Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 49

Nashik Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ५६ लाख उकळले

0
Nashik Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ५६ लाख उकळले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

व्हॉट्सअपवर लिंक (WhatsApp Link) पाठवून शेअर बाजारात गुंतवणूक (Investment) करण्यास प्रोत्साहित करीत भामट्यांनी शहरातील गुंतवणूकदारांना ५६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याच्यासह इतर गुंतवणूकदारांना चोरट्यांनी २० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान, गंडा घातला. गुंतवणूकदारांसोबत व्हॉट्सअपवरून संपर्क साधला. त्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करून गुंतवणूकीची माहिती दिली. त्यानंतर भामट्यांनी गुंतवणूकदारांना लिंक पाठवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. शेअर, आयपीओ खरेदी करण्याच्या बहाण्याने संशयितांनी गुंतवणूकदारांकडून ५६ लख रुपये घेतले. मात्र हे पैसे शेअर मार्केटमध्ये (Stock Market) न गुंतवता भामट्यांनी घेतले.

दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी सायबर पोलिसांकडे (Cyber Police) तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी (Police) तपास करुन केलेल्या आर्थिक व्यवहारांचा तपास करीत ९ लाख ८१ हजार रुपयांची रक्कम गोठवली आहे. तसेच सायबर पोलिस ठाण्यात ज्यांनी गुंतवणूकदारांसोबत संपर्क साधून गंडवले त्यांच्यासह ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्या खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Raj Thackeray on Hindi Language : “… तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ”; हिंदी भाषा सक्तीवरून राज ठाकरेंचा गर्भित इशारा

0

मुंबई | Mumbai

तमिळनाडू सरकारने केंद्राच्या त्रिभाषा सूत्राला जोरदार विरोध दर्शवला असताना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे सन २०२५-२६ पासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी, इंग्रजीबरोबरच हिंदी भाषाही (Hindi Language) सक्तीची करण्यात आली आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) शालेय अभ्यासक्रमात भाषासंवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असणार आहे. मात्र, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शालेय शिक्षणात इयत्ता पहिली पासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारला मोठा इशारा दिला आहे.

त्यांनी यासंदर्भात एक्सवर (ट्विट) पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये “आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर (Maharashtra) हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे”, असा इशाराच (Warning) राज ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले आहे?

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.

केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे.

प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्याघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.

आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.

आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेंव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेंव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय, अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत.

बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही.

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी.

प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का ? नाही ना ? मग ही जबरदस्ती इथेच का ? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे. पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत.

माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा ! आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील.

आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो !

आपला नम्र

राज ठाकरे ।

मोठी बातमी! नव्या वक्फ कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती; केंद्र सरकारला दिली सात दिवसांची मुदत

0

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

नव्या वक्फ कायद्याला (Waqf Act) सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारला (Central Government) उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, सरकारने परिस्थिती जैसे थेच ठेवावी असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी (Hearing) ५ मे रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नव्या वक्फ कायद्यामधील दोन तरतुदींना अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र, पूर्ण वक्फ कायद्याला न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलेली नाही. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा वेळ दिला आहे. त्याशिवाय या काळात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटले आहे की, सध्या या कायद्याबाबतची (Law) परिस्थिती तशीच राहील. पुढील आदेश येईपर्यंत वक्फ बोर्डात कोणतीही नियुक्ती केली जाणार नाही. केंद्र सरकारकडून प्रतिसाद येईपर्यंत वक्फ मालमत्ता तशीच राहील. पुढील सुनावणीपर्यंत जिल्हाधिकारी वक्फ मालमत्तेबाबत कोणताही आदेश जारी करणार नाहीत. असे न्यायालयाने (Court) या सुनावणीवेळी म्हटले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने वक्फ कायदा २०२५ ची अधिसूचना जारी केली होती. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी ५ एप्रिल २०२५ रोजी या विधेयकावर स्वाक्षरी करत त्याला मंजुरी दिली होती. हे विधेयक राज्यसभेत १२८ विरुद्ध ९५ अशा अल्प फरकाने मंजूर झाले होते. तर लोकसभेत ते ५६ मतांच्या आघाडीने मंजूर झाले होते. या प्रकरणाचा धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

कायदेतज्ज्ञ सिद्धार्थ शिंदे काय म्हणाले?

पुढील सुनावणी होईपर्यंत वक्फ बोर्डावर बाहेरच्या लोकांची नियुक्ती केली जाणार नाही. तसेच न्यायालयाने जी वक्फ प्रॉपर्टी जाहीर केली आहे, त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे सरकारने न्यायालयाला आश्वासीत केले आहे. तसेच न्यायालय आजच निर्णय घेणार होते, मात्र, केंद्र सरकारने आश्वासन दिल्यामुळे निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. दोन आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. न्यायालयाने म्हटले की, आमच्याकडे १५० च्या वर याचिका आहेत. त्यातील पाच याचिका न्यायालयासमोर ठेवणार आहोत, असे शिंदे यांनी म्हटले.

कोणत्या २ तरतुदीवर तात्पुरती स्थगिती?

१) वक्फ वापरत असलेली जमीन अथवा मालमत्तेची कोणताही अधिसूचना जारी करू नये.

२) वक्फ बोर्ड आणि परिषदांवर कोणतीही नियुक्ती करू नये.

IPL 2025 : MI vs SRH – मुंबईसमोर सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान; विजयी लय कायम राखण्यासाठी दोन्ही संघ सज्ज

0
IPL 2025 : MI vs SRH - मुंबईसमोर सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान; विजयी लय कायम राखण्यासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये गुरूवारी १७ एप्रिल २०२५ रोजी मुंबई इंडियन्स संघासमोर सनरायझर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) संघाचे आव्हान असणार आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्स (Pat Cummins) तसेच हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सामना खेळविण्यात येणार आहे.

आयपीएल (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामात दोन्ही संघांच्या कामगिरी बद्दल बोलायचे झाल्यास सातत्याचा अभाव दिसून आला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स विरूध्द विजय संपादन केला आहे. मात्र, कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स विरूध्द हैदराबाद संघाने पराभव स्वीकारला आहे.

दुसरीकडे मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स विरूध्द विजय (Win) संपादन केला आहे. मात्र, चेन्नई सुपरकिंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स विरूध्द मुंबई इंडियन्स संघाचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांमध्ये निर्णायक सामना खेळविण्यात येणार आहे. पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे विजयी लय कायम राखण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स सज्ज असणार आहेत.

आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये २३ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास मुंबई इंडियन्स ने १३ तर सनरायझर्स हैदराबाद ने १० सामन्यात विजय संपादन केला आहे. तर मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर ८ पैकी ६ सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय संपादन केला आहे. सनरायझर्स हैदराबादने २ सामन्यात विजय संपादन केला आहे. अखेरच्या सामन्यातील विजयामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे विजयी हॅट्रिक करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ (Team) सज्ज असणार आहेत.

Nashik News : धावत्या रेल्वेत काढता येणार एटीएममधून रोकड; देशात पहिला प्रयोग पंचवटी एक्स्प्रेसमध्ये

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रेल्वे प्रवासादरम्यान रोकडची चणचण भासल्यास धावत्या एक्स्प्रेसमध्ये एटीएमची (ATM) व्यवस्था करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याची सुरुवात पंचवटी एक्स्प्रेसपासून (Panchavati Express) करण्यात येणार असून हा देशातील पहिला प्रयोग असल्याची माहिती रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मनमाड शहरात (Manmad City) असलेल्या रेल्वे वर्कशॉपमध्ये पंचवटी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात एटीएम बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच प्रवाशांना पंचवटी एक्स्प्रेसमध्ये एटीएम सुविधा मिळणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रेल्वेतदेखील प्रवाशांना एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रवासादरम्यान (Journey) प्रवासी मोजके पैसे घेऊन बाहेर पडतो. त्यामुळे अनेक वेळा त्याला जास्त रोकडची गरज भासल्यास त्याला ट्रेनमधून उतरून प्लॅटफॉर्म किंवा स्टेशनच्या बाहेर जाऊन एटीएममधून पैसे काढण्याची वेळ येते. अनेक वेळा गाडीदेखील सोडावी लागते. प्रवाशांची ही अडचणवजा गरज लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने धावत्या ट्रेनमध्ये एटीएम बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांना (Passengers) धावत्या गाडीत एटीएमची सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व प्रथम मनमाड-मुंबई दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात टप्प्या टप्प्याने इतर गाड्या मध्ये विशेषता लांब पल्ल्याच्या गाड्यात प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्याच्या घेतलेल्या या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले.

दरम्यान, प्रवाशांना सर्व सोयी सुविधा मिळाव्या यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे वेळोवेळी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात सध्या अमृत भारत योजने अंतर्गत देशभरातील अनेक रेल्वेस्थानकाचा कायापालट केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रवाशांना चांगली सुविधा (Facilities) देण्यासाठी धावत्या गाडीत एटीएम बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अशी झाली प्रगती

भारतात रेल्वेची सुरुवात १६ एप्रिल १८५३ साली झाली. याच दिवशी मुंबई ते ठाणे (Mumbai to Thane) दरम्यान पहिली रेल्वे धावली होती. त्यानंतर काही वर्षांनी मुंबई-भुसावळदरम्यान रेल्वे सुरू झाली. कालांतराने रेल्वे पुढे-पुढे सरकत गेली आणि तिचे जाळे संपूर्ण देशभरात पसरले. भारतात सुमारे १० हजारपेक्षा जास्त छोटे-मोठे रेल्वेस्थानक आहे. प्रारंभी रेल्वे डब्यात शौचालयदेखील नव्हते. १९०९ मध्ये शौचालय असलेले डबे तयार करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रेल्वेची प्रगती होऊन आज धावत्या गाडीत प्रवशाला एटीएमद्वारे पैसे काढता येणार आहेत.

Nashik News : त्र्यंबकमध्ये सहाशे रुपयांची दर्शन तिकिटे दोन हजारांना विकली

0

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी जास्त पैसे घेऊन खोटे पास विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहाशे रुपये किमतीचे दर्शन तिकिटे तब्बल दोन हजार रुपयांना विकली यासंदर्भात सदर यात्रेकरू भाविकांनी (Devotees) मंदिर ट्रस्ट व पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यामुळे भाविकांमध्ये व नगरीत मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी नेहमीच भाविकांच्या रांगा असतात. ही गर्दी लक्षात घेऊन दि. २२ मार्च रोजी गुजरातच्या सुरतमधील चिराग दालिया व त्यांच्या मित्रांनी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका अनोळखी व्यक्तीकडून दोनशे रुपये किंमतीचे ऑनलाईन सहाशे रुपयांची तीन तिकिटे दोन हजार रुपयांना विकत घेतली. मात्र, मंदिर गेटवर त्यांना सदर तिकीट स्कॅनिंग यंत्रणेने नाकारले. त्यामुळे भाविकाला दर्शन (Darshan) घेता आले नाही.

यानंतर सदर भाविकांनी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट कार्यालयात लेखी तक्रार केली. त्यानंतर ट्रस्टने पोलिसांकडे (Police) याबाबत तक्रार दिली असता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.यावेळी सीसीटीव्ही तपासात संशयित नारायण मुर्तडक या तरुणाने ही तिकिटे विकल्याचे दिसून आले. यानंतर याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी पोलिसांकडे मुर्तडक याच्याविरुद्ध ठकबाजीचा गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, दर्शनासाठी वारंवार भाविकांना टोकले जाते. परंतु, त्यात ट्रस्ट व पोलीस हे तक्रारीत लक्ष घालत नव्हते. यानंतर आता उशिराने का होईना संबंधित कारवाई करतील असे भाविकांना वाटत आहे. तसेच असे तिकिटे अहस्तांतरणीय असताना बोगस तिकीटे दिसून आली. त्यामुळे आता या तिकिटांवर संबंधित भाविकांचा फोटो (Photo) छापावा अशी मागणी केली जात आहे.

Sanjay Raut : बाळासाहेबांच्या AI भाषणावर टीका करणाऱ्यांना राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “तुम्ही आनंद दिघेंना…”

0

मुंबई | Mumbai

नाशिक येथील मनोहर गार्डन लॉन्स येथे काल (बुधवारी) शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) एक दिवसीय विभागीय निर्धार शिबिर पार पडले. या शिबिरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली. तसेच स्वर्गीय हिंदूह्द्यसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन भाषण दाखवण्यात आले. या भाषणावर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर आता विरोधकांच्या या टीकेला पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “बाळसाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील असून, शिवसेनेचे निर्माते आहेत. आम्ही अमित शाहांवर केले असते तर तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांवर असं काय करता असे म्हटले असते तर तुमची तक्रार योग्य आहे. अमित शाह (Amit Shah) यांनी एक बनावट संघटना केली आणि त्याला शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला द्यायला लावले म्हणून त्यांचा बाळासाहेब ठाकरेंवर अधिकार होत नाही. आम्ही बाळासाहेबांवर केले, तुमचा याच्याशी काय संबंध आहे? तंत्रज्ञान खूप पुढे गेले असून, स्वतः नरेंद्र मोदी यांनी एआय तंत्रज्ञानाबाबत देश कसा पुढे नेत आहे, याबाबत काही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “तुम्ही आनंद दिघेंना (Aanad Dighe) ज्या बनावट पद्धतीने पडद्यावर आणलं त्यावर तुम्ही बोला, त्याच्या संदर्भात बोलला तर त्यावर वाद करू. त्यांनी आनंद दिघेंवर धर्मवीर नावावरून दोन भागांत सिनेमा काढला आहे. तो सिनेमा मी काही पाहिले नाही. या लोकांपेक्षा आनंद दिघेंना आम्ही जास्त ओळखतो. त्यांच्या नावाने बनावट भूमिका, बनावट विचार आणि बनावट संवाद हे निर्माण केलेले चाललं का? तुम्ही धर्मवीराचे आम्हाला शिकवू नका. तुमच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांच्या जवळ राहिलो आहोत. एकमेकांच्या फार जवळ होतो”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

तसेच मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी आनंद दिघे असताना संजय राऊत हे शिवसेनेत होते तरी का? आनंद दिघे यांनी काय शिकवण दिली हे त्यांनी आम्हाला सांगू नये, असे म्हटले होते. त्यावर बोलतांना राऊत म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षातून आलेले शंभूराज देसाई आम्हाला शिकवणार का? काँग्रेस पक्षातून बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा बाळासाहेब ठाकरे शिकवणार का? इतकी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही. त्यांनी इतिहास वाचावा. तो खटला काय होता आणि त्यात संजय राऊत यांची भूमिका काय होती? हे एकदा पोकळ शंभूराजेंनी समजून घ्यावे. त्यांचे पक्षप्रमुख अमित शाह यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की, फडणवीस यांची चाकरी करा नाहीतर सरकारमधून दूर व्हा. तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. फार शहाणपणा करू नका, असे प्रत्युत्तर त्यांनी देसाई यांनी दिले.

दर 41 वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात ?

0

पवनपुत्र हनुमानाबद्दल असे म्हटले जाते की ते अमर आहेत. रामायण काळात जन्मलेले हनुमान शेकडो वर्षांनंतर महाभारत काळात जिवंत होते. असे म्हटले जाते की महाभारत काळात ते पांडवांना भेटायला देखील आले होते. हनुमानजी अजूनही जिवंत आहेत आणि या पृथ्वीवर फिरत आहेत कारण त्यांना अमर होण्याचे वरदान मिळाले आहे. असाही दावा केला जातो की हनुमानजी दर 41 वर्षांनी एका आदिवासी गटाला भेटायला येतात.

काही वर्षांपूर्वी सेतू या आध्यात्मिक संस्थेच्या हवाल्याने हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे की हनुमानजी दर 41 वर्षांनी श्रीलंकेच्या जंगलात एका आदिवासी गटाला भेट देण्यासाठी येतात. हनुमानजी हे मातंग ऋषींचे शिष्य होते. असे म्हटले जाते की हनुमानजींचा जन्म मातंग ऋषींच्या आश्रमात झाला होता. मातंग समाजाचे लोक अजूनही भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये राहतात. त्यांचे पूर्वज मातंग ऋषी होते.

दाव्याप्रमाणे, श्रीलंकेच्या जंगलात राहणारा एक आदिवासी गट आहे जो बाहेरील जगापासून पूर्णपणे तुटलेला आहे. हा आदिवासी गट श्रीलंकेतील पिदुरु पर्वताच्या जंगलात राहतो. सेतू वेबसाइटचा दावा आहे की 27 मे 2014 रोजी हनुमानजींनी या आदिवासी गटासोबत शेवटचा दिवस घालवला. आता यानंतर 2055 मध्ये हनुमानजी पुन्हा आपल्याला भेटायला येतील.
भगवान रामाच्या मृत्युनंतर, हनुमानजी अयोध्येहून परतले आणि दक्षिण भारतातील जंगलात राहू लागले. यानंतर ते श्रीलंकेला गेले. त्या वेळी, जोपर्यंत हनुमानजी श्रीलंकेच्या जंगलात राहिले, तोपर्यंत या आदिवासी गटातील लोक त्यांची सेवा करत होते. हनुमानजींनी या वंशाच्या लोकांना ब्रह्माचे ज्ञान दिले. आणि त्याने वचन दिले की तो दर 41 वर्षांनी या जमातीच्या पिढ्यांना ब्रह्मज्ञान देण्यासाठी येईल.

Nashik News : अनधिकृत धार्मिकस्थळ हटवले; कारवाईपूर्वी मध्यरात्री दगडफेक, एकवीस पोलीस जखमी

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील काठेगल्लीमधील (Kathe Galli) एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटवण्याच्या काही तासआधीच पखालरोड व उस्मानिया कॉर्नर येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन हजारांच्या अनियंत्रित जमावाने पोलिसांवर (Police) दगडफेक केली. या घटनेत पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमाव नियंत्रित केला. या दगडफेकीत २१ पोलीस जखमी झाले असून ३० संशयितांना (Suspected) ताब्यात घेण्यात आले आहे.

सद्यपरिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून घटनास्थळावरून परजिल्ह्यासह मालेगावातील १०८ संशयास्पद दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यामुळे ही दंगल पूर्वनियोजित कट रचून घडवल्याचे प्राथमिक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. हल्लेखोरांकडे मोठ्या प्रमाणात दगड कोठून आले, यामागे कोण आहे, याचा शोध सुरु केला आहे, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सिव्हील हॉस्पिटलच्या भेटीनंतर सांगितले. काठेगल्ली भागातील धार्मिकस्थळ हटवण्यासाठी उच्च न्यायालयाने (High Court) महापालिकेस आदेश दिले होते. त्यानंतर मनपाने या स्थळासह कृटींना नोटीस दिली होती.

विहित मर्यादित अतिक्रमण हटविले नसल्याने मनपाने मंगळवारी रात्री १० वाजेपासून कार्यवाही सुरु केली. काठेगल्ली व इतर भागात बॅरिकेडिंग लागताच काही संशयित पखालरोड व उस्मानिया चौकात जमले. बघताबघता हा जमाव ३ हजारांच्या संख्येने जमला. यानंतर पोलिसांनी जमावास शांततेचे आवाहन केले असता, अचानक काही संशयितांनी गर्दीतून व काही सोसायट्यांच्या बिल्डिंगवरून अंदाधुंद दगडफेक व काचेच्या बाटल्यांचा मारा सुरु केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण (Kirankumar Chavan) व सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

दरम्यान, तणाव निवळल्यानंतर पोलिसानी पॉईंटसवर बंदोबस्त तैनात केला. यानंतर विविध पोलीस ठाणे (Police Station) व युनिट्सने धाडसत्र राबवून ३० हून अधिक संशयितांना ताब्यात घेतले.संशयितांकडे व इतर पसार झालेल्यांकडे मिळालेल्या या बेवारस दुचाकी मालेगाव, धुळे व अन्य भागातील असल्याचे तपासात समोर येत आहे. या घटनेत स्थानिकांपेक्षा परगावातील संशयितांचा भरणा जास्त आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जखमी पोलीस अधिकारी, अंमलदारांची शिक्षणंमत्री दादा भुसे, आ. देवयानी फरांदे , पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली.

सखोल तपास सुरू

या घटनेचा सखोल तपास केला जात असून ही घटना म्हणजे पूर्वनियोजित कट होता का? कसा व कुणी रचला यादिशेने तपास सुरू झाला आहे. तसे प्राथमिक पुरावे गुन्हे शाखा व तपास पथकास मिळाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार, संशयितांची धरपकड सुरू असून १०८ दुचाकी कोणाच्या आहेत? त्यांचे मूळ मालक कोण? दगडफेक सुरू असताना वीज का नव्हती? ती खंडित करण्यात आली की तांत्रिक बिघाड झाला, यासाठी महावितरणकडे चौकशी केली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नाशिक महापालिकेने दर्गावर केलेली कारवाई ही अनधिकृत आहे. त्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज आम्हाला त्याच्यावर स्थगिती दिली आहे. आमच्याकडे ३०० वर्षे जुने कागदपत्र असून आम्ही ते न्यायालयात सादर केले. पुढील सुनावणी २१ एप्रिला होणार आहे, अशी माहिती कमिटीचे फहीम शेख यांनी दिली. मनपाने दर्यावर लावलेल्या नोटीसीबाबत दर्गा विश्वस्त मंडळाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तीच्या खंडपीठांसमोर सुनावणी होऊन मनपाच्या त्या नोटीसीला स्थगिती दिली.

संपादकीय : १७ एप्रिल २०२५ – एकलहर्‍याच्या महावितरणचा स्वागतार्ह पुढाकार

0

नाशिक एकलहरे येथील राज्यस्तरीय प्रशिक्षण व सुरक्षा केंद्रातील बाग आता शुद्धीकरण केलेल्या सांडपाण्यावर फुलणार आहे. त्यासाठीच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले. यातून वर्षाला सुमारे दहा लाख लिटर पाण्याची बचत होईल, असे सूत्रांनी माध्यमांना सांगितले. यासाठी महावितरण कंपनीने पुढाकार घेतला आहे. तो स्वागतार्ह आहे. असा पुढाकार राज्यातील बॉश, महिंद्रासारख्या अनेक मोठ्या कंपन्यादेखील घेतात. त्यांची संख्या वाढणे काळाची गरज मानली जाऊ शकेल. कारण सांडपाणी व्यवस्थापन ही एक गंभीर समस्या आहे.

ज्या-ज्या शहरांना नदीचा वारसा लाभला आहे, त्या-त्या शहरांमध्ये सांडपाणी नदीपात्रात थेट मिसळताना आढळते. परिणामी बहुसंख्य नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य अनेकदा धोक्यात येते. वास्तविक सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारणे आणि ती कायर्क्षमतेने चालवणे ही मुख्यत्वे स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी मानली जाते. पण त्यात बहुसंख्य संस्था अनुत्तीर्ण झाल्या आहेत. त्याशिवाय शहरोशहरी सांडपाण्याच्या नद्या वाहिल्या नसत्या.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अहवालानुसार, भारतात दररोज सुमारे 75 अब्ज लिटर सांडपाणी निर्माण होते. त्यापैकी फक्त सुमारे 40 टक्के पाण्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणजेच उर्वरित सांडपाणी नदी, समुद्राला मिळते किंवा जमिनीत मुरते. यासंदर्भातील वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. तेव्हा अशाप्रकारचे प्रकल्प संस्था किंवा कंपन्यांनी त्यांच्या पातळीवर चालवले तर सांडपाणी नदीला मिळण्याचे प्रमाण काहीअंशी तरी नक्की कमी होऊ शकेल. नद्यांना मोकळा श्वास घ्यायला थोडीतरी मदत होईल. शिवाय पाण्याची बचतही होईल. पाणीबचत हा पाणीटंचाईवरचा एक प्रमुख उपाय आहे.

बहुसंख्य लोक पाण्याची उधळपट्टी करतात. पाणी वापरतात त्यापेक्षा जास्त पाणी वाया घालवतात. स्नानासाठी जरुरीपेक्षा जास्त पाणी वापरण्याची सवय मुरली आहे. कपडे धुण्यासाठी पाण्याचा जास्त वापर होऊ शकतो. पाण्याचा अतिरिक्त वापर म्हणजे अतिरिक्त सांडपाण्याची निर्मिती. जे प्रक्रिया न झाल्यामुळे थेट नदीच्या पात्रात मिसळते. परिणामी जीवनदायिनी नद्या अनारोग्याचे आगार बनतात. लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाली तर पाण्याचा विवेकी वापर वाढू शकेल. नव्याने बांधल्या जाणार्‍या गृहनिर्माण वसाहतींना त्यांच्या पातळीवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे शासनाने बंधनकारक केले आहे. असे झाल्यास प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर जिथल्या तिथेच होऊ शकेल.