Sunday, May 4, 2025
Home Blog Page 34

विजेच्या खांबावरून पडून तरुणाचा मृत्यू

0

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

एका खासगी कंपनीच्या सबस्टेशनमध्ये खांबावर चढलेल्या बाळेवाडीच्या राहुल निवृत्ती पालवे या तरुणास विजेचा जोरदार धक्का लागून जमिनीवर कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. राहुल हा अकुशल कामगार असताना त्याला सबस्टेशनमधील खांबावर का चढविले? असा सवाल करीत ग्रामस्थांनी सबस्टेशनजवळच ठिय्या दिला. दरम्यान, संतापलेल्या ग्रामस्थांनी सबस्टेशनला टाळे ठोकले. त्यामुळे घाबरलेल्या कंपनीच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी तेथून पळ काढला.

या खासगी कंपनीचे नगर तालुक्यातील बाळेवाडी शिवारात डोंगरात सबस्टेशन आहे. दोन महिन्यांपूर्वीच येथे अकुशल कामगार म्हणून राहुल निवृत्ती पालवे (वय 25 वर्षे) रा.बाळेवाडी, ता.नगर या तरुणास या सबस्टेशनवर कामास घेतले होते. शुक्रवारी (दि.18) दुपारी तीन वाजता राहुल यास अधिकार्‍याने पोलवर चढण्यास सांगितले.

विजेचा पुरवठा चालू असताना कोणतीही काळजी न घेतल्याने राहुल यास विजेचा तिव्र धक्का बसताच तो उंच टॉवरवरून जमिनीवर कोसळताच त्याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री उशीरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी सकाळीच बाळेवाडी ग्रामस्थांनी कंपनीच्या सबस्टेशनवर ठिय्या देऊन निषेध केला. यावेळी सबस्टेशनवरील कर्मचार्‍यांनी सबस्टेशन सोडून पळ काढला. त्या सबस्टेशनवर एकच सुरक्षारक्षक हजर असल्याचे समजले.

भटक्या कुत्र्यांचा चार जणांवर हल्ला

0

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिकरोड परिसरात विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी चार जणांवर हल्ला करून त्यांना चावा घेतल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रविवारी चार जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. त्यामध्ये देवंशी सोरे या बालिकेसह मनसेना शहर उपाध्यक्ष अ‍ॅड. नितीन पंडित, सतीश चंदनशिवे, राज पिंजारी यांचा समावेश आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे.

नाशिकरोड येथील डावखरवाडी, पंचम सोसायटी, सद्गुरु नगर आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिक व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले असून यापूर्वी सुद्धा भटक्या कुत्र्यांनी जेलरोड परिसरात थैमान घातले होते. तसेच जेलरोड परिसरातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे रात्री आठ वाजेनंतर घराबाहेर सुद्धा निघत नव्हते . आता पुन्हा डावखरवाडी व परिसरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.

या संदर्भात महापालिकेला वेळोवेळी कळवून देखील महापालिका कार्यवाही करत नसल्याचा नागरिकांची आरोप आहे. भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. सकाळी क्लासला जाणारी मुले, फिरायला जाणारे नागरिकांना या भटक्या कुत्र्यांचा जाच होत आहे.

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनास अपघात; १३ वर्‍हाडी जखमी

0

सापुतारा | वार्ताहर Saputara

डांग जिल्ह्यातील सापुतारा घाटात लग्नाचे वऱ्हाड भरलेला पिकअप उलटल्याने 13 जण जखमी झाले.  नाशिक जिल्ह्यातील माणिकपुंज येथून सापुताराच्या पायथ्याशी असलेल्या मालेगाम येथे एका लग्नाचा वराड घेऊन जात असताना सापुतारा घाट रस्त्यावर एक पिकअप उलटल्याने गंभीर अपघात झाला.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथून एक पिकअप (एम.एच.02.ई. आर.9708) सापुताराच्या पायथ्याशी असलेल्या मालेगाम येथे 15 हून अधिक लोक लग्नासाठी निघाले होते. आणि पिकअप गाडीचा चालक गणेश चंदू थोरात यांनी महाराष्ट्र आणि सापुताराच्या सीमेजवळ असलेल्या थानापाडा गावाजवळ चहा, पाणी आणि नाश्ता घेण्यासाठी पिकअप गाडी थांबवली होती. त्यावेळी एक भाऊ त्यांना भेटायला आला. आणि ड्रायव्हरला सांगितले की समोर पोलिस उभे आहेत. तर मला पिकअप गाडी चालवायला दया म्हणून त्याला थानापाडा येथून पिकअप गाडी चालवली. ज्यामध्ये तो सापुतारा चेकपोस्ट पार करून सापुतारा ते शामगहानला जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या सापुतारा घाट मार्गावर पोहोचला आणि गणेश मंदिराजवळील वळणावर चालक स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप घटनास्थळीच पलटी झाली

सापुतारा घाटमार्गावर वराड भरलेला पिकअप अचानक उलटला आणि पिकअप मध्ये बसलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण वातावरण दुमदुमले. पिकअप उलटल्याची माहिती मिळताच, सापुतारा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रस्त्याने जाणार्‍या वाहनचालकांनी आणि पोलिस पथकाने मदत केली आणि जखमींना तात्काळ उपचारासाठी शामगहान सीएचसीमध्ये नेले.

या अपघातात (1) सविता भावसाहेब वाघ (2) वैशाली सुनील सेलके (3) ओम सुनील सेलके (4) गणेश रंगनाथ जाधव (5) रंगनाथ जगन्नाथ तुपे (6) राजेंद्र नाना डेळेकर (7) दीपक दादासाहेब गोडसे (8) संगिता उज्जैन वाघ (9) संगिता उज्जैन वाघ (ता. 9) हे जखमी झाले. (11) ज्ञानेश्वर वाघ (12) सुनील सेलके (13) वैशाली सेलके, माणिकपुंज, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक, शामगव्हाण सीएचसी येथे उपचारासाठी हलविण्यात आले.  5 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे आढळून आले, त्यापैकी  4 जणांना पुढील उपचारांसाठी आहवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.  तर एका जखमी व्यक्तीला खाजगी वाहनातून नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी सापुतारा पोलिस पथकाने गुन्हा दाखल केला आहे .

एसटी कार्यशाळेत आग; अकरा वाहने जळून खाक

0

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

पेठ रोडवरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत रविवारी (दि. २० एप्रिल) दुपारी अचानक आग लागण्याची घटना घडली. या भीषण आगीत आरटीओ कडून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली तब्बल अकरा वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये नऊ रिक्षा, एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक स्विफ्ट डिझायर कार यांचा समावेश आहे.

आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट असून , प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.पेठ रोड परिसरातील ही कार्यशाळा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची असून, त्याच्या आवारातच आरटीओ विभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आलेली वाहने एका बाजूला उभी करण्यात येतात. याच मोकळ्या जागेत रविवारी दुपारी अचानक धुराचे लोट दिसून आले. काही वेळातच झाडांच्या पाचोळ्याने पेट घेतल्याने आग पसरत जाऊन जवळ उभ्या असलेल्या वाहनांनी पेट घेतला.

सदरची परिस्थिती कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली.माहिती मिळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली.जवानांनी अथक प्रयत्न करून काही वेळातच आग आटोक्यात आणली.

घटनेच्या वेळी पंचवटी अग्निशमन दलाचे प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे, तसेच जवान संतोष मेहेंदरे, मनोहर गायकवाड, विजय शिंदे, विजय पाटील यांच्यासह इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझविण्याचे काम हाती घेतले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरीही जळून खाक झालेली वाहने ही आरटीओ विभागाने कारवाईनंतर जप्त केलेली असल्यामुळे त्यासंदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच याबाबत स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता आहे.

 

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 1500 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 2075 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1200 ते 1500 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 800 ते 1150 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 ते 950 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 ते 400 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 211 क्रेटस ची आवक झाली. डाळिंब नंबर (Pomegranate) 1 ला 86 ते 113 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 61 ते 85 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 60 रूपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 5 ते 35 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

Newasa : जळके शिवारात तीन ब्रास वाळूसह डंपर पकडला

0

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) नेवासा तालुक्यातील जळके शिवारात अवैध वाळू वाहतुकीवर (Illegal Sand Transport) कारवाई करून तीन ब्रास वाळूसह डंपर (Dumper) पकडला. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल बाळासाहेब खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि. 20 रोजी पोलीस पथक व दोन पंच सलाबतपूर ते प्रवारासंगम गावात जाणारे रोडलगत असलेल्या जळके खुर्द (Javalake Khurd) गावच्या शिवारात थांबलो असता पहाटे 4:10 वाजेचे सुमारास आम्हास सलाबतपूर कडून प्रवरासंगम गावाच्या दिशेन जाताना एक हिरवा लाल रंगाचा टाटा कंपनीचा डंपर येताना दिसला.

सदर वाहनास हात करुन व बॅटरीचे सहाय्याने इशारा करुन थांबविण्याचा इशारा केला असता सदर वाहनावरील चालकाने त्याचे वाहन रोडचे कडेला थांबविले. तेव्हा त्यास आम्ही आमची व पंचाची ओळख समजावुन सांगुन सदर डंपरची पाहणी केली असता सदर डंपरच्या (एमएच 12 सीटी 0540) मागील हौदामध्ये वाळू (Sand) मिळून आली. चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने अशोक लक्ष्मण कदम (वय 36 धंदा शेती, रा. नेवासा खुर्द) असे असल्याचे सांगितले.

डंपर कोणाच्या मालकीचा आहे तसेच वाळृ वाहतुकीचा परवाना आहे काय याबाबत विचारपूस केली असता त्याने सदर डंपर सागर खंडागळे (पूर्ण माहित नाही) रा.सुरेशनगर ता. नेवासा याचे असल्याचे सांगून वाळु वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. सदर वाहनांची पंचासमक्ष पाहणी केली असता 10 लाख रुपये किंमतीचा डंपर व 30 हजार रुपये किंमतीची 3 ब्रास वाळू असा एकूण 10 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पोलीस नाईक बाळासाहेब नागरगोजे यांनी पंचांसमक्ष जप्त केला.

या फिर्यादीवरून डंपर चालक अशोक लक्ष्मण कदम व मालक सागर खंडागळे हे चोरटी वाळुची वाहतुक करताना मिळून आले म्हणून त्यांचेविरुद्ध बीएनएस कलम 303 (2), 3 (5) प्रमाणे नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Simhastha Kumbh Mela 2027: आगामी सिंहस्थ कुंभमेळा तयारीचा मुख्यमंत्री घेणार आढावा; उद्या मंत्रालयात बैठक

0

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थात महत्वपूर्ण ठरणाऱ्या रिंगरोडच्या कामाचे सादरीकरण सोमवार दि.21 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर संबंधित विभागाकडून करण्यात येणार आहे.

या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री उपस्थित राहणार आहेत.

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. सिंहस्थाच्या नियोजनासाठी बैठका घेण्यात येत आहेत. मात्र अंतिम आराखड्याला मंजुरी मिळत नसल्याने सिंहस्थाची कामे प्रत्यक्षात सुरू होण्यास विलंब होत आहेत. त्यातच सर्वाधिक वेळ लागणारा आणि सर्वाधिक खर्चिक प्रकल्प रिंगरोडचा आहे. दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाममंत्री असताना बाह्य रिंगरोडचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.

तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रिंगरोडचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला एमएसआरडीसी सादर केला होता. एमएसआरडीसीने या प्रकल्पासाठी पुण्यातील मोनार्क या सल्लागार संस्थेमार्फत सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे.

मोनार्क या सल्लागार संस्थेने महापालिका हद्दीतून जाणाऱ्या पाथर्डी ते आडगाव दरम्यान ६० मीटर रुंदीचा बाह्य रिंगरोड, तसेच आडगाव ते गरवारे पॉइंट या दरम्यान ३६ मीटर रुंदीचा बाह्य रिंगरोडचे सर्वेक्षण करून अहवाल सादर केला होता. नवीन भूसंपादन कायद्यानुसार मनपा हद्दीत रिंगरोडसाठी भूसंपादन मोबदल्यापोटी अडीच हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

हा खर्च जास्त असल्याने मोनार्क कंपनीने एनएमआरडीएच्या हद्दीतही सर्वेक्षण केले होते. बीओटीवर रिंगरोड उभारणीचा प्रस्ताव कंपनीने एमएसआरडीसीला दिला होता. या दोन्ही प्रस्तावांचे सादरीकरण मुख्यमंत्री फडणवीसांसमोर केले जाणार आहे.

 

Nashik News : हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद; तेवीस वर्षीय युवकाची हत्या

0

पिंपळगाव । वार्ताहर Pimpalgaon Basvant

पिंपळगाव बसवंत येथील जोपुळ रोड बाजार समिती समोरील वस्तीवर काल रात्री अकराच्या सुमारास लग्ना निमित्त हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यास नकार दिल्याने बाचाबाची झाली त्यात एकाचा खून झाला. रवि सोमनाथ गुंबाडे (वय.२३) असे मयताच नाव आहे.

मानेवर धारदार हत्याराने वार केल्याने अधिक रक्तश्राव झाल्याने मृत्यु झाला असुन या प्रकरणी पोलीसांनी पहाटे हेमंत परसुराम जाधव, जनार्धन झानेश्वर गांगुर्डे, रमेश मुरलीधर शेखरे,. सर्व राहणार अबिका नगर पिंपळगाव बसवंत यांना ताब्यात घेतले असुन मयत रवि गुंबाडे याच्यावर आज सकाळी पिंपळगाव बसवंत आरोग्य केंद्रात शवविछेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Nashik Crime : सुक्का गँगच्या सूत्रधारांचा शोध; चॅटिंग, मेसेज फॉरवर्ड करणारे रडारवर

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

काठेगल्लीत (Kathe Galli) मंगळवारी रात्री पोलिसांवर (Police) हल्ला केल्याच्या गुन्ह्यांत अटकेतील ३९ संशयितांना न्याययंत्रणेने शनिवारी (दि. १९) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ही दंगलसदृश स्थिती निर्माण करणाऱ्या सुक्का गँगच्या मास्टरमाईंडचा शोध पोलिसांकडून सुरु झाला आहे.

टवाळखोरांसह जमावाचे माथे भडकविणाऱ्या मास्टरमाईंड संशयितांचे (Suspected) शहरात विविध अवैध व्यवसाय असून एकाच गटात मोडणाऱ्या दुसऱ्या गटाने अनधिकृत धार्मिकस्थळ निष्कासित करण्याच्या कारवाईस आक्षेप घेत पोलिसांवर तुफान दगडफेक केली होती. त्यातच, आता ७७संशयित दुचाकींपैकी काही दुचाकी सखोल चौकशी व पडताळणीअंती मूळ मालकांना परत करण्यात आल्या आहेत.

काठेगल्लीत घडलेल्या या घटनेत २१ पोलीस अधिकारी व अंमलदार गंभीर जखमी झाले होते. अश्रूधुरांच्या सात नळकांड्या फोडून जमाव नियंत्रित केल्याने पुढील अनर्थ टळला होता. या घटनेनंतर पोलिसांनी धाडसत्र राबवून ३९ जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी पूर्ण झाली असून आता त्यांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

तर, तपास पथकाने पारंपरिक तपासासह तांत्रिक तपासावर विशेष भर दिला आहे. तर घटनास्थळी किती संशयितांचे मोबाईल अॅक्टिव्ह होते. त्यांच्या व्हॉटस् अॅपमधून चिथावणीचे मेसेज फॉरवर्ड करण्यात आले का?, संशयित कुठून आले होते? दगड मोठ्या प्रमाणात कसे उपलब्ध झाले, या सूक्ष्म बाबींचा तपास सुरु झाला आहे.

सुक्का गँग सीसीटीव्हीत कैद

सुक्का गँग अर्थात एकाच गटातील बेरोजगार मुले, टवाळखोर व नशा करणारे संशयित दगडफेक करताना काही सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांवर हल्ला करण्यापूर्वी जाणीवपूर्वक विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे या गँगच्या सूत्रधारांनी समाजकंटकांना चिथावणी दिल्याने हा गंभीर प्रकार घडवून आणल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आता चिथावणी देणाऱ्यांचा शोध सुरु झाला आहे. इतर तांत्रिक विश्लेषणातून उघड होणाऱ्या माहितीनुसार अटकसत्र सुरु राहील आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. तर, घटनेच्या दिवशी उस्मानिया चौक येथे रात्री बारा ते अडीच वाजेपर्यंत किती मोबाईल कसे अॅक्टिव्ह होते, त्यानुसार डम्प डाटा मिळविला जात आहे.

Nashik News : उत्पन्नवाढीसाठी मनपाचा नवा प्रयोग; घनकचरा युजेस चार्जेस आकारणीची तयारी

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक मनपाची (Nashik NMC) आर्थिक स्थिती कमजोर होत असल्याने उत्पन्न वाढीसाठी विविध प्रयोग केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता मनपा शहरातील नागरिकांवर घनकचरा युजेस चार्जेस आकारणीची तयारी करीत आहे. महापालिकेला विविध विकास योजना राबवण्यासाठी केंद्राच्या पंधराव्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त होतो. मात्र हा निधी हवा असेल तर मनपानेही आपले उत्पन्नांचे (Income) स्त्रोत वाढवावे, अशी अट आहे.

नाशिक मनपाला दर महिन्याला जीएसटीच्या (GST) मोबादल्यात सुमारे ११० कोटींची रक्कम मिळते, तर घरपट्टी, पाणीपट्टी, नगर नियोजन आदी विभागाकडून मनपाला उत्पन्न मिळते, मात्र शहराचा होत असलेला विकास व मनपाचा आस्थापना खर्च ४५ टक्क्यापर्यंत पोहोचल्याने विकासकामांसाठी पाहिजे त्या प्रमाणात निधी राहत नाही. एकूणच त्याचा परिणाम शहर विकासावर होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी मनपाने मोबाईल टॉवर व पार्किंग व्यवस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.

मनपाच्या इमारती, मोकळे भूखंड, रस्ता (Road) दुभाजके याठिकाणी पाचशे मोबाईल टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात शंभर टॉवर उभारले जाणार होते. त्याद्वारे वर्षाला २५ कोटी मिळणार होते. मात्र नागरिकांनी रेडिएशनचा मुद्दा उपस्थित करत टॉवरला विरोध केल्यामुळे ही योजना बारगळली आहे. तसेच मनपा वाहतूक शाखेने शहरात ३५ ठिकाणी पार्किंग स्थळांसाठी निविदा राबवली. नंतर हा वाद न्यायालयात (Court) गेल्याने पार्किंगच्या माध्यमातून मनपाला दहा कोटी उत्पन्नाची अपेक्षा होती. हा प्रकल्पही आता रखडला आहे.

मनपाकडून शहरात घंटागाडीद्वारे कचरा संकलन केला जातो. घनकचरा युजेस चार्जेस आकारण्याचा प्रयत्न मनपाने केला होता. परंतु विरोध होण्याची चिन्हे पाहता हा निर्णय होऊ शकला नाही.आता पुन्हा युजेस चार्जेस आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समजते. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन देखील सुरू झाले आहे.

भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

मनपा प्रशासन सामान्य नाशिककरांवर कचरा युजेस चार्जेस आकारण्याच्या तयारीत आहे, मात्र दुसरीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून होत आहे. माझ्या हातात असते तर उद्याच निवडणूक लावली असती, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. तर शहरात चार पैकी तीन आमदार भाजपचे असून मनपाने सामान्य नागरिकांवर जर युजेस चार्जेस लावले तर त्याचा फटका जर मनपा निवडणूक झाली तर भाजपला होऊ शकतो व विरोधक देखील हा मुद्दा घेऊ शकतात. म्हणून मनपा प्रशासनाच्या या निर्णयाला भाजपकडून साथ मिळते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.