Monday, May 5, 2025
Home Blog Page 26

Suicide News : महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

0

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

पिंपळगाव उंडा येथील महिला गीतांजली आश्रू (बाळू) गव्हाणे (वय 42) या महिलेने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पिंपळगाव उंडा येथील गीतांजली आश्रू गव्हाणे या कुटुंबासमवेत पिंपळगाव उंडा येथे राहत होत्या. त्यांनी मंगळवारी आपल्या मुलीला व जावई यांना फोन करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर पिंपळगाव, सोनेगाव रस्त्यावर झाडाला दुपारी गव्हाणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत गव्हाणे यांच्या मागे पती, दोन मुली (एक मुलगी विवाहित) आणि मुलगा असा परीवार आहे. पुढील तपास खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. के. सय्यद करत आहेत.

All Party Meeting: दहशतवादा विरोधात सरकारला पाठिंबा- विरोधी पक्षनेते राहुल गांधी

0

दिल्ली | वृत्तसंस्था 

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. दरम्यान काल पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तान विरोधात मोठी भूमिका जाहीर केली होती. या नंतर आज या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमावणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली, दोन तास चालेल्या या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली. सर्व पक्षीय नेत्यांकडून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध कण्यात आला आहे. आम्ही सरकार सोबत आहेत, या प्रकरणात आम्ही सरकारच्या प्रत्येक कृतीचं समर्थ करू असं यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या बैठकीमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या हल्ल्यानंतर सरकारकडून आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याची माहिती दिली आहे. ही घटना खूप दुख:दायक आहे, या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट आहे. बैठकीत सुरक्षेतील त्रुटींवरही चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक महत्त्वाची पाउलं उचलली जात आहेत, असं रिजिजू यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, भाजप नेते किरेन रिजिजू, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते (एलओपी) राहुल गांधी हे बैठकीला उपस्थित राहिलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये होते.

 

Pahalgam Terror Attack : आतापर्यंत ५०० पर्यटक राज्यात परतले

0

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या दोन दिवसात आतापर्यंत सुमारे ५०० पर्यटक राज्यात सुरक्षित परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी उपलब्ध केली होती.त्यातून १८४ पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी २३२ प्रवाशांसाठी उ शुक्रवारी एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मिरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांच्याकडून फडणवीस यांनी आज एकूण स्थितीचा आढावा घेतला. उद्यासाठी आणखी विमाने करायची असतील, तर करा, त्याचा खर्च राज्य सरकार देईल, असे त्यांनी सांगितले.

गिरीश महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडिओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणार्‍या तेथील डॉक्टरांचे आभारही मानले.

काश्मिरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरिय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या विनंतीवर काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धाम, जम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे १४ पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरुन दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे.

आज, शुक्रवारी काश्मिरातून येणार्‍या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असून, गरज पडली तर परवाही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

शिवनेरी बसची व्यवस्था
दरम्यान, काश्मीर येथे अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक श्रीनगर होऊन विशेष विमानाने आज रात्री मुंबईत पोहचले. या सर्व पर्यटकांना मुंबईतून त्यांच्या गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या शिवनेरी बस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. या बसमधून पर्यटक आपापल्या गावी रवाना झाले.

नाशिकमध्ये नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र स्थापन होणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

0

मुंबई । प्रतिनिधी

अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक रुग्णालय नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि तत्काळ करतानाच विभागीय प्राधिकरण समित्यांकडून जिवंत अवयवदान परवानगी प्रक्रियेला सुलभ केले जाईल, अशी माहिती अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी येथे दिली. राज्यात नशिकसह अमरावती, कोल्हापूर आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य भवन येथे आज अवयव प्रत्यारोपणाविषयी बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी अवयव प्रत्यारोपण केंद्राबाबत माहिती दिली. अवयवदानासाठी जनजागृती, सन्मान आणि सामाजिक सहभाग असल्याने राज्यभर जनजागृती मोहीम राबवून जनतेत अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार १ मे या महाराष्ट्र दिनी, जिल्हास्तरावर अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टर आणि समन्वयकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातील. तसेच ‘फेलोशिप इन क्रिटीकल मेडीसीन’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तात्काळ सुरू केला जात असल्याची माहिती आबिटकर यांनी यावेळी दिली.

शासकीय रुग्णालयांमध्ये मानवी अवयव पुनर्प्राप्ती केंद्रांची निर्मिती आणि त्या ठिकाणी समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे प्रकाश आबिटकर यावेळी म्हणाले. या बैठकीला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ.पल्लवी सापळे, वैद्यकीय अधिकारी मानवी अवयव प्रत्यारोपण तसेच विधी आणि न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कामगार विमा रुग्णालये होणार अत्याधुनिक
दरम्यान, राज्यातील कामगार विमा योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आबिटकर यांनी अन्य एका बैठकीत दिले.

राज्यातील रेशन दुकानदार, पतसंस्था आणि शिक्षक यांनाही कामगार विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी शिबिरे आयोजित करावीत आणि सुविधा वाढवण्याचे प्रयत्न करावेत. याचबरोबर रुग्णालयांचा दर्जा वाढविण्यासाठी नवीन योजना तयार कराव्यात. त्यासाठी राज्य सरकारकडून साहित्य आणि यंत्रसामग्री पुरवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल तसेच डायलिसिससारख्या आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल, असेही प्रकाश आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

शेततळ्यात पडून तरुण शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

0

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील वडगाव लांडगा (Wadgaon Landga) येथील तरुण शेतकर्‍याचा गुरुवारी (दि.24) पहाटे पाच वाजता शेततळ्या बुडून दुर्दैवी मृत्यू (Farmer Death) झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सोपान बाळासाहेब लांडगे (वय 29) हा तरुण शेतकरी पहाटे शेततळ्यावर पाहणी करण्यासाठी गेला असता पाण्यात पडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. त्यास तत्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपचारांपूर्वीच मयत असल्याचे घोषित केले.

याबाबत ज्ञानेश्वर बाळासाहेब लांडगे यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

सतरा वर्षीय युवकाची हत्या

0

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारात रविंद्र उर्फ मुन्ना दिपक अहिरे(१७ ) रा. बोधे या युवकास पुर्व वैमनस्यातून पाच जणांनी मारहाण करून गळा चिरून खुन केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा रोजी घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पाच आरोपींना तात्काळ अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयताचे वडील दिपक अहिरे (४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविंद्र उर्फ मुन्ना दिपक आहीरे वय १७ वर्षे, रा.बोधे दहीवाळ ता. मालेगांव. यास पुर्व वैमनस्यातुन आकाश शरद सोनवणे, ऋषीकेश शरद पवार, विनोद शरद पवार, विजय एकनाथ सोनवणे, रविंद्र अंकुश गायकवाड सर्व रा. मोरवाडी साकुरी झाप ता. मालेगांव जि. नाशिक यांनी मिळून फिर्यादीचे मुलास जिवे ठार मारण्याची पूर्व तयारी करुन अंगावरील शर्ट फाडुन लाथा बुक्यांनी मारुन त्याचे जिवनकळावर लाथांनी मारुन त्याला जिवे ठार मारणे करीता त्याचा गळा कोणत्यातरी धारधार शस्त्राने कापुन मुलाचा खुन करुन त्यास तेथे सोडुन पळुन गेले असे म्हटले आहे. वखारी येथील पोलीस पाटील राकेश चव्हाण यांनी घटनेची माहिती नांदगाव पोलिसांना दिली असता पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बढे तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नांदगाव पोलिसांनी पाच आरोपीना तात्काळ अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील बढे करीत आहेत.

राज्यातील पूर्व प्राथमिक शिक्षण केंद्रांची नोंदणी बंधनकारक

0

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या राज्यातील खासगी शिक्षण केंद्रांना त्यांची नोंदणी बंधनकारक करण्यात आले आहे. या केंद्रांना त्यांची सर्वसाधारण माहिती, व्यवस्थापन, विद्यार्थी संख्या, केंद्रात उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या माहितीची नोंद प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टलवर करायची आहे. त्यासाठी या संस्थांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०च्या आकृतीबंधातील पहिली पाच वर्ष म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेची तीन वर्ष (वयोगट ३ ते ६ वर्ष) तसेच इयत्ता पहिली आणि दुसरी (वयोगट ६ ते ८ वर्ष) यांचा समावेश आहे. या पाच वर्षाच्या टप्प्याला पायाभूत सुविधा स्तर म्हणून संबोधण्यात आले आहे. सध्या ३ ते ६ वर्ष वयोगातील बालकांना अंगणवाड्या, बालवाड्या तसेच शाळेला जोडून असलेल्या पूर्व प्राथमिक वर्ग आणि खासगी पूर्व प्राथमिक वर्गातून शिक्षण दिले जाते.

शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अंगणवाड्या, बालवाड्या यांची नोंदणी महिला आणि बालविकास विभागाकडे आहे.मात्र, खासगी पूर्व प्राथमिक वर्गांची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण देणाऱ्या पूर्व प्राथमिक शिक्षण केंद्राची नोंदणी बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या केंद्रांची नोंद झाल्यास त्याची एकत्रित माहिती राज्य, जिल्हा स्तरावर पालकांना उपलब्ध होणार आहे. सरकारने नोंदणीची सुविधा शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील वेब लिंकमध्ये असलेल्या पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे. याबाबत प्राथमिक विभागाच्या शिक्षण संचालकांना कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.

Nashik Crime : छोटू पठाणचा जुगार अड्डा उद्ध्वस्त; एकोणतीस जण ताब्यात

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या अनेक महिन्यांपासून पाथर्डी गावालगत सुरळीत सुरु असलेल्या सराईत गुन्हेगार (Criminal) समीर उर्फ छोटू पठाणचा अलिशान जुगार अड्डा काही कारणांस्तव उद्ध्वस्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा (Crime Branch) युनिट दोनने केली असून कारवाईत तब्बल साठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीच हा जुगार अड्डा का नष्ट करण्यात आला नाही याबाबत चर्चा सुरु झाली असून आतापर्यंत केलेल्या कारवायांत ही सर्वात मोठी कारवाई आहे.

इंदिरानगर हद्दीतील (Indiranagar Area) पेरुची बाग परिसरातील शेतात एअर कूलरच्या सोयीसुविधायुक्त हा जुगार अड्डा मंगळवारी (दि. २२) मध्यरात्री छापा (Raid) टाकून उद्ध्वस्त करण्यात आला.कुख्यात टिप्पर गँगचा म्होरक्या छोटू उर्फ समीर पठाण याच्या सेटिंग्जने हा जुगार अड्डा सुरु होता, असे समोर आले आहे. काठेगल्ली येथील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढतेवेळी दगडफेक करणाऱ्या संशयितांत पठाणचा सहभाग आढळल्याने तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

युनिट दोनचे अंमलदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना पाथर्डी गाव शिवारातील फ्लाईंग कलर्स स्कूलसमोर असलेल्या शेतातील शेडमध्ये तीनपत्ती जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशाने युनिट दोनचे प्रभारी सहायक निरीक्षक हेंमत तोडकर यांच्या पथकाने अड्‌ड्यावर (दि. २२) रात्री छापा टाकला. शेडमध्ये एअर कुलरसह जुगारांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे दिसून आले.

दरम्यान, जुगाराचे (Gambling) साहित्य व १५ दुचाक्यासह रोख रक्कम, पाच कार, एक रिक्षा, मोबाईल असा ६० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन जागा मालकांसह क्लबचालक संशयित समीर पठार याच्यासह २९ जणांविरोधात
इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक निरीक्षक समाधान हिरे, उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण, शंकर काळे, गुलाब सोनार, विलास गांगुर्डे, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी यांनी केली.

आकडे लावणारे संशयित

वसीम अन्वय शेख (४१, रा. पळसेगाव) हा काऊंटवर आढळून आला. तर, समीर पठार या अड्ड्याचा भागीदार आहे. दरम्यान, विशाल प्रल्हाद आहिरे (४४, रा. देवळाली गाव), फारुख गुलाब शेख (४९, रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर), अजय राजू पडघन (२९, रा. जाधव संकुल, अंबड), दीपक रामतेज मौर्या (३४, रा. जाधव संकुल, अंबड), गणेश भास्कर खैरे (४४, रा. नांदूडीं, ता. निफाड) या कामगारांसह सुनील सदाशिव जाधव (४१, रा. मुळेगाव, ता. त्र्यंबक), भूषण सदाशिव केंदाळे (३३, रा. नाशिकरोड), अनिल देवराम खरात (४७, रा. ब्राह्मणगाव, ता. निफाड), भाऊराव मल्हारी धनगर (४२, रा. हरसूल, ता. त्र्यंबकेश्वर), शेखलाल शेखनूर शेख (५४, रा. इस्लामपूर, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड), जावेद रज्जाक शेख (४०, रा. खडकाळी, भद्रकाली), सागर प्रल्हाद बुलाखे (३९, रा. देवळाली कॅम्प) हे तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आले.

Nashik News : वणवे वाढले; वनसंपदेची हानी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकाच दिवशी दोन घटना

0

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

एकीकडे आपण जागतिक वसुंधरादिन साजरा करतो आणि दुसरीकडे जंगलाला आग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. असेच दोन प्रकार त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwar) पर्वतरांगांमध्ये घडले आहेत. दोन्ही ठिकाणी मोठी आग लागून वनसंपदेबरोबर सरपटणारे प्राणी, कीटक यांना हानी पोहोचली. येथून तीन किलोमीटर अंतरावरील डोंगरावर सायंकाळी आग लागली. यात गवत, झाडेझुडपे यांचे मोठे नुकसान झाले.

वाळलेले गवत मोठ्या प्रमाणावर जळाले. येथील गौतम तलावाच्या पाठीमागे असलेल्या पंचलिंग डोंगर पट्ट्यातील डोंगराच्या कपारीला टोकावर उंचावर मोठी आग (Fire) लागली. सायंकाळी वारा सुटल्याने उंचीवरून गवत पेटून आगेच्या ठिणग्या उडताना दिसत होत्या. त्यामुळे आग लवकर पसरली. रिंगरोडवरून ही आग दिसत होती. दोन्ही आगीच्या घटनांकडे नागरिकांनी सोशल मीडियातून वन विभागाचे लक्ष वेधले आहे. वनविभागाचे कायम दुर्लक्ष असते असा आरोप करीत धूमोडी येथील रामदास आहेर यांनी चिंता व्यक्त केली.

दरम्यान, त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी परिसरावर यापूर्वी नगरपालिकेने (Municipality) वृक्ष लागवडीवर मोठा खर्च केला होता. पण एकही वृक्ष जगले नाही यांची आठवण करून देतानाच नद्यांची छेडखानी होत आरोप करत पालिका वसुंधरा दिनाच्या उद्दिष्टांपासून दूर असल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखवली. काहींनी आगेच्या प्रकाराबाबत तहसील कार्यालयाचे लक्ष वेधले. वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने डॉगरावरील आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जव्हार रोडवरील डोंगरावरील लागलेली आग विझविण्यासाठी वनविभाग व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. परिसरातील युवकांनी झाडांच्या फांद्याचा मारा करत गवत वाचवले.

वणव्याचे नैसर्गिक कारण

उष्णतेच्या लाटांमुळे जंगलातील गवत, पाने, आणि लाकडे कोरडे होतात, ज्यामुळे आग लागण्याची शक्यता वाढते. आपल्या राज्यात उष्ण हवामान आणि कमी पर्जन्यमानामुळे वणव्यांचा धोका अधिक असतो.

मानवी कारणे

जंगलात किंवा शेतात फेकलेली सिगारेट किंवा विडी, शिकार किंवा पर्यटनादरम्यान केलेली निष्काळजी कृती यामुळे आग लागू शकते. विशेषतः उन्हाळ्यात या कारणांमुळे वणव्यांची शक्यता अधिक असते. अनेक शेतकरी शेतातील अवशेष जाळतात. त्यातून कधी कधी आग नियंत्रणाबाहेर जाऊन जंगलात पसरते आणि मोठा वणवा तयार होतो. अवैध शिकार आणि लाकूडतोड करणारे लोक. शहरीकरण आणि जंगलात बांधकाम.

Pahalgam Terror Attack: भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानचा तीळपापड! व्यापार बंद, शिमला करार, द्विपक्षीय करार निलंबीत, म्हणे पाणी रोखणं युध्दासारखं

0
व्यापार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांवर पाकिस्तानने आज आक्रमक पवित्रा घेतला असून अनेक द्विपक्षीय करार रद्द करत युद्धजन्य पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. सर्व भारतीय मालकीच्या किंवा भारतीय संचालित विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र तात्काळ बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. तसेच अटारी वाघा बॉर्डर पोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासोबत होणारा व्यापारही बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे भारताने पाकिस्तान या दहशतवाद्यांना लाँचिंग पॅड, शस्त्रे उपलब्ध करून देत असल्याचा आरोप केला आहे. तसेच आयएसआय या दहशतवाद्यांमागे असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यात आली असून दहशतवादाविरोधात आता भारताने कठोर पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा बंद केला. तसेच ४८ तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला.

पाकिस्तानच्या एनएससी बैठकीत भारताने अद्याप दहशतवादी हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला दिलेले नाहीत, असे म्हटले आहे. तसेच पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखीच कारवाई असल्याचा आरोप केला आहे. भारत हवाई हल्ला करू शकतो, यामुळे भारतीय मालकीच्या प्रवासी विमानांना ये-जा करण्यासाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. याचबरोबर पाकिस्तानने भारतासोबतच्या सर्व व्यापारावर बंदी घातली आहे. पाकिस्तानने वाघा बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर शिमला करारही निलंबित करण्यात आला आहे. तसेच शीख धार्मिक तीर्थयात्री सोडून जे भारतीय आहेत, त्याचा व्हिसा देखील रद्द करण्यात येत आहे. या लोकांनी ४८ तासांत पाकिस्तान सोडावे असे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानने काय निर्णय घेतले?
भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद. भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत व्यापार नाही
भारतीयांचा सार्क व्हिसा रद्द करणार.
भारतीय उच्चायुक्तालयातील लष्कर सल्लागारांना भारतात परतावे लागणार.
वाघा अटारी बॉर्डर बंद.
इस्लामाबादमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या ३०वर आणणार.
भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी एअरस्पेस बंद.
शिमला करार आणि सर्व द्विपक्षीय करार पाकिस्तानने तात्काळ निलंबित केले. जोपर्यंत भारत आपली भूमिका बदलत नाही.

भारताने काय निर्णय घेतले?
सिंधू पाणी करार स्थगित.
पाकिस्तानी दूतावासातील आकार कमी करण्याचा आदेश.
पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद.
अटारी वाघा बॉर्डर १ मे पर्यंत बंद राहणार.
भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा