पारनेर । तालुका प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील निघोज येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. संदीप भजन सिंग (वय २२, मूळ रा. फिरोजपूर, पंजाब; सध्या रा. निघोज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, २२ मार्च २०२६ रोजी पहाटे ३:०७ वाजेच्या सुमारास एका अज्ञात इसमाने आपला चेहरा झाकून निघोज येथील एसबीआय एटीएममध्ये प्रवेश केला होता. त्याने लोखंडी हत्याराच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संकेत चंद्रशेखर वैद्य (वय ४०, रा. नाशिक) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार, पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास चक्रांला वेग दिला. अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला शिरूर येथून ताब्यात घेतले.
तपासादरम्यान निष्पन्न झाले की, अटक केलेला आरोपी संदीप सिंग हा मूळचा पंजाब राज्यातील असून तो सध्या निघोज परिसरात राहत होता. त्याने एटीएम फोडण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो जाळ्यात अडकला. या आरोपीकडून जिल्ह्यातील आणि राज्यातील इतरही एटीएम चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन खंडागळे, शिवाजी कडूज, अमोल धामणे, कल्याण लगड, गणेश डोंगरे, सारंग वाघ, विजय जाधव, सागर साबळे आणि प्रकाश बोबडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड फौजदार शिवाजी कडूज करत आहेत.




