मुंबई । Mumbai
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात ‘कधी काय घडेल’ याचा नेम नसतो, असं म्हणतात. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत धुसफूस आणि नाराजीनाट्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच शनिवारी रात्री मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर एक अत्यंत गुप्त आणि अनपेक्षित घडामोड घडली.
राष्ट्रवादीचे खासदार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी रात्रीच्या अंधारात अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. कोणालाही सुगावा लागू न देता रात्री १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या ‘वर्षा’वरील बैठकीने राज्याच्या राजकीय वर्तुळात थेट ‘भूकंप’ आणला असून, आता महायुतीत नेमकं काय शिजतंय? यावरून चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार हे पक्ष संघटनेत कमालीचे सक्रिय झाले आहेत. काल रात्री ते कोणाही ज्येष्ठ नेत्याला सोबत न घेता थेट फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. या दोन नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी सध्या राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून गायब असल्याचे समोर आले होते. पक्षाने यावर ‘ही केवळ प्रिंटिंग मिस्टेक (छापाईची चूक) होती’ असे स्पष्टीकरण दिले असले, तरी राजकीय जाणकारांच्या मते हा सुनेत्रा पवार यांनी पटेल-तटकरे गटाला दिलेला अप्रत्यक्ष इशारा असू शकतो.
दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी या वादात उडी घेत थेट बॉम्ब टाकला आहे. “अजित पवारांनी शेवटच्या दिवसांत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे २२ आमदार फोडून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत,” असा सनसनाटी आरोप रोहित पवारांनी केला आहे. या आरोपांमुळे संशयाची सुई आणखी गडद झाली आहे.
या सगळ्या गदारोळात सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत या दोन्ही नेत्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचे कौतुक करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वाद थांबण्याऐवजी आता नव्या वळणावर पोहोचला आहे.
कालपर्यंत ‘सिल्व्हर ओक’ आणि सुनेत्रा पवारांच्या गोटात फिरणारी ही नाराजीची स्क्रिप्ट आता थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यापर्यंत पोहोचली आहे. पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या गुप्त भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार की महायुतीचे समीकरण बदलणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.




