Wednesday, December 4, 2024
Homeदेश विदेशरेल्वेची वाट बघत होते प्रवासी, अन् तेवढ्यात स्टेशनवर बॉम्बस्फोट…; २४ जणांचा मृत्यू,...

रेल्वेची वाट बघत होते प्रवासी, अन् तेवढ्यात स्टेशनवर बॉम्बस्फोट…; २४ जणांचा मृत्यू, भीषण स्फोटाने क्वेट्टा हादरलं

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून मोठी बातमी समोर आली आहे. बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्थानकावर एक भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जखमी झाले. क्वेटाच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी बलूच माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार यात २४ जणांचा मृत्यू झालाय तर ४० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासानुसार ही घटना आत्मघातकी स्फोटाची असल्याचा अंदाज क्वेटाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.

स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वे स्टेशनच्या बूकिंग कार्यालयात हा स्फोट झाला असून ट्रेन पोहोचण्याच्या काही वेळ आधी ही घटना घडली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जाफर एक्स्प्रेस सकाळी ९ वाजता पेशावरला जाणार होती. स्टेशनवर असलेली गर्दी पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

- Advertisement -

बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलिसांचे पथक या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. घटनास्थळाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर ते म्हणाले की, इथे शेकडो लोक उपस्थित होते. या स्फोटामुळे प्लॅटफॉर्मच्या छताचेही नुकसान झाले आहे.

बलूच लिबरेशन आर्मीने या स्फोटाची जबाबदारी घेतलीय. बलूच लिबरेशन आर्मीने म्हटले की, आम्ही क्वेटा रेल्वे स्टेशनवर पाकिस्तानी लष्करावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी घेतो. क्वेटा रेल्वे स्टेशनवर पाकिस्तानी लष्कराच्या एका युनिटवर हल्ला केला. ते इन्फट्री स्कूलचा कोर्स पूर्ण करून जाफर एक्सप्रेसमधून परतत होते.

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. सामान्य माणसांना लक्ष्य करणाऱ्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि हल्ल्यामागचे सूत्रधार शोधून त्यांना कठोर शासन करण्याचा शब्द देतो. गेल्या काही काळापासून सामान्य नागरिक, मजूर, महिला आणि मुलांना अतिरेकी लक्ष्य करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या