Saturday, May 3, 2025
Home Blog Page 35

Shirdi : वक्फच्या लोकांनी लाखो एकर जमीन लुटली

0

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये 10 लाख हिंदूंची हत्या करण्यात आली होती. तेव्हा काँग्रेसचे लोक काही बोलले नव्हते. गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेसचे काही लोक, भूमाफीया, वक्फ बोर्डाच्या लोकांनी लाखो एकर जमीन लुटली आहे. मात्र त्यांनी एकाही गरीब मुस्लिमाचा फायदा केलेला नाही. त्यामुळे आता वक्फ बोर्डाच्या जमिनी सुरक्षित ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी शिर्डीत केले.

ना. जी.किशन रेड्डी यांनी शनिवारी सहकुटुंब साई दरबारी मध्यान्ह आरतीला हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खा. भाऊसाहेब वाकचौरे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पर्यवेक्षक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. साई दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले आजही तेलंगाणा राज्यात बघितले तर मोठमोठे मुस्लिम नेते ओवीसींच्या पक्षाच्या लोकांनी आणि काँग्रेस नेत्यांनी हजारो एकर जमीनीवर कब्जा केला आहे.

एआयएमआयएम पार्टीच्या लोकांनी बेनामी मॅरेज हॉल तयार केले आहेत. त्यांना कोणतेही सरकार विचारत नाही. जातीय वाद वाढवण्याचं ते आजही काम करत आहेत. काँग्रेस पार्टी आज नाही तर, स्वातंत्र्य मिळण्याआधीपासूनच लोकांना विभक्त करण्याचं काम करत आली, असा आरोपही ना. रेड्डी यांनी केला.

Ahilyanagar : नवीन धरणांऐवजी खोर्‍यांची तूट भरून काढणार

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नदी, खोर्‍यातील धरणांमध्ये पाण्याची तुट भरून काढणे, हाच पाणीटंचाईवर मात करण्याचा उपाय आहे. त्यादृष्टीने राज्य सरकाराने समुद्रात वाया जाणारे पाणी तुटीच्या खोर्‍यात वळविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यासाठी गोदावरी खोर्‍यात चार नदीजोड प्रकल्प राबविले जाणार आहेत, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यात चितळे समितीने 12 धरणे बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्याऐवजी नदी, खोर्‍यांमध्ये असणारी तुट भरून काढण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री विखे यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या चौंडी (ता. जामखेड) येथे होणार्‍या संभाव्य बैठकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 19) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. मंत्री विखे यांनी बैठकीपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधत जिल्हा, राज्यातील विविध प्रश्नांवर भूमिका स्पष्ट केली. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यात नव्याने धरणांच्या दृष्टीने चितळे समितीने 12 धरणे उभी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, सध्याच्या परिस्थिती आहे. नदीपात्रातील धरणातील पाण्याची तुट भरून काढण्यासाठी पावसाळ्यात वाहून वाया जाणारे अर्थात जास्तीचे पाणी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. गोदावरी नदी खोर्‍यात चार नदीजोड प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठी वाढणार आहे.

मुंबईत टँकर संघटनेने संप पुकारला आहे. त्यामुळे काही भागात पाण्याची समस्या आहे. या प्रश्नावर लवकरच मार्ग काढला जाणार आहे. टंचाईच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धरणामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा व इतर महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेण्यासाठी येत्या बुधवारी (दि. 23) जलसंपदा अधिकार्‍यांची बैठक घेण्यात येईल. पिण्याच्या पाण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर शेतीसाठी पाणी दिले जाईल. पाण्याचा कोठे गैरवापर होत आहे का? कोठे अपव्यय होत आहे, यावर उपाययोजना ही केल्या जाणार आहेत.

स्कूलबसला जीपीएस, सीसीटीव्ही बसवा
श्रीगोंदे तालुक्यात स्कूल बस चालकाने एका विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूलबस संदर्भात काही गोष्टींची जबाबदारी निश्चित करावी लागेल. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या स्कूलबसला जीपीएस सिस्टीम तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. स्कूल बसची देखरेख करण्यासाठी संबंधित संस्थेतील शिक्षकाची नियुक्ती करावी. स्कूल बसबाबत संस्था चालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धोरण राबविले पाहिजे. बीड जिल्ह्यात महिला वकिलाला झालेल्या मारहाणीबद्दल विचारले असता, बीडच्या विषयावर काय बोलायचे? असे म्हणून या विषयावर बोलण्यास टाळले.

स्थानिकांनी समन्वयातून मिटवावेत
श्रीगोंदे शहरातील संत शेख महंमद बाबा यांच्या देवस्थानासंदर्भात वाद-विवाद सुरू आहे. श्रीगोंदे येथे या विषयावर बंद ही पाळण्यात आले होते. विखे म्हणाले की, बंद पाळून किंवा बाहेरच्या व्यक्तीने हस्तक्षेप केल्याने हे विषय मिटणार नाही. स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन समन्वयातून या विषयावर मार्ग काढला पाहिजे.

कोणी एकत्र आल्याने फरक पडत नाही
उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कोणी एकत्र आल्याने काही बदल होणार नाही. आतापर्यंत कित्येक जण एकत्र आले आणि वेगळे ही झाले. त्यामुळे राजकीय परिस्थिती बदलत नसते. राज्यातील निवडणुकीत जनतेने महायुतीवर विश्वास व्यक्त केला आहे आणि दिवसेंदिवस हा विश्वास अधिक दृढ होत आहे.

Ahilyanagar : शाळा समित्यांचे एकत्रिकरण; मुख्याध्यापक, शिक्षकांचा भार होणार हलका

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शाळा स्तरावर असणार्‍या विविध 15 समित्यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळा पातळीवर असणार्‍या काही समित्यांच्या कामकाज व शाळा व्यवस्थापन समितीच्या कामकाज यांच्यात समानता आढळून येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. यामुळे या समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. यामुळे आता मुख्याध्यापक व शिक्षक यांना अध्ययन, अध्यापनासाठी व शालेय कामकाजासाठी अधिकचा वेळ उपलब्ध होणार आहे.

शासनाने शाळास्तरावरील 15 विविध समित्यांचे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एकत्रीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी विचारविनिमय करून याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रारूप तयार करण्यात आले होते. हे प्रारूप शासनास सादर करण्यात आले. त्यानुसार शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

यापुढे शाळा व्यवस्थापन समिती, माता- पालक संघ, पालक-शिक्षक संघ, शालेय पोषण आहार योजना समिती, नवभारत साक्षरता समिती, तंबाखू संनियंत्रण समिती, एसक्यूएएएफ स्वयंमूल्यांक समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, तक्रार पेटी समिती, शाळा बांधकाम समिती, परिवहन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती या 15 समित्याचे शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती/अंतर्गत तक्रार समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अशा केवळ चार समित्या ठेवण्यात आल्या आहेत.

शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याच्या निर्णयाचे शासन पातळीवरुन स्वागतार्ह करण्यात आले. यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या विविध बैठका घेण्यात जाणारा वेळ वाचणार असून यामुळे अध्यापनासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे. शासन जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने घेत असलेले निर्णय सकारात्मक असून शिक्षकांची अवांतर कामे कमी करण्यासाठी संघटना शासन स्तरावर प्रयत्नशील असल्याचे शिक्षक संघटनाच्यावतीने सांगण्यात आले.

Crime News : टाकळीभान येथे टोळीयुध्दाचा भडका

0

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

गेल्या काही दिवसांपासून गौणखनिज उत्खनणावरुन खदखदत असलेल्या टोळीयुध्दाचा टाकळीभान येथे अखेर भडका उडाला. या हाणामारीत एक जण जखमी झाला असून याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. जखमीवर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टाकळीभान येथे गेल्या काही दिवसांपासून गौणखनिज उत्खनन जोमात सुरु आहे. या धंद्यात दोन तीन टोळ्या कार्यरत असल्याने व्यवसायीक स्पर्धेतून अधून-मधून धुसफुस सुरु असते. मात्र, काल या टोळीयुध्दाचा भडका सार्वजनिक ठिकाणी उडाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या हाणामारीत तुषार पवार हा तरुण जखमी झाला असून त्याच्या वाहनाची हल्लेखोरांनी तोडफोड केली आहे.

याबाबत तुषार बाळासाहेब पवार (वय 26) धंदा शेती, रा. पाचेगाव ता.नेवासा यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादित म्हटले आहे की, लाला उर्फ विजय किशोर मैड, मनोज यशवंत पवार, विठ्ठल पुंजाहारी जाधव, संकेत सर्जेराव गायकवाड सर्व रा. टाकळीभान, ता.श्रीरामपूर यांनी फिर्यादी हे टाकळीभान येथील अक्षय बनकर येथील भेळीचे दुकानावर भेळ घेण्यास गेले असता तेथे आरोपी त्यांना म्हणाले की तू बाहेर गावातून येवून येथे मुरुम व्यवसाय करतो काय? तुझ्याकडे पहातो असे म्हणून आरोपी लाला उर्फ विजय किशोर मैड याने हातातील गावठी कट्ट्यासारखे हत्याराने, आरोपी मनोज यशवंत पवार याने तलवारीने मारले, आरोपी विठ्ठल पुंजाहारी जाधव याने हातातील लोखंडी रॉडने तर आरोपी संकेत सर्जेराव गायकवाड याने त्याच्या हातातील धारदार कत्तीने मारहाण केली. आरोपी इतर दोन ते तीन अनोळखी इसमांनी शिवीगाळ करुन त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करुन फिर्यादीच्या स्विप्ट कारच्या काचा फोडून नुकसान केले.

या प्रकरणी आरोपीं विरोधात भारतीय न्याय संहिता कायदा कलम 109, 189(2), 189(4), 191(3), 190, 351(2) (3), 35 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे लोणी प्रवरा हॉस्पिटल येथे औषधोपचार घेत असून त्यांनी दिलेल्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. डौले करीत आहेत.

Ahilyanagar : अवैध धंद्यांंविरोधात मोहिम सुरू करा – पालकमंत्री विखे पाटील

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीसाठी आ. काशिनाथ दाते, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, अंमली पदार्थांची विक्री करणार्‍यांवर कठोरपणे कारवाई करावी. अवैध शस्त्रे आणि गुटखा विक्रीलाही पायाबंद घालण्यासाठी मोहीमस्तरावर कारवाई करावी.

काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई करावी. लहान अक्षरातील नंबर प्लेट लावलेल्या वाहनांवरदेखील दंडात्मक कारवाई करावी. जिल्ह्यात कोणताही अवैध व्यवसाय सुरु राहणार नाही याची दक्षता घ्यावी, शासनाचे पोलीस दलाला या कारवाईत पूर्णपणे सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण राखण्यासाठी अशी कारवाई गरजेची असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. क्रीडा मार्गदर्शकाचा जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या धनुर्विद्या प्रशिक्षक शुभांगी रुपडे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या वेटलिफ्टिंग खेळाडू कोमल वाकडे, कबड्डी खेळाडू शंकर गदाई यांचा पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कबड्डी खेळाडू अस्लम इनामदार याच्या भावाने सन्मान स्वीकारला. चारही खेळाडूंनी अतिशय कष्टाने साध्य केलेले यश खूप महत्वपूर्ण आहे.

एकाचवेळी जिल्ह्यातील चार खेळाडूचा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान व्हावा ही बाब अतिशय भूषणावह असून या यशाने जिल्ह्याच्या क्रिडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळेल आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राला सर्वतोपरी मदत शासन स्तरावरून करण्यात येत असून यापुर्वी राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी मॅटची उपलब्धता करून देण्यात आली होती. शहरातील क्रीडा संकुलाला निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याने सर्व सुविधांनी परीपूर्ण असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल तयार होईल आशी ग्वाही त्यांनी दिली.

Shrigonda : मंदिराची वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करा; श्रीगोंदा ग्रामस्थांचा ठराव

0

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

शहराचे ग्रामदैवत संत श्री शेख महंमद महाराज यांच्या मंदिराची वक्फ बोर्डाकडे करण्यात आलेली नोंदणी रद्द करावी तोपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चा होणार नाही असा ठराव शनिवारी(दि.19) गावकर्‍यांनी एकमताने मान्य करत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर जीर्णोद्धारासाठी आणि दर्गाह ट्रस्टच्या विरोधात गावकर्‍यांनी, वारकर्‍यांनी पुकारलेल्या बंद शनिवारी मागे घेण्यात आला. पण, तोडगा निघेपर्यंत तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले धरणे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

जेष्ठ नेते घनश्याम आण्णा शेलार म्हणाले, संत शेख महंमद महाराज मंदिराची नोंदणी दर्गा ट्रस्टने वक्फ बोर्डाकडे केली आहे ती रद्द करण्यात यावी. दर्गा ट्रस्ट नावाऐवजी देवस्थान असा बदल करता येईल पण वक्फकडे दर्गाचे देवस्थान कसे होईल? असा सवाल त्यांनी केला. वारकरी, गावकर्‍यांची संत शेख महमंद महाराज यांच्यावर मोठी श्रद्धा आहे. आमीन शेख यांनी 2008 साली चुकीचे पुस्तक लिहल्याने वाद झाला होता. त्यांनतर मंदीर वक्फ बोर्डाकडे नोंदणी केली आहे. हे कुणाला मान्य नाही. संत शेख महंमद यांनी संजीवन समाधी घेतली. संत शेख महंमद हे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक आहेत, असे शेलार म्हणाले.

यावेळी माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्यासाठी सरकारकडे आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. यावेळी बाळासाहेब नाहटा, व्यापारी असोसिएशनचे सतीश बोरा, प्रा.बाळासाहेब बळे, राहुल कोठारी, अमोल दंडनाईक, चंद्रकांत कोथिंबीरे, विजय मुथा, सुदाम झुंजरुक यात्रा समिती अध्यक्ष गोपाळ मोटे आदी उपस्थित होते.

जीर्णोद्धारास विरोध नाही
दरम्यान, शेख महंमद बाबा देवस्थान जीर्णोद्धारास आमचा विरोध नाही. माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून देवस्थान सुशोभीकरणही केले आहे. पेव्हिंग ब्लॉक, हायमॅक्स दिवे, अशी विविध कामे लोकवर्गणीसह ट्रस्टच्या माध्यमातून केली आहेत. मात्र, आमच्यावर विकास कामात अडथळा आणल्याचा खोटा आरोप केला जात आहे, अशी माहिती सुफी हजरत शेख महंमद बाबा ट्रस्टचे अध्यक्ष व शेख महंमद बाबा यांचे वंशज आमीन शेख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली. संत शेख महंमद महाराजांचे मंदिर बांधण्यासाठी त्यांच्या समाधी स्थळाभोवतालची जागा मोकळी करून मिळावी. तसेच, या समाधीस्थळाचा ताबा सांगणारा ट्रस्ट बरखास्त करावा, या मागणीसाठी श्रीगोंदा शहरात गुरुवारी (दि.17) बंद पाळून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अनेकांनी अमीन शेख यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. शुक्रवारी (दि.18) प्रसिद्धी पत्रकाद्वारे शेख यांनी त्यांची भूमिका मांडली.

Crime News : उंबरे बसस्थानकावर दोन गटात धुमश्चक्री

0

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील उंबरे येथील बसस्थानकावर दोन गटात चांगली धुमचक्री झाली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून यामध्ये एकूण बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार दि. 18 एप्रिल रोजी घडली आहे.

याबाबत अक्षय भाऊसाहेब काळे (वय 28 वर्षे), रा.उंबरे, ता. राहुरी, या तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, उंबरे येथील राजेंद्र नामदेव ढोकणे यांचे विरुध्द अक्षय काळे याचे वडील भाऊसाहेब काळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीचा राग राजेंद्र नामदेव ढोकणे यांना आला. दि. 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास अक्षय काळे हा उंबरे गावातील बसस्थानक येथे उभा होता. त्यावेळी आरोपी काळ्या रंगाची स्कॉर्पओ गाडी क्रमांक एम. एच. 20- 5005 मध्ये बसून आले. त्यांनी काही न बोलता अक्षय काळे या तरुणाला हॉकी स्टीक, फायबरची काठी, लाकडी दांडा व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आकाश ढोकणे याने अक्षय काळे याच्या खिशातील मोबाईल व प्रविण शिरसाठ याने पॅन्टच्या खिशातील 10 हजार 500 रुपये काढुन घेतले. तसेच भाऊसाहेब काळे यांना देखील आरोपींनी मारहाण केली.

अक्षय भाऊसाहेब काळे याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी प्रविण शिरसाठ, रा. देसवंडी, ता. राहुरी, सुनिल आप्पासाहेब दुशिंग, राजेंद्र नामदेव ढोकणे, आकाश राजेंद्र ढोकणे, दिपक गोरक्षनाथ ढोकणे, सर्व रा. उंबरे, ता. राहुरी, अक्षय सोडनर, रा. तमनर आखाडा, ता. राहुरी, साहेबराव चौधरी व जगन्नाथ चौधरी, दोघे रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी, या आठ जणांवर गु.र.नं. 428/2025 भारतीय न्याय संहिता कलम 115 (2), 118 (1), 119 (1), 189 (1), 189 (2), 190, 191 (2), 191 (3), 351 (2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच अक्षय सुधाकर सोडनर, रा. पिंप्री अवघड या ढंपर चालकाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, दि. 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अक्षय सोडनर हा ढंपरमध्ये डिझेल भरण्यासाठी उंबरे बसस्थानकापासून जात होता. तेव्हा अक्षय काळे याने ढंपर थांबविला आणि म्हणाला, तू मला उसने दिलेले 7 हजार 800 रुपये तुला कधीच देणार नाही, ते तू मागू नकोस आणि परत उंबरे गावात दिसायचे नाही. तेव्हा अक्षय सोडनर त्यास म्हणाला, माझे ते कामाचे पैसे आहे, ते तु मला दे. तेव्हा अक्षय काळे व इतर आरोपींनी अक्षय सोडनर याला शिवीगाळ दमदाटी करून लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आणि त्याच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चैन व पॅन्टचे खिशातील 2 हजार 200 रुपये काढुन घेतले. तसेच संगीता काळे ही म्हणाली, मी माझ्या नवर्‍याला औषध पाजुन मारुन टाकुन तुझ्या नावाने चिठ्ठी लिहुन ठेवील, अशी धमकी दिली.

अक्षय सुधाकर सोडनर याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अक्षय भाऊसाहेब काळे, भाऊसाहेब दशरथ काळे, संदिप भाऊसाहेब काळे, संगीता भाऊसाहेब काळे, सर्व रा. उंबरे, ता. राहुरी, या चार जणांवर गु.र.न. 426/2025 भारतीय न्याय संहिता कलम 115 (2), 118 (1), 119 (1), 3 (5), 351 (2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

Shrirampur : आश्वासन पूर्ती न करणार्‍या फसव्या सरकारवर गुन्हा दाखल करा

0

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने हा जाहीरनामा फसवा असून सरकार अस्तित्वात आणल्यानंतर व पदभार स्वीकारल्यानंतर सोयीस्कररित्या कर्जमुक्ती या विषयाला बगल देऊन शेतकर्‍यांची फसवणूक केली असून कायदेशीर मार्गाने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्यावर शेतकरी संघटनेच्या वतीने कलम 171, 316 (2) 318 (4), 3 (5) याप्रमाणे गुन्हा दाखल करावा, असे निवेदन शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष युवराज जगताप यांच्यासह शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी रॉबिन बंसल यांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे. मी पिकवलेल्या शेतमालाला गेल्या पंधरा वर्षापासून राज्य व केंद्र सरकारने उत्पादन खर्च भरून निघेल इतका भाव मिळवून दिला नाही. अथवा मी करत असलेल्या व्यवसायाला कुठलीही संरक्षण न देता माझ्या व्यवसायाच्या विरोधी धोरणे घेतली असल्याने शेतकरी कर्ज भरूच शकत नाही. माझी कर्ज भरण्याची इच्छा असूनही सातत्याने शेती उत्पादन तोट्यात विकत असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड.अजित काळे, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप, साहेबराव चोरमल, अ‍ॅड.सर्जेराव घोडे, नरेंद्र काळे, संतोष पठारे, सुजित बोडखे, बाळासाहेब आसने, सुनील आसने, अ‍ॅड. प्रशांत कापसे, जिल्हा कृती समितीचे राजेंद्र लांडगे, बाबासाहेब वेताळ, सचिन वेताळ, बापूसाहेब गोरे, अभिषेक वेताळ, राहुल कापसे, महेश आघाडे, दीपक धिरडे, बबनराव नाईक यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. काळे म्हणाले, मी उच्च न्यायालय संभाजीनगरमध्ये 32 वर्षे वकिल म्हणून काम केले. याबाबत मी गेली पंधरा दिवस कायद्याचा बारकाईने भारतीय दंड संहिता कायद्याचा अभ्यास करून राज्यातील शेतकर्‍यांच्या आर्थिक हित रक्षणार्थ फिर्याद केली आहे. अशा फिर्यादी राज्यातील लाखो थकीत कर्ज असलेले शेतकरी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार असून याबाबत पोलीस प्रशासनाने भूमिका न घेतल्यास आपण उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सदर फिर्यादी संबंधितांवर दाखल करणे कामी न्यायालयात दाद मागणार आहोत. ज्या कर्ज थकबाकीदार शेतकर्‍यांना बँकांनी न्यायालयात दावे दाखल केली आहे. अशा न्यायप्रविष्ठ कर्ज खातेदारांनी विहित नमुन्यातील फिर्यादी वचननामा दिलेल्या पक्षांच्या प्रतिनिधींच्या नावे दाखल कराव्यात, असे आवाहन अ‍ॅड. काळे यांनी केले.

Crime News : अनैर्गिक अत्याचार करणारे सहाजण अटकेत

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मित्राच्या घरातून विद्यार्थ्याला उचलून नेऊन त्याच्यावर केडगाव नेप्ती मार्केटजवळ अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी सहाजणांना अटक केली. त्यांना शनिवारी (दि.19) जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, अन्य पाच आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

रावण साम्राज्य ग्रुपचा अध्यक्ष मयूर अनिल आगे, शाहरुख अन्सार पठाण, ओमकार उर्फ भैया राहिंज, रोहित पंडागळे, सोनू बारहाते, ऋषिकेश सातपुते (सर्व रा. केडगाव) अशी आरोपींची नावे आहेत. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीनंतर पीडित विद्यार्थी हा नेप्ती रोडवरील त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. त्यानंतर रात्री तिथे वरील आरोपी व त्यांचे 6 साथीदार मोटारकार व दुचाकीवर आले. त्यांनी त्याला घरातच मारहाण केली. सोडविण्यासाठी आलेल्या मित्राला व त्याच्या वडिलांनाही मारहाण केली. पीडिताला घराबाहेर ओढत नेऊन नेप्ती मार्केटयार्ड जवळील मोकळ्या मैदानात नेले.

तिथे मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर तीन दिवसांनंतर कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल होताच सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी तत्काळ गुन्ह्यातील मुख्य आरोपी मयुर आगे याच्यासह सहाजणांना अटक केली. शनिवारी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले. गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध घेऊन अटक करावयाची आहे. आरोपींनी गुन्हा नेमका कोणत्या हेतूने केला याबाबत विचारपूस करायची आहे. गुन्ह्यातील स्कार्पिओ, गळा आवलेला पंचा जप्त करावयाचा आहे. त्यासाठी आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी तपासी अधिकारी कुणाल सपकाळे यांनी केली.

त्यावर न्यायालयाने आरोपींना 23 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली.दरम्यान, पीडित विद्यार्थ्याबरोबर मारहाण झालेल्या अन्य एका अल्पवयीन मुलाचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. तर, ज्या मित्रांच्या घरातून उचलून नेले. त्याचा आणि त्याच्या वडिलांचाही जबाब पोलिसांनी घेतला आहे.

आरोपींची परिसरात दहशत
14 एप्रिलला घटना घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्यांने तीन दिवसांनंतर पोलिसांत फिर्याद दिली. तर, पीडित विद्यार्थ्यांबरोबर अन्य दोन अल्पवयीन मुलांनाही आरोपीने मारहाण केली. मात्र, तेही तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे आले नाही. पीडित विद्यार्थ्यांला मित्राच्या घरातून उचलून नेले. तो मित्र व त्याचे वडीलही पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आले नाही, कारण आरोपींची त्या परिसरात प्रचंड दहशत असल्याचे बोलले जाते.

बिबट्या समोर येताच दुचाकीस्वाराने लढविली शक्कल आणि बिबट्या…

0

सिन्नर | प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून डुबेरे परिसरातील शेतकरी, रहिवाशी बिबट्यांच्या दहशतीखाली वावरत असून शुक्रवारी (दि.18) रात्री 9 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष नामदेव पावसे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले.

शेंद्री बंधारा ते वामनवाडी परिसरापर्यंत झाडीने व्यापलेला रस्ता असून या रस्त्याची अतिशय दैयनिय अवस्था झालेली आहे. खड्ड्यांनी व्यापलेल्या रस्त्यातून मार्ग काढत मोटारसायकलवर पावसे हे नेहमीप्रमाणे सिन्नरहून आपले काम आटोपून घराकडे जात होते. शेंद्री बंधार्‍याजवळ 9 वाजेच्या दरम्यान अचानक बिबट्या त्यांच्या मोटारसायकलसमोर आला.

बिबट्याला बघून पावसे यांची त्रेधातिरपीट उडाली. ते जागेवर थबकले. बिबट्या त्यांच्या अंगावर झेपावणार तेवढ्यात त्यांनी जागेवरच मोटारसायकलचे एक्सलेटर पूर्णपणे पिळून धरले, दरम्यान मोटारसायकलचे एक्सलेटर पूर्ण दिल्याने मोटारसायकलचा मोठ्याने आवाज सुरु झाला व आवाज ऐकून बिबट्या गोटीराम वारुंगसे यांच्या मकाच्या शेतात पळाला.

घामाघूम झालेल्या पावसे यांनी वारुंगसे यांना आवाज देत बिबट्या शेतात शिरला असल्याचे सांगितले. गोटीराम यांच्यासह निवृत्ती कोंडाजी वारुंगसे, मिना निवृत्ती वारुंगसे पळतच घराबाहेर आले. त्यांनी मक्याच्या शेताजवळ फटाके फोडल्याने बिबट्याने आटकवडेच्या बाजूने धूम ठोकली.

गेल्या दोन दिवसांपूर्वी दिनकर वामने यांच्या वासराला बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. तर भगवान वारुंगसे यांचा पाळीव कुत्रा बिबट्याने फस्त केला आहे. मधुकर गंगाराम ढोली हे ट्रॅक्टरने शेताची नांगरणी करत असतांना त्यांनाही अगदी जवळून तीन बिबट्यांनी दर्शन दिले आहे. बिबट्यांच्या या मुक्त संचाराने परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून एखादा अनूचित प्रकार घडण्यापूर्वीच वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.