Sunday, June 21, 2026
Home Blog Page 4

आज ‘सार्वमत शिलेदार’ सन्मान सोहळा

0

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

नगर जिल्ह्याचे मुखपत्र दैनिक सार्वमत आयोजित ‘सार्वमत शिलेदार’ सन्मान सोहळा शनिवार, 20 जून रोजी सायंकाळी 5 वाजता संगमनेरमधील वसंत लॉन्स् येथे रंगणार आहे. ग्रामीण विकासात आपल्या कौशल्यपूर्ण नेतृत्वातून योगदान देणार्‍यांचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान होणार असून सार्वमत-देशदूत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा, आ. सत्यजित तांबे, आ. अमोल खताळ प्रमुख पाहुणे आहेत.

सुवर्ण महोत्सवी वाटचालीत सार्वमतने भूमिपुत्रांचे दैनिक म्हणून आपली ओळख दृढ केली. जिल्ह्यातील शेती, सिंचन, सहकार यासह कृषी विकासाच्या प्रत्येक चळवळीत ‘सार्वमत’ सक्रीय राहिला. जिल्ह्यात अनेकजण आपल्या कार्यक्षेत्रातून विकासासाठी कार्यरत आहेत. त्यांचे कार्य येथील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी दिशा देणार आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक यासह विविध संस्थांच्या माध्यमातून नेतृत्व विद्यमान पिढी भविष्यासाठी सज्ज होत आहे. त्यांच्या गौरव सोहळा संगमनेर येथे होत आहे.

Rahata : आमदार व्हायचं असतं तर दोन महिन्यांपूर्वीच झालो असतो

0

राहाता |प्रतिनिधी| Rahata

पद मिळाल्यानंतर त्याचा आनंद घेणे वेगळे, पण त्यातून आलेला माज, अहंकार आणि मगरुरी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या राजकीय विरोधकांचा समाचार घेतला आहे. लोणी येथे प्रवरा बँकेच्या यूपीआय बँकिंग सेवेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पदाचा अहंकार बाळगणार्‍यांना खडेबोल सुनावले. आपल्या आक्रमक शैलीत बोलताना डॉ. विखे म्हणाले, काही लोकांना कारखान्याचे चेअरमन किंवा आमदार व्हायची हौस असते. मात्र मला जर आमदार व्हायचे असते, तर ते दोन महिन्यांपूर्वीच सहज शक्य होते. पद मिळवणे हा आमचा उद्देश नसून जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे हेच आमचे मूळ उद्दिष्ट आहे. पद कायमस्वरूपी नसते, पण लोकांशी असलेले नाते कायम असते, याचे भान प्रत्येकाने राखले पाहिजे.

राजकीय विरोधकांवर निशाणा साधताना डॉ. विखे यांनी आपल्या मेंदूविकार तज्ज्ञ असण्याचा संदर्भ देत मिश्किल पण टोचून बोलले. ते म्हणाले, मेंदूचा डॉक्टर काही काळ कामात व्यस्त असल्याने बाहेर होता, त्याचा फायदा घेत काही मनोरुग्ण मोकाट सुटले आहेत. आता हा डॉक्टर परतला आहे, लवकरच या सर्व मनोरुग्णांवर उपचार केले जातील. त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विखे पाटील परिवाराच्या अनेक दशकांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करताना ते म्हणाले, सत्तेपेक्षा जनतेने दिलेले प्रेम हीच आमची खरी ताकद आहे.

गेल्या सहा महिन्यांत आम्ही आमची ताकद काय आहे, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता अधिक बोलण्याची गरज नसून, येणार्‍या काळात जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासासाठी आम्ही अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार आहोत. जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील यांचे हे आक्रमक रूप राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. कार्यकर्त्यांनाही त्यांनी जनतेशी कायम संपर्कात राहून सेवा करण्याचे आवाहन केले आहे.

Ahilyanagar : ‘ते’ सहा खासदार आता खर्‍या शिवसेनेत गेले

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

उध्दव ठाकरे सेनेच्या खासदार फुटीच्या प्रकरणाशी भाजपचा काय संबंध? असा सवाल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून, आता ते खासदार खर्‍या शिवसेनेत गेले आहेत. खरी शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे, असे भाष्य ना. विखे यांनी शुक्रवारी येथे केले. टंचाई आढावा व आषाढी वारीनिमित्त आढावा बैठका विखे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. भाजप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नितीन दिनकर, दिलीप भालसिंग तसेच विनायक देशमुख यावेळी उपस्थित होते.

ठाकरे सेनेचे खासदार फोडण्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. संजय राऊत यांचे तसे म्हणणे असले तरी त्यांच्या पक्षात आता कोणी शिल्लक राहिलेले नाही. राऊत एकटेच राहिलेले आहेत आणि त्यांच्या नेत्यांना खुश करण्यासाठी ते आम्हाला शिव्या देत आहेत, असे स्पष्ट करून पालकमंत्री विखे म्हणाले की, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे. शिंदे सेनेचा राज्यात मुख्यमंत्री झालेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. हिंदुत्वाचे रक्षण त्यांनी केले आहे. औरंगजेबाच्या कबरीवर ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी फुले उधळली, तेव्हाच त्यांची शिवसेना संपली होती. तसेच ज्यावेळेस त्यांनी काँग्रेसशी युती केली, त्याचवेळी त्यांचे हिंदुत्व संपले होते. त्यामुळे त्यांनी आता आम्हाला शिकवू नये, असा घणाघातही पालकमंत्री विखे यांनी केला.

ममता यांची दहशत होती
पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी कुंपण घालायचे असताना ममता बॅनर्जी यांच्या सरकारने सीमा सुरक्षा दलाला जागाच दिली नाही. त्यामुळे त्यांची जर एवढी लोकप्रियता होती तर त्यांचे 20 खासदार बाहेर पडलेच नसते. मुळात त्यांची दहशत होती. हजारो लोक त्यांच्या काळात मारले गेले. त्यामुळे तिथील लोकांना तृणमूल कौन्ग्रेस नको झाली होती. त्यामुळे आता ममता बॅनर्जी काँग्रेसमध्ये विलीन होतील अशी चर्चा आहे, असेही भाष्य पालकमंत्री विखे यांनी केले. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील फुटी संदर्भात आपल्याला काहीही कल्पना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅडवोकेट जनरलचे मत घेणार
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या आहेत. काहींची अंमलबजावणीही सुरू आहे। प्रक्रियेला थोडा वेळ लागेल, परंतु त्यांच्या सर्व मुद्द्यांवर कार्यवाही नक्की होईल, असे स्पष्ट करताना सातारा व सोलापूर गॅझेटबाबत राज्याच्या अ‍ॅडव्होकेट जनरलचे मत मागवणार आहे, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Crime News : मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मोठा आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत व्यावसायिक गुंतवणुकीच्या नावाखाली एका तरूणाची तब्बल 5 लाख 98 हजार 999 रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरूध्द येथील सायबर पोलीस ठाण्यात गुरूवारी (18 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. विनीत व्ही., नवीन एस., इलयाराजा ए. (तिघे रा. नेडुमंगड, ता. नेडुमंगड, जि. तिरूअंतपुरम, केरळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी एचक्यू एसीसीएस, अहिल्यानगर येथे नोकरीला आहेत. संशयित आरोपींनी फिर्यादीला व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा व भरघोस परतावा मिळेल, असे खोटे आश्वासन दिले.

त्यानुसार फिर्यादीकडून विविध माध्यमांतून एकूण 5 लाख 98 हजार 999 रूपये स्वीकारले. मात्र, अपेक्षित परतावा मिळाला नाही. तसेच गुंतवलेली रक्कम परत मागितल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. सदरची घटना 28 नोव्हेंबर 2025 रोजी घडली आहे. या प्रकरणात राजस्थान राज्यातील बानसूर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या झिरो एफआयआरच्या अनुषंगाने अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात 18 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Crime News : पूर्ववैमनस्यातून दगडफेक करत मारहाण

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जुन्या भांडणाची कुरापत काढून गुंडेगाव येथे एका समाजाच्या वस्तीवर दगडफेक आणि मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द भारतीय न्याय संहिता आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल भिकाजी भोसले (वय 30, रा. गुंडेगाव) यांनी गुरूवारी (18 जून) फिर्याद दिली आहे. बुधवारी (17 जून) रोजी सायंकाळी घटना घडली आहे. बाबासाहेब एकनाथ कोतकर, अशोक हरिभाऊ कोतकर, राहुल विठ्ठल कोतकर, कुणाल बाबासाहेब कोतकर आणि संदीप पंडित भापकर (सर्व रा. गुंडेगाव) यांच्याविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संशयित आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादी विशाल भोसले, त्यांचे वडील भिकाजी भोसले आणि चुलत भाऊ महेश संभाजी भोसले यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. यावेळी महेश भोसले हे जखमी झाले आहेत. संशयित आरोपींनी फिर्यादीच्या कुटुंबाला आणि वस्तीवरील इतर लोकांना जातीवाचक शिवीगाळ करत, तुम्हाला तलवारीने कापून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. टिपरसे करीत आहेत.

Shevgaon : खून प्रकरणातील सराईत गुन्हेगार गजाआड

0

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgaon

खून, दरोडा व मकोका अंतर्गत गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सचिन साहेबराव काते (रा. सामनगाव, ता. शेवगाव, ह.रा. इंदिरानगर, शेवगाव) यास शेवगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सदर कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास शेवगाव येथील ग्राफिक्स दुकानावर फिर्यादी राहुल किसन वाघमोडे (वय 26, रा. रेणुकानगर, शेवगाव) हे असताना आरोपी सचिन काते व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी शिवीगाळ केल्यानंतर झालेल्या वादातून फिर्यादीचे वडील किसन वाघमोडे यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर आरोपी सचिन काते हा फरार झाला होता. शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी आरोपीच्या शोधासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला होता. दरम्यान दि. 18 जून 2026 रोजी आरोपी आखेगाव रोड येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपी सचिन काते याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये सांगवी पोलीस ठाणे (पिंपरी चिंचवड) येथे मकोका अंतर्गत गुन्हा, तसेच शेवगाव पोलीस ठाण्यात पोस्को व इतर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई करणार्‍या पथकामध्ये पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक रामहारी खेडकर, पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, पोलीस हवालदार परशुराम नाकाडे, राजेंद्र केदार, पोलीस हवालदार सचिन काळे, पोलीस कॉन्स्टेबल रोहित पालवे, धनेश्वर पालवे, ईश्वर बेरड, शाम गुंजाळ, एकनाथ गर्कळ, वसंत वैद्य, राजू बडे, राहुल आठरे, प्रशांत आंधळे, राहुल खेडकर, तान्हाजी सानप, सचिन पिरगळ यांचा समावेश होता.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करीत आहेत.

कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारा गजाआड

0

येवला | प्रतिनिधी Yeola

तालुक्यासह राज्यातील विविध भागांमध्ये अर्ध्या किमतीत मोबाईल फोन आणि सोनं मिळवून देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सुप्रसाद प्रमोद दीक्षितला अखेर तालुका पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. दरम्यान, दीक्षित यास येवला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसांची (२४ जूनपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे.

तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, नगरसुल येथील सुप्रसाद प्रमोद दीक्षित याने परिसरातील नागरिक, युवक आणि ग्राहकांना नामांकित कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन तसेच सोनं अर्ध्या किमतीत उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले. मात्र, पैसे घेतल्यानंतर वस्तूंचा पुरवठा न केल्याने त्याचे विरुद्ध तालुका पोलिसात फसवणूकिचा गुन्हा दाखल झाला होता. दिक्षित फरार झाल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष तपास पथके तयार केली होती. गुप्त माहितीच्या आधारे दिक्षित पुणे येथे लपला असल्याची माहिती मिळाल्याने १८ जून रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत दीक्षित याने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि इतर भागांतील अनेक नागरिकांची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी काही साथीदारांचा सहभाग आहे का, फसवणुकीची एकूण रक्कम किती, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.

‘बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड कधीच करणार नाही’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई :

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित भव्य मेळाव्यात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी प्रामाणिक राहण्याचा पुनरुच्चार करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.

आपल्या भाषणात शिंदे म्हणाले की, शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नसून मराठी माणसाच्या स्वाभिमानाची, हिंदुत्वाची आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी चळवळ आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विचारांशी तडजोड करणे शक्य नसल्यानेच २०२२ मध्ये आम्ही भूमिका घेतली आणि त्याच विचारांच्या आधारे आजही पक्ष पुढे जात आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पक्षाच्या वाढत्या ताकदीकडे लक्ष वेधले. अनेक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचा दावा करत त्यांनी पक्षाचा जनाधार वाढत असल्याचे सांगितले. शिवसेनेची विचारधारा आणि काम करण्याची पद्धत जनतेपर्यंत पोहोचत असल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका करताना शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी ज्या तत्त्वांसाठी आयुष्यभर संघर्ष केला, त्या तत्त्वांपासून दूर जाण्याचा आम्ही कधीच विचार करू शकत नाही. शिवसेनेचा खरा वारसा म्हणजे राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हक्कासाठीचा संघर्ष असून, त्याच मार्गावर आम्ही पुढे जात आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी आगामी मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख करत प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने जनतेमध्ये जाऊन विकासकामांचा प्रचार करावा, संघटन अधिक मजबूत करावे आणि बूथस्तरावर पक्षाची ताकद वाढवावी, असे निर्देश दिले. सरकारने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास वाढल्याचा दावाही त्यांनी केला.

भाषणाच्या शेवटी शिंदे यांनी शिवसैनिकांना एकजूट, शिस्त आणि समर्पणाचा संदेश देत, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसेनेचा भगवा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायम फडकत राहील आणि आगामी राजकीय लढायांमध्ये पक्ष अधिक ताकदीने उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

‘शिवसेना संघर्षातून उभी राहिली, पुन्हा उभी राहील’ – उद्धव ठाकरे

0

मुंबई :

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित भव्य मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर जोरदार टीका केली. सध्या पक्षातील काही खासदारांच्या फुटीच्या चर्चांमुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एकजूट राखण्याचे आणि आगामी राजकीय लढायांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचा इतिहास हा केवळ राजकीय पक्षाचा इतिहास नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, मराठी अस्मितेचा आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा इतिहास आहे. गेल्या काही वर्षांत पक्षाला अनेक धक्के बसले, नेत्यांनी साथ सोडली, पक्ष फोडण्याचे प्रयत्न झाले, परंतु शिवसेनेची विचारधारा आणि शिवसैनिकांची निष्ठा कोणालाही संपवता आलेली नाही आणि पुढेही ते शक्य होणार नाही.

पक्षातील काही खासदारांच्या बंडाच्या चर्चेकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, पदे, सत्ता आणि स्वार्थासाठी येणारे-जाणारे अनेक असतात; मात्र संकटाच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणारे कार्यकर्तेच शिवसेनेची खरी ताकद आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांमुळे खचून न जाता प्रत्येक शिवसैनिकाने जनतेमध्ये जाऊन संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक, ही शिवसैनिकांसाठी प्रतिष्ठेची लढाई असल्याचे सांगितले. प्रत्येक शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने तळागाळात संघटनबांधणी मजबूत करावी, लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावे आणि महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, विरोधकांनी शिवसेनेला संपवण्याचा, तिची ओळख पुसून टाकण्याचा आणि मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना ही एखादी इमारत किंवा कार्यालय नसून लाखो शिवसैनिकांच्या मनात जिवंत असलेली विचारधारा आहे. शिवसेना संघर्षातून उभी राहिली आहे आणि संकटांवर मात करत पुन्हा अधिक ताकदीने उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी शिवसैनिकांना एकजुटीचा संदेश देत, महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी अस्मिता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. “संकटे येतील, आव्हाने येतील; पण शिवसेनेचा भगवा झेंडा कधीही झुकणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत त्यांनी आगामी राजकीय लढायांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

0

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

शुक्रवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 2600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 10344 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 2000 ते 2600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर दोनला 1300 ते 1950 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 600 ते 1250 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 1300 रुपये. जोड कांदा 400 ते 700 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

कांद्याच्या (Onion) 8 गोण्यांना 2501 ते 2600 रुपये . 101 गोण्यांना 2401 ते 2500 रुपये. 72 गोण्यांना 2301 ते 2400 रुपये. 149 गोण्यांना 2201 ते 2300 रुपये भाव मिळाला. 279 गोण्यांना 2101 ते 2200 रुपये. 206 गोण्यांना 2001 ते 2100 रुपये. 342 गोण्यांना 1901 ते 2000 रुपये. 502 गोण्यांना 1801 ते 1900 रुपये. 671 गोण्यांना 1701 ते 1800 रुपये. 556 गोण्यांना 1601 ते 1700 रुपये भाव मिळाला. 764 गोण्यांना 1501 ते 1600 रुपये भाव मिळाला. 3163 गोण्यांना 1001 ते 1500 रुपये भाव मिळाला. 3531 गोण्यांना 500 ते 1000 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 1370 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 191 रुपये ते 300 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 111 ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 61 रुपये ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 60 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला. गव्हाची 4 क्विंटलची आवक झाली. गव्हाला किमान 2200 रुपये, जास्तीत जास्त 2300 रुपये तर सरासरी 2250 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला. बाजरीला सरासरी 1900 रूपये भाव मिळाला, अशी माहिती सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.