Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 12321

दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिर्डीत रंगीत तालीम

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असलेल्या साईबाबा देवस्थान शिर्डी याठिकाणी दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथकाने शिर्डी शहरात रंगीत तालीम केली. काल दिवसभर अवकाशात एनएसजी कमांडोचे हेलिकॅप्टर घिरट्या घालत असताना शहरातील नागरिकांचे व साईभक्तांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

देशातील सर्वात श्रीमंत दोन नंबरचे देवस्थान म्हणून नावारुपास आलेल्या शिर्डी शहरात वर्षाकाठी 3 ते 4 कोटी भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात. दिवसाला ही संख्या 1 लाखांच्या आसपास आहे. गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथकाने काल सकाळपासूनच अवकाशात हेलिकॅप्टरच्या साह्याने विळखा घालत रंगीत तालीम सुरुवात केली. एनएसजीचे 140 कमांडो शस्त्रास्त्रासह साई मंदिरात तसेच शहरात रंगीत तालीम करणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. ही तालीम शहरात दोन दिवस चालणार असून आज शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी रंगीत तालीम होणार आहे.

श्रीरामपुरात राज्य कुणाचं जनतेचा सवाल, चोर झाले शिरजोर अन् पोलीस कमजोर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरात सध्या भुरट्या चोर्‍या पेट्रोल चोरीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पोलिसांचे या बाबीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्यामुळे श्रीरामपुरात नेमकं राज्य कोणाचं? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहराच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चोर्‍यांच्या घटना वाढल्या आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी घराबाहेर लावलेल्या गाड्यांमधून पेट्रोल चोरी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रारीही करण्यात आहेत. मात्र गुन्हे नोंदवून न घेता सोयीस्करपणे दुर्लक्ष करून पोलीस कारभार सुरू आहे.

त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून पोलीस कमजोर झाले आहेत की काय? असा प्रश्न सध्या शहरात चर्चिला जात आहे. गोंधवणी भागामध्ये जे पेट्रोल चोरीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे ते सर्वश्रुत आहेच, परंतु शहरातील मिल्लतनगर, वार्ड नंबर 2 या भागात गेल्या काही दिवसांपासून गाड्यातील पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर घरातून खिडकीतून मोबाईल चोरून नेण्याचे सुद्धा सत्र सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यात ज्येष्ठ पत्रकार व शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण यांच्या वाड्यातून त्यांचा मोबाईल खिडकीतून चोरीला गेला. तसेच त्यांच्या बंधूंच्या वाहनातील पेट्रोल सुद्धा चोरून नेण्यात आले.

याबाबत पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी आदेश दिल्यानंतर पोलिसांनी 379 कलमान्वये मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला, मात्र त्याबाबत पुढे कोणताही तपास करण्यात आलेला नाही. गुलशन चौक, बजरंग चौक या परिसरामध्ये चोरट्यांचे वास्तव्य असल्याचे पोलिसांना सुद्धा ज्ञात आहे. मात्र या चोरांचा तपास करण्याची तसदी तपासी अंमलदार घेत नसल्यामुळे या भागातील जनतेत नाराजी व्यक्त होत आहे. शुक्रवारच्या आठवडे बाजारातून मोबाईल चोरी होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. परंतु त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. काल-परवा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राम मंदिर चौकातील तीन दुकाने फोडण्याचा धाडसी प्रयत्न चोरट्यांनी केला. यामध्ये फार मोठी चोरी झाली नसली तरी भर बाजारपेठेमध्ये चोर्‍या होत असताना पोलीस काय करतात? हा मोठा प्रश्न आहे.

शहरामध्ये वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झालेला असताना वाहतूक शाखेची गाडी फक्त सायरन वाजवत फिरत असते. सिग्नल व्यवस्था असून अडचण नसून खोळंबा अशा प्रकारची आहे. शिवाजी चौकामध्ये पुलाखालून येणारी वाहने सिग्नल मुळे अडकून पडतात आणि येथे चढ असल्यामुळे एखाद्या गाडीचे ब्रेक फेल झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

पोलिसांची कामगिरी ही सध्या शहरांमध्ये चर्चेचा विषय आहे. दुचाकी चोर्‍यांचे प्रमाण सुद्धा वाढले असून पोलीस आणि चोर यांची मैत्री हा सुद्धा शहरांमध्ये चर्चेचा विषय आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख व अतिरिक्त पोलीस प्रमुख यांनी शहराच्या कायदा व सुव्यवस्था यामध्ये लक्ष घालून चोरट्यांना आश्रय देणार्‍या गृहखात्याच्या यंत्रणेतील घरभेद्यांची चौकशी करावी व शहरातील कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवावी अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

महापोेर्टल बंद करा; छात्रभारतीची मागणी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

संगमनेर (प्रतिनिधी) – पोलीस भरतीच्या व सर्व स्पर्धा परिक्षा महाराष्ट्र शासनाने महापोर्टलद्वारे घेण्याच्या ठरविल्या. मात्र महापोर्टल चालविणार्‍या युएसटी ग्लोबल कंपनीला मध्यप्रदेश सरकारने व्यापम घोटाळ्यात काळ्या यादीत टाकले आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाने सदर महापोर्टल रद्द करावे, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेनी केली आहे.

महापोर्टलद्वारे 1 डिसेंबरपासून महापोर्टलने आखलेले परीक्षांचे नियोजीत वेळापत्रक रद्द करावे व याच परीक्षा एमपीएसीमार्फत घ्याव्यात. महापोर्टल बंद करावे ही मागणी राज्यातील पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाकडे करत आहेत. परंतु मागील सरकारने या प्रश्‍नावर अद्याप कोणताही तोडगा काढलेला नाही. महापोर्टलच्या विरोधात राज्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. परंतु सरकारने त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. विद्यार्थी अनेक वर्षांपासून हजारो रुपये खर्च करुन प्रशिक्षण घेतात, अभ्यास करतात.

मात्र मागील सरकारने पोलीस भरती काढलेली नसताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अवघ्या 3 हजार 400 जागा काढल्या होत्या. इतक्या अल्प पोलीस भरतीच्या जागा काढून सरकारने विद्यार्थ्यांची चेष्टा केली आहे. त्यामुळे सदर महापोर्टल तातडीने रद्द करुन सर्व विभागांची पदे एमपीएससीमार्फत भरण्यात यावीत अशी मागणी छात्रभारती संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले आहे. यावेळी छात्रभारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, गणेश जोंधळे, तुषार पानसरे, शीतल रोकडे, सचिन सानप, कमलेश वराडे, गणेश सानप, विजय भोसले, शिवम शिंदे, विजय कदम, माधव वायकर, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.

रामपूरवाडीत प्रतिकात्मक सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे गाडीत भरते जि.प. शाळा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

राहाता (तालुका प्रतिनिधी) – एखादी शाळा रेल्वेत भरतेय म्हटलं तर विश्वास बसणार नाही. मात्र राहाता तालुक्यातील रामपूरवाडी गावची जिल्हा परिषदेची शाळा चक्क रेल्वेत भरतेय असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. कारण चक्क रेल्वेची प्रतिकात्मक इमारत रंगवून जणू शाळा रेल्वेत असल्याचाच भास होतोय. या शाळेने सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घालून कुतूहल वाढविले आहे. नेमकी कशी आहे शाळा पाहुयात याचा स्पेशल रिपोर्ट.

राहाता तालुक्यातील रामपूरवाडी हे गाव म्हणजे तालुक्याचे शेवटचे टोक. याच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची दयनीय अवस्था झाली होती. त्यात अवकाळी पावसानं झोडपल्यानं शाळेची जुनी इमारत मोडकळीस आली. यानंतर शाळेतील शिक्षकांनी एकत्र येत ग्रामस्थांच्या मदतीनं शाळेचं रूप पालटवण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच रेल्वेची प्रतिकृती असणारी रंगरंगोटी व डागडुजी शाळेला करण्यात आली. शाळेचं रूपच एकदम बदलून गेलं. आज प्रत्येकाला हेवा वाटावा व विद्यार्थ्यांना आकर्षण वाटेल अशी ही शाळा दिसत आहे.

या शाळेतील शिक्षक, पालकांच्या सहकार्यातून आम्ही नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतो. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण होईल. असाच प्रयोग शाळेला रंगरंगोटी करताना घेतला. हुबेहूब दिसणार्‍या रेल्वेगाडीत हे विद्यार्थी चक्क रेल्वेत प्रवेश करतात, असा भास होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास सुसाट सुरू झाला आहे आणि त्याचेच रुपांतर आज रामपूरवाडी एक्सप्रेस झाल्याचे प्रयोगशील शिक्षक वैभव गोसावी यांनी सांगितलंय.

दरम्यान आज शाळेत जाताना घरचे सुद्धा तुझी ट्रेन लेट होईल लवकर जा, असं म्हणून आम्हाला शाळेत पाठवतात, अशा प्रतिक्रिया विद्यार्थांनी दिल्यात. या आनंददायी प्रयोगामुळे विद्यार्थी खुष आहेत. एकीकडे मराठी शाळांचा टक्का घसरतोय, असं म्हटलं जाते मात्र राज्यातील अनेक शिक्षक नवनवीन प्रयोग राबवून शिक्षणाचा दर्जा वाढवताय हे मात्र नक्की. ही आनंददायी संकल्पना सर्वांनाच भावली आहे. हे रामपुरवाडीतील शिक्षकांनी दाखवून दिले आहे.

मराठी शाळांसाठी सरकारने अनुदान दिल्यास मराठी शाळांचा टक्का अजून वाढणार हे मात्र निश्चित, असे पालकांंनी यावेळी सांगितले. वैभव गोसावी, प्रसाद तिकोणे, शिवनाथ गायके, राजेंद्र जगताप या शिक्षक व शाळा व्यवस्थापन कमिटीचे यात मोठे योगदान लाभले आहे. ग्रामस्थांनीही मोठे सहकार्य केल्यानेच हे सर्व घडल्याचे बोलले जाते.

कृषी विभागाच्या परमिटला कृषी सेवा चालकांकडून केराची टोपली

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कोपरगाव (प्रतिनिधी)- खरिपाची पिके अवकाळी पावसाने भुईसपाट झाली. त्यात अडचणीतून कसेबसे सावरून पुन्हा रब्बीसाठी कंबर कसणार्‍या शेतकर्‍यांना कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासन तथा महाबीज अकोला मार्फत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम 2019 अंतर्गत गहू आणि हरभरा बियाणाचे तालुका कृषी विभागाने परमीटचे वाटप केले. त्यानुसार शेतकर्‍यांना माफक दरात बियाणे खरेदी करता येणार होते. मात्र कृषी सेवा केंद्रांच्या आडमुठेपणामुळे कोपरगाव तालुक्यात या परमीटला सध्यातरी केराची टोपली दाखवावी लागल्याची खदखद शेतकर्‍यांत बघायला मिळत आहे.

तालुका कृषी कार्यालयामार्फत वाटप करण्यात आलेल्या परमिटमध्ये कुठल्या बियाणांसाठी सबसिडी देण्यात येणार आहे. असा उल्लेख नव्हता. केवळ चाळीस किलो गव्हाचे बियाणे 1040 रुपये किमतीत लाभार्थींना वाटप करायचे होते. त्यामुळे शेतकरी मागेल त्या वाणाला कृषी चालकांनी सबसिडी दिली नाही. ते पूर्ण रक्कम देऊनच बियाणे खरेदी करावे लागले. एकमेव लोकवन बियाणे परमीटवर नेण्याची सक्ती कृषी केंद्रांकडून लादली जात होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी शे पाचशे रुपयांच्या कटकटीपेक्षा रोख रक्कम देऊन बियाणे खरेदी करून पेरण्या उरकून घेतल्या. याबाबत कृषी विभागानेही कुठलीही कारवाई करून शेतकर्‍यांना न्याय दिलेला नाही. त्यामुळे कृषी विभागाने दिलेल्या परमीटला केराची टोपली बघायला मिळाली आहे. परमीट आणि बिले कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यानंतरच एकूण वाटलेल्या परमीटमधून किती लाभार्थी वंचित राहिले. किती परमीटची रद्दी झाली तो आकडा लवकरच समोर येईल.

तालुका कृषी विभागाने दिलेल्या परमीटवर वाणाचे नाव नसल्यामुळे शेतकर्‍यांनी ज्या वाणाची मागणी केली त्यावर सवलत मिळाली नाही. कृषी विभागाने सुचविलेले महाबीजचे वाणही परमीट देण्यापुर्वीच रोखीने विकून दुकानदार मोकळे झाले. कृषी विभागाकडे शेतकर्‍यांनी तक्रारी करूनही या गैरप्रकाराकडे कानाडोळा करण्यात आला.

अर्धवट जळालेल्या मृतदेहाची कुत्र्यांकडून विटंबना

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नवग्रह मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले विधिपूर्वक अंत्यसंस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी) – अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चित्तेतून बाहेर काढत लांबवर ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत सोमवारी (दि. 2) सकाळी उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. परिसरातील काही तरुणांनी या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा दहनविधी केला. महापालिकेनेही याची गंभीर दखल घेत अमरधाम येथे सुरक्षा कर्मचारी वाढविण्यापासून इतर महत्त्वाचे निर्णय घेतले.

अमरधाम स्मशानभूमीत रविवारी (दि. 1) दिवसभरात सुमारे 13 ते 14 अंत्यविधी झाले. दहन ओट्यांची संख्या कमी असल्याने काही अंत्यविधी ओट्याच्या खाली करण्यात आले होते. रात्री उशीराही एक अंत्यविधी ओट्याच्या खालीच करण्यात आला होता. सकाळी काही नागरिक दशक्रिया विधीनिमित्त अमरधाममध्ये आले असता त्यांना एक अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्रे ओढत नेत असल्याचे दिसून आले. हे पाहून नागरिकांत खळबळ उडाली. अनेकांनी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच नगरसेवकांना फोन करून याबाबतची माहिती दिली. काहींनी पोलिसांनाही कळविले.

याबाबतची माहिती समजताच नवग्रह मित्रमंडळाचे अमोल बनकर व कार्यकर्ते त्याठिकाणी आले. अर्धवट जळालेला मृतदेह भटक्या कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बनकर व त्यांच्या सहकार्‍यांनी सदर अर्धवट जळालेला मृतदेह पुन्हा चितेवर नेवून विधिवत दहनविधी केला. या घटनेमुळे अमरधाममधील सुविधा व सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एखाद्या मृतदेहाची विटंबना संतापजनक बाब असून अमरधाम स्मशानभूमीची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळलेली असल्याने मोकाट कुत्रे व जनावरांचा याठिकाणी नेहमीच वावर असतो. त्यातूनच अशा घटना होत असतात. याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी अजय चितळे यांनी केली.

तर स्वेच्छानिवृत्ती मंजूर करा
यावेळी अमरधाम स्मशानभूमीच्या परिसरात पुन्हा मोकाट जनावरे, भटके कुत्रे दिसल्यास तेथे नियुक्त कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौर वाकळे यांनी दिल्या. उद्यान व विद्युत विभागाचे अनेक कर्मचारी सांगितलेली कामे करत नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौरांनी ज्यांना कामे करायची नाहीत व स्वेच्छानिवृत्ती घ्यायची आहे, अशा कर्मचार्‍यांचे स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज तातडीने मंजूर करण्याच्याही सूचना दिल्या.

विद्युतदाहिनी तातडीने सुरू करणार : महापौर वाकळे
अमरधाममधील मृतदेहाच्या विटंबनेचा प्रकार समजताच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अमरधाममध्ये जाऊन पाहणी केली. तसेच दुपारी तातडीने विद्युत, आरोग्य व उद्यान विभागाची बैठक घेतली. या बैठकीत अमरधाममध्ये करावयाच्या आवश्यक सोयी-सुविधांबाबत मंजूर असलेली 40 लाखांची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच अमरधाममधील बंद असलेली विद्युत दाहिनी तातडीने सुरू केली जाईल. या विद्युतदाहिनीसाठी पूर्वी एक हजार 200 रुपये शुल्क आकारले जात होते. ते आता 900 रुपये आकारण्यात येईल. तसेच मुलतानचंद बोरा ट्रस्टमार्फत आणखी एक विद्युतदाहिनी बसविली जाणार असून तीही लवकरच कार्यान्वित होईल, असेही महापौर वाकळे म्हणाले. बैठकीस उपमहापौर मालनताई ढोणे, उपायुक्त सुनील पवार, डॉ. प्रदीप पठारे, उद्यान विभागाचे शशिकांत नजान, विद्युत विभागाचे पी. एल. शेंडगे, अजय चितळे, संजय ढोणे यांच्यासह मुलतानचंद बोरा ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.

छत्तीसगड येथील भाविकाच्या गाडीची काच फोडून 1 लाख रुपये लंपास

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- चोरट्यांनी शिर्डीत धुमाकूळ घातला असून सोमवारी सकाळी छत्तीसगड येथील भाविकांच्या वाहनाच्या काचा फोडून एक लाख रुपयांसह मौल्यवान वस्तू चोरून नेल्याची घटना घडली आहे. शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील साईभक्त सुजित भट्टाचार्य हे आपल्या 13 साथीदारांंसह साईबाबांच्या दर्शनासाठी खासगी वाहनाने शिर्डीला आले होते. त्यांनी साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्तनिवास येथे रुम घेऊन आपले वाहन संस्थानच्या पार्कमध्ये उभे केले होते. सोमवारी सकाळी रुम चेकआऊट करून सर्वजण साईदर्शनासाठी जात असताना आपल्या वस्तू व सामान त्यांच्या महिंद्रा कंपनीच्या एक्सयुव्ही क्रमांक 2748 मध्ये ठेवून गाडी लॉक करत दर्शनासाठी निघून गेले.

मात्र दर्शन घेऊन परतले असता आपल्या गाडीच्या काचा फोडून आपले सामान तसेच महिलांच्या दोन पर्स आणि महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याचे दिसून आल्याचे लक्षात येताच सुजित भट्टाचार्य यांनी शिर्डी पोलिसांत धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनी घटनेची फिर्याद दाखल केली. तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.प्रविण अंधारे करीत आहेत.
द्वारावती भक्तनिवासात कायमच व्हीआयपी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

याठिकाणी संस्थानची सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित असताना अशा प्रकारची घटना घडत असल्याने भाविकांची सुरक्षा रामभरोसे आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. द्वारावती भक्तनिवासात खाजगी वाहतूक करणार्‍यांंची मोठी गर्दी होत असते. तसेच त्यांची वाहने बेधडक रोडवर उभी करून ठेवतात. यावर संस्थानचा अंकुश राहिला नाही. त्यामुळे येथे येणारे भाविक असुरक्षित असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

जागतिक तिर्थक्षेत्र असलेले शिर्डी शहर झिरो क्राईम करणार असल्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आदेश दिले होते, त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांनी अथक प्रयत्न करत बर्‍यापैकी गुन्हेगारी मोडून काढली होती मात्र पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. शिर्डी पोलिसांपुढे हे मोठे आव्हानच आहे.

महसूलने थकविले जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे मानधन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

लोकसभा-विधानसभा निवडणूक काळातील नियुक्त कर्मचार्‍यांचे मानधन देण्यास टाळाटाळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणुका असोत की अन्य शासकीय परीक्षा किंवा अन्य कामे, दरवेळी महसूलकडून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महसूल प्रशासनाने नियुक्त केलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे मानधन अदा केलेले नाही. विशेष म्हणजे याच महसूल विभाागने त्यांच्या कर्मचार्‍यांचे मानधन मात्र अदा केले आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात महसूल यंत्रणे जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमधून 5 ते 7 कर्मचार्‍यांची सुमारे महिनाभरासाठी नियुक्त केली होती. या काळात संबंधित कर्मचार्‍यांना निवडणूक कामासाठी निवडणूक विभागाने निर्माण केलेल्या एक खिडकी योजनेत नियुक्ती केली. या ठिकाणी नियुक्त जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी काम केले. निवडणूक आयोगाने यासाठी महसूल विभागाकडे मानधन जमा केलेले आहे. मात्र, जाणीवपूर्वक महसूल विभागाने जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे मानधन अदा केलेले नाही.

हा प्रकार जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बाबतीत पहिल्यांदा घडलेला नाही. महसूल विभागाकडून घेण्यात येणार्‍या विविध शासकीय परीक्षा आणि उपक्रमात जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला वापरून त्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी जिल्हा परिषद कर्मचार्‍यांमधून करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा निवडणूक शाखेची संपर्क साधला असता जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे मानधन अदा करण्यात आलेले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी या कर्मचार्‍यांची नियुक्त ही संबंधित तालुक्यााचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांनी केलेली आहे. त्यांच्याकडे सर्वांचे मानधन वर्ग करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

महसूल विभागाने तातडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात नियुक्त केलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे मानधन अदा करावे. यापूर्वी असा प्रकार घडलेला आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांना महसूल विभागाने कमी लेखू नयेत, जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाचाा मोबदला मागण्यात गैर काहीच नाही.
-विजय कोरडे, जिल्हा परिषद कर्मचारी नेते.

उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी पुढील आठवड्यात बैठक- खा. विखे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

संरक्षण विभागाच्या जागेसंदर्भात मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील उड्डाण पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत तातडीने बैठक आयोजित करून निर्णय करण्याचे निर्देश रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान खा. डॉ. विखे पाटील यांनी नगर शहरातील उड्डाणपूल आणि नगर-शिर्डी या महामार्गासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील या दोन्ही महत्त्वपूर्ण रस्त्यांकडे लक्ष वेधले.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रमुख आशिष शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत खा. डॉ. विखे पाटील यांनी नगर शहरातील उड्डाणपुलासाठी झालेल्या जागा अधिग्रहणाची माहिती देतानाच काही जागा संरक्षण विभागाची असल्याने जागेचे भूसंपादन होण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले.

तसेच याबाबत तातडीने निर्णय होण्याची गरज व्यक्त केली. यासंदर्भात पुढील आठवड्यातच केद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. नगर-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आहे त्या परीस्थितीत प्राधान्य क्रमाने पूर्ण करण्याची खा. डॉ. विखे यांनी केलेली मागणी मंत्री गडकरी यांनी मान्य केली. विभागाच्या अधिकार्‍यांना तशा सूचना दिल्याचे खा. डॉ. सुजय विखे पा. म्हणाले.

34 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

108 शिक्षकांना कारवाईतून वगळले

अहमदनगर (प्रतिनिधी) – जून महिन्यांत झालेल्या शिक्षकांच्या बदल्यामध्ये काही शिक्षकांनी अन्याय झाल्याची तक्रार केली होती. त्यानुसार शिक्षकांच्या सुनावण्या घेण्यात आल्या. मात्र, तीन महिने उलटले तरी कारवाई झालेली नव्हती. याबाबत दै.‘सार्वमत’ ने आवाज उठविताच प्राथमिक शिक्षण विभागाने कारवाईची फाईल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे पाठवली आहे. त्यात 34 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. तर 108 शिक्षकांना कारवाईतून वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जून महिन्यात झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रकियेत त्रुटी राहिल्याने त्यातील काही शिक्षकांनी न्यायालयात, विभागीय आयुक्तांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली होती. मात्र, त्यावर न्यायालयाने याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर सुनावणी घेऊन हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांच्या हरकतीवर निर्णय घेण्यास टाळले होते.

आता शिक्षण विभागाने झालेल्या सुनावणीच्या इतिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांपुढे ठेवले आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांना याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. शिक्षण विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 186 पैकी 108 शिक्षकांवर असलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आलेले नाही. 34 शिक्षकांबाबतच्या तक्रारीत काही प्रमाणात तथ्य आढळले असून, या 34 जणांची तपासणी एनआयसी मार्फत करण्याचे सुचविण्यात आले आहे.

186 पैकी 16 शिक्षकांच्या विरोधात कुठलीही तक्रार नसल्याचे पत्र तक्रारदारांनी दिले आहे. 4 जणांनी आपसी बदलीसाठी अर्ज केल्याने त्यांची तक्रार नसल्याचे दिसते. 3 जणांनी थेट न्यायालयातून सोयीच्या बदलीचा निकाल आणल्याने त्याबाबत निर्णय झाला आहे. 1 शिक्षक पदावनत झाल्याने त्याचाही प्रश्न मिटला आहे.