Thursday, June 11, 2026
HomeनगरAhilyanagar : पाथर्डीतील रोहयो तपासणीसाठी 32 जणांची जम्बो समिती

Ahilyanagar : पाथर्डीतील रोहयो तपासणीसाठी 32 जणांची जम्बो समिती

रेकॉर्ड आणि झालेल्या कामांची स्थळ पाहणीसह होणार चौकशी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पाथर्डी तालुक्यातील पंचायत समिती अतंर्गत असणारे रोजगार हमी योजनेच्या कामाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी चौकशी पथक गठीत केलेले आहे. या चौकशी समितीत 32 अधिकारी- कर्मचार्‍यांची दोन पथके स्वतंत्रपणे रेकॉर्डसह स्थळ कामाची तपासणी करणार आहेत. यामुळे पाथर्डी पंचायत समितीमधील रोजगार हमी योजनेच्या कामातील कोणकोणत्या भानगडी बाहेर येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने पहिल्या टप्प्यात पाथर्डी तालुक्यावर लक्ष केंद्रीत केले असून त्याच धर्तीवर जिल्ह्यातील रोहयोच्या कामाच्या चौकशीची मागणी आहे.

- Advertisement -

दरम्यान, यापूर्वी देखील 2024 मध्ये जिल्ह्यातील पाथर्डी आणि जामखेड तालुक्यातील रोहयो विभागातील कामाची चौकशी करण्यात आली होती. यात पाथर्डीत दोषींवर कारवाई करण्यात आली होती. तर जामखेड आणि त्यानंतर कर्जत तालुक्यातील कामांची अनेक महिने चौकशी सुरू होती. त्यानंतर पुन्हा पाथर्डीतील रोहयोच्या कामाबाबत तक्रारी आल्याने मागील आठवड्यात स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्यासह पाथर्डी पंचायत समितीला ठिकाणी भेट प्राथमिक पाहणी व तपासणी केली होती. यावेळी पंचायत समिती कामाबाबत अनेक त्रुटी समोर आल्या होत्या.

यामुळेच तालुक्यातील अलिकडच्या काही वर्षातील रोजगार हमी विभागाच्या कामाची तपासणी करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी घेतला. पाथर्डी पंचायत समितीमधील रोजगार हमी विभागातील कामे तपासणीसाठी तब्बल 32 जणांचे दोन स्वतंत्र पथक तयार करण्यात आले ाहे. यात रेकॉर्ड तपासणीसाठी प्रत्येक दोनजणांचे स्वतंत्र असे आठ म्हणजेच 16 जणांचे तर झालेल्या कामांची स्थळ पाहणी आणि तपासणी करण्यासाठी प्रत्येक दोनजणांचे स्वतंत्र असे आठ म्हणजेच 16 जणांचे असे एकूण 32 अधिकारी- कर्मचार्‍यांचा यात समावेश आहे. पुढील आठवड्यात हे पथक त्यांच्या चौकशीला सुरूवात करणार आहेत. येत्या 15 एप्रिलपर्यंत या तपासणीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांच्यापर्यंत पोहणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

2024 मध्ये झाली होती तपासणी
पाथर्डीसह नगर जिल्ह्यातील रेाजगार हमी योजनेतून खोदण्यात आलेल्या विहीरींच्या कामांची तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तपासणी केली होती. विशेष करून पाथर्डी, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील रोहयोच्या कामात महाघोटाळा झाल्याचा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. पाथर्डी तालुक्यातील रोहयोच्या कामात एका कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तालुक्यातील भानगडी बंद न झाल्याने पुन्हा नव्याने चौकशीची वेळ आली आहे.

तपासणी पथकांची नावे गोपनीय
पाथर्डी तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील कामांची तपासणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या 32 जणांच्या अधिकारी- कर्मचारी यांच्या पथकात समावेश असणार्‍यांची नावे प्रशासनाकडून गोपनीय ठेवण्यात आली आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता तपासणी करणार्‍या अधिकारी- कर्मचार्‍यांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...