नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलाने एअरस्ट्राईक केला आहे. पाकिस्तानकडून रहिवाशी परिसर आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एका नशामुक्ती केंद्राला लक्ष्य करण्यात आले असून, मृतांचा आकडा ४०० वर पोहोचला आहे. मृतांमध्ये बहुतांश रुग्ण आणि सामान्य नागरिकांचा समावेश असल्याचे तालिबान सरकारने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या या एअरस्ट्राईकवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काबूलमधील दहशतवादांच्या स्थळावर हल्ला केला असून रुग्णालयांवर हल्ला केला नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. अफगाणिस्तान खोटे बोलत असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे.
नेमकी घटना काय?
काबुलमधील एका नशामुक्ती केंद्रावर पाकिस्तानी लष्करी विमानांनी बॉम्बफेक केली. या हल्ल्यात हॉस्पिटलचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेले आहेत. सुरुवातीला हा आकडा २५० सांगण्यात आला होता, मात्र अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने मृतांची संख्या ४०० पर्यंत वाढल्याची पुष्टी केली आहे. याशिवाय २५० हून अधिक लोक जखमी आहेत.
पाकिस्तानने काय दावा केला?
रुग्णालय आणि रहिवाशी भागत हल्ला केल्याचा अफगाणिस्तानचा दावा पाकिस्तानने फेटाळून लावला. हा दावा खोटा असून, जनमताची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे. काबूलमधील कोणत्याही रुग्णालयाला लक्ष्य करण्यात आले नसल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले. पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, या हल्ल्यांमध्ये अफगाण तालिबानच्या लष्करी तळांना आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पायाभूत सुविधांना अचूकपणे लक्ष्य करण्यात आले, ज्यात तांत्रिक उपकरणे आणि दारूगोळ्याच्या गोदामांचा समावेश होता. या ठिकाणांचा वापर निष्पाप पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध केला जात होता, असेही पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अफगाणिस्तानकडून निषेध
पूर्व अफगाण सरकारचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून याला ‘आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन’ म्हटले आहे. तसेच स्टार क्रिकेटपटू राशिद खान यानेही हॉस्पिटल आणि रहिवासी भागांना लक्ष्य करणे हा ‘वॉर क्राईम’ असल्याचे म्हटले आहे.
राशीद खानकडून हल्ल्याविरोधात संताप
पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर राशीद खान याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. काबूलमध्ये पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या नागरिकांच्या मृत्यूच्या ताज्या वृत्तांमुळे मला खूप दुःख झालंय. जाणूनबुजून किंवा चुकून, नागरिकांची घरे, शैक्षणिक सुविधा किंवा वैद्यकीय पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं हा युद्ध गुन्हा आहे, असे राशीद खान म्हणाला. विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात मानवी जीवनाची केलेली अवहेलना ही वेदनादायक आणि गंभीर चिंताजनक आहे, असेही राशीद यावेळी म्हणाला.
पाकिस्तानच्या अशा कृतीमुळे केवळ फूट आणि द्वेष निर्माण होईल. मी संयुक्त राष्ट्र आणि इतर मानवाधिकार संस्थांना या नवीनतम अत्याचाराची सखोल चौकशी करण्याचे आणि गुन्हेगारांना जबाबदार धरण्याचं आवाहन करतो. या कठीण काळात मी माझ्या अफगाण लोकांसोबत उभा आहे. आपण बरं होऊ आणि एक राष्ट्र म्हणून आपण उठू. आपण नेहमीच असे करतो. इन्शाअल्लाह, असे राशीद खानने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.





