मुंबई | Mumbai
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी हालचाली सुरु आहे. काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा यासाठी राष्ट्रवादी आणि महायुतीतून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहे. तर, दुसरीकडे उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तर, रोहित पवार यांनीदेखील आज सकाळी सपकाळांची भेट घेतली. त्यामुळे काँग्रेस उमेदवार मागे घेणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. असे असतानाच आता मोठी घडामोड घडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली असल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन सपकाळ बारामतीतून उमेदवार मागे घेणार का याकडे लक्ष लागले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना फोन केला आहे. फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन, बारामती पोटनिवडणुकीबाबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीची पोटनिवडणूक लढवत आहेत, त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने उमेदवार दिला आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शरद पवारांचीही चर्चा
एकीकडे रोहित पवार यांनी सकाळी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन त्यांना उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केलेली असतानाच दुसरीकडे शरद पवार यांनी बारामतीची निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल. पण, हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले, “काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही काय त्यांना सांगू शकत नाही. पण, बारामतीची जागा अजित पवारांचे अपघातात निधन झाल्यामुळे रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातील एक कर्तृत्त्ववान प्रतिनिधी गेला आहे. मला विचारले, तर मी काँग्रेसला सल्ला देईल की, यापार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल. हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे.”
Baramati By Election 2026 : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, अजित पवारांच्या अपघाताची मुख्यमंत्री फडणवीस चौकशी होऊ देत नाही. हे झरीतील शुक्राचार्य आहेत, आम्ही मागणी करण्याआधीच अपघाताची चौकशी सुरू होणे आवश्यक होते. मात्र, कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले. मूक-बहिरे आंधळे सरकार हे आम्ही म्हणत होतो. पण आता बेशरम असल्याचं देखील पाहायला मिळत असल्याचे सपकाळांनी सांगितले.





