Friday, September 25, 2026
HomeराजकीयPankaja Munde : चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात; पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना...

Pankaja Munde : चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात; पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना दम

अंबाजोगाई । Ambajogai

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणातील गटतटावर आणि लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरच्या घडामोडींवर अत्यंत रोखठोक भाष्य केले आहे. “राजकारणात काही लोक स्वार्थासाठी आपला वापर करून घेतात, निवडून आल्यावर दुसऱ्याशी संधान बांधतात; पण लक्षात ठेवा, ज्यांनी माझ्याविरुद्ध कारस्थानं केली, ते आज नकाशावरून गायब झाले आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या विरोधकांना सुनावले.

- Advertisement -

अंबाजोगाई शहरात पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी आयोजित सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनितीचे संकेत दिले. जिल्ह्याच्या सहा मतदारसंघांतील सहा आमदार आणि खासदारही आमचाच असेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी योगेश्वरी देवीच्या साक्षीने या नव्या प्रवासाची सुरुवात केली.

पंकजा मुंडे यांनी राजकारणातील ‘बदमाश’ प्रवृत्तीवर टीका करताना निसर्गाच्या न्यायावर भर दिला. त्या म्हणाल्या की, “राजकारणात लोक सोडून जातात, फसवणूक करतात. परंतु माझ्या हृदयात पाप नाही, त्यामुळे मला कोणाचेही वाईट करण्याची गरज पडत नाही. निसर्गच अशा प्रवृत्तींचा हिशोब करतो. जे प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्या पाठीशी सर्व शक्ती उभ्या राहतात. आज माझ्याविरुद्ध कट रचणारे कुठे आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे.”

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे यांनी पारदर्शकतेचा कडक इशारा दिला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की, चुकीच्या मार्गाने पैसे कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात आहे. त्यामुळे माझ्याकडून कोणत्याही बेकायदेशीर कामाची किंवा ‘अडजस्टमेंट’ची अपेक्षा करू नका,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी एका कार्यकर्त्याच्या मुलाने केलेल्या ४०-५० लाख रुपयांच्या फसवणुकीचा दाखला देत स्पष्ट केले की, कष्टाने पैसे कमवा, पण लोकांची फसवणूक करून संकटात आलात तर मी पाठीशी उभी राहणार नाही. “तुम्हाला १० लाखांचे कंत्राट मिळाले तर त्यातून प्रामाणिकपणे एक लाख कमवा, पण पूर्ण १० लाख गायब करू नका,” असा सल्लाही त्यांनी दिला.

पंकजा मुंडे यांनी यावेळी आपल्या भावनिक नात्याचीही ग्वाही दिली. त्या म्हणाल्या की, “जर माझा एखादा कार्यकर्ता आजारी असेल, त्याला कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला असेल, तर त्याला मदत करण्यासाठी मी माझे घर गहाण ठेवायलाही मागेपुढे पाहणार नाही. पण गुन्हेगारी किंवा फसवणूक करणाऱ्यांना माझे समर्थन कधीच नसेल.” घरातील पुरुषांनी पैसे कुठून आणले, हे घरातील स्त्रियांनी आणि वडिलांनी विचारले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आगामी निवडणुकांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, यश-अपयश हे ईश्वराच्या हातात असते, परंतु आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले आहेत. ईश्वराच्या कृपेने आणि कार्यकर्त्यांच्या शक्तीने आपण जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...