Saturday, February 8, 2025
Homeक्राईमपारनेरमधून तूर चोरली, कर्जतला विकली; तिघांना अटक

पारनेरमधून तूर चोरली, कर्जतला विकली; तिघांना अटक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

रांजणगाव मशीद (ता. पारनेर) येथील शेतातून 20 क्विंटल तूर चोरी करणार्‍या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख 40 हजारांची 20 क्विंटल तूर व एक लाख 50 हजारांचा टेम्पो असा एकूण दोन लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

अनिल हरिभाऊ गोलवड (वय 45, रा. कामठी, ता. श्रीगोंदा), संतोष सुधाकर चौरे (वय 42, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा), जालिंदर रावसाहेब गोलवड (वय 25, रा. कामठी, ता. श्रीगोंदा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. 1 फेब्रुवारी रोजी माणिक अंकुश काळे (रा. रांजणगाव मशीद) यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, त्यांच्या शेतात वाळवण्यासाठी टाकलेली तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या चोरीचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, मेघराज कोल्हे, महादेव भांड यांच्या पथकाने तपास सुरू केला. चोरीच्या तूर प्रकरणातील संशयित आरोपी अनिल हरिभाऊ गोलवड व त्याचे साथीदार मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथे असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अनिल गोलवड, संतोष चौरे व जालिंदर गोलवड यांना ताब्यात घेतले.

त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांचे आणखी चार साथीदार पसार आहेत. यामध्ये संजय भाऊसाहेब गोलवड, संतोष भाऊसाहेब गोलवड (दोघे रा. कामठी, ता. श्रीगोंदा), राहुल बाळू पवार व लहु भागाचंद पवार (दोघे रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर) यांचा समावेश आहे. दरम्यान, अटक केलेल्या तिघांकडे चौकशी केली असता चोरीची तूर त्यांनी मिरजगाव (ता. कर्जत) येथील आडते व्यापारी अशोक सुपेकर यांना विकली होती. त्यांच्याकडून ती तूर जप्त करण्यात आली आहे. संशयित तिघा आरोपींना सुपा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, उर्वरित पसार संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी मिरजगाव येथे येऊन व्यापार्‍यावर कारवाई केल्यामुळे संतप्त व्यापार्‍यांनी बाजार समितीचे लिलाव व सर्व व्यवहार बुधवारी (दि.5) दिवसभर बंद ठेवले. तसेच पोलिसांच्या कारवाईचा व्यापार्‍यांच्यावतीने निषेध करण्यातआला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या