Thursday, April 30, 2026
HomeनगरPathardi : पाथर्डी एसटी आगार डिझेल टंचाईमुळे ठप्प

Pathardi : पाथर्डी एसटी आगार डिझेल टंचाईमुळे ठप्प

बसेस उभ्या, प्रवाशांचे प्रचंड हाल || अनेक गाड्या रद्द,लाखोंचे नुकसान

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

येथील एसटी आगारात डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे रविवारी (दि.29) सकाळपासूनच बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. आगारातील तब्बल 30 बसेस जागेवरच उभ्या राहिल्या असून, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला आहे. आगारातील बहुतांश गाड्या डेपोतच थांबल्या होत्या. सकाळी साडेआठ वाजताची कल्याण, नऊ वाजताची नाशिक, अकरा वाजताची पुणे, दुपारी बारा वाजताची सोलापूर आणि दुपारनंतरची वल्लभनगर या महत्त्वाच्या गाड्या धावू शकल्या नाहीत. मात्र मुंबईच्या सकाळच्या गाडीसाठी इतर बसेसमधून डिझेल काढून ती गाडी कशीबशी रवाना करण्यात आली. उर्वरित प्रवाशांना खासगी वाहतुकीचा पर्याय शोधावा लागला.

- Advertisement -

पाथर्डी आगाराकडे एकूण 50 बसेस आहेत. या गाड्यांद्वारे दररोज सुमारे 18 हजार किलोमीटरचे अंतर कापले जाते. यासाठी दररोज साडेचार हजार लिटर डिझेलची गरज असते. सामान्यतः दर तीन दिवसांनी 12 हजार लिटरचा डिझेल टँकर पुरवठा केला जातो. मात्र यावेळी पुरवठ्यात झालेल्या विलंबामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडली. शनिवारी आगार प्रशासनाने डिझेलची मागणी केली असता, तेल कंपनीने प्रथम इतर पंपधारकांना पुरवठा करण्याचे सांगितले. सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या एसटी महामंडळाला प्राधान्य मिळावे अशी अपेक्षा असताना तसे न झाल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

या संकटामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पाथर्डी आगाराचे दररोजचे सरासरी उत्पन्न सुमारे 9 लाख 60 हजार रुपये असते, तर रोख उत्पन्न पावणे पाच लाख रुपये इतके आहे. बस सेवा बंद असल्याने या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.आगारात 87 चालक आणि सुमारे 100 वाहक कार्यरत आहेत. गाड्या बंद असल्याने कर्मचारी कामावर हजर असूनही निष्क्रिय बसून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान, इतर जिल्ह्यांतील काही एसटी आगारांनी अतिरिक्त फेर्‍या चालवून प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा दिला. मात्र या परिस्थितीचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. जर रविवारी सायंकाळपर्यंत डिझेल पुरवठा झाला नाही तर मुक्कामी गाड्यांसह संपूर्ण आगार ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एसटी महामंडळासाठी डिझेल पुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लष्करी रुग्णालयात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ८२ लाखांच्या इन्शुलिनची...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik भारतीय लष्कराच्या देवळाली कॅम्प (Deolali Camp) येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जवानांच्या उपचारासाठी पाठविलेल्या तब्बल ८१ लाख ९९ हजार रुपयांच्या महागड्या 'इन्शुलिन'...