोड्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

सुमारे तीन लाखांचा ऐवज व रोख रक्कम लंपास

कोल्हार (वार्ताहर)- कोल्हार येथील बेलापूर रोडवरील लोकवस्तीत एकाच रात्रीत तब्बल सात घरे चार अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे तीन लाखांचा ऐवज व रोख रक्कम घेऊन पलायन केले. सदर घटना रात्री दीड ते साडेतीनच्या दरम्यान घडली.

कोल्हार बुद्रुक येथे बेलापूर रोडवरील राऊत वस्तीवर चोरट्यांनी प्रथम लक्ष्य साधले. मात्र येथे रेखा राऊत व मोहिनी राऊत यांची चोरट्यांशी नजरानजर झाल्याने तेथून चोरट्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर चोरट्यांनी संजय बांगरे यांच्या घरातून रोख रक्कम व सोने असा ऐवज चोरून श्रीगणेशा केला. त्यानंतर चोरटे बेलापूर रोडवरील लोकवस्तीमध्ये घुसले. येथे प्रथम वैशाली रवींद्र गाडेकर यांच्या घराचे कुलूप बाहेरून तोडून सामानाची उचकापाचक केली. मात्र चोरट्यांचा हाती येथे काही लागले नाही. त्यानंतर राहुल बंग, राजस्थानी चौधरी, छाया वाघमारे, येथे चोरटे गेले मात्र येथे चोरीचा प्रयत्न फसला.

त्यानंतर चोरट्यांनी गोविंद नथुलाल शर्मा यांचे घर फोडले येथे मात्र चोरट्यांचे नशीब फळफळले. येथे तब्बल दीड लाखांची रोख रक्कम चोरट्यांना मिळाली. तसेच संजय बांगरे यांच्याकडेही रोख रक्कम व ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. सात घरांत मिळून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे प्रथमदर्शनी समजते.

घटनेनंतर लोणीचे सपोनि प्रकाश पाटील यांनी भेट दिली. त्या नंतर नगरहून श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले. मात्र श्वान पथक पुढे काही अंतरावर घुटमळले. चोरी करणारे चार इसम असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अवघ्या चार दिवसांपूर्वी लकी ट्रेडर्स हे पोलीस स्टेशन लगतचे दुकान चोरट्यांनी फोडून सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबविला होता. त्यानंतर एकाच वेळेस चोरट्यांनी भर लोकवस्तीत सात घरे फोडली. मात्र वारंवार होणार्‍या या चोरीच्या पर्शवभूमीवर लोणी पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिल्याचे समोर येत आहे.