कोल्हापूर | Kolhapur
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने हादरवून सोडले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना या प्रकरणी धारेवर धरले जात आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी अशी चर्चा असलेल्या वाल्मीक कराडला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे वाल्मीक कराड याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत मैत्रीचे संबंध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या घटनेनंतर मुंडे यांचीही सर्वत्र चर्चा रंगली आहे. या प्रकरणी आता भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर मौन सोडले आहे. या प्रकरणी पंकजा यांनी भाष्य केले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घूण हत्येने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या हत्येतील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. या प्रकरणातील सगळे आरोपी आणि मास्टरमाईंड अटकेत नसल्याने गृहखात्यावर टीका होत आहे. दरम्यान, या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधत संतोष देशमुख प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, की संतोष देशमुख हा माझाच बुथप्रमुख होता. त्यामुळे त्या क्रूर प्रकरणाचा तीव्र संताप आणि निषेध मी व्यक्त केला आहे. पण आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी दोन्ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याने ते या प्रकरणात जातीने लक्ष घालून या प्रकरणात न्याय देण्याची भूमिका घेऊन माझ्या लेकराला न्याय देतील, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, संतोष देशमुख हा माझा बुथ प्रमुख होता. त्याने माझ्यासोबत काम केले आहे. एक चांगला सरपंच म्हणून त्याने काम केले आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या घरच्यांना न्याय देतील, असेही यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.