अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पांगरमल (ता. अहिल्यानगर) येथे एका शेतकर्यावर आणि त्यांच्या पत्नीवर सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्याच्या लोखंडी पंपाने हल्ला करण्यात आला. तसेच, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (28 जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी संजय त्र्यंबक आव्हाड (वय 49 रा. पांगरमल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द बुधवारी (29 जानेवारी) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष अर्जुन आव्हाड, मोहिनी सुभाष आव्हाड, अर्जुन रामू आव्हाड (सर्व रा. पांंगरमल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
संजय व त्यांची पत्नी मंगळवारी सायंकाळी सात वाजता शेतात जात असताना, सुभाष आव्हाड याने लोखंडी पंपाने त्यांच्या पायावर आणि पाठीवर मारले. त्याला साथ देत मोहिनी आव्हाड आणि अर्जुन आव्हाड यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या संजय व त्यांच्या पत्नीने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बुधवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार शेख करत आहेत.