Thursday, March 13, 2025
HomeनाशिकAgitation : थाळीनाद आंदोलनानंतर मानधन जमा

Agitation : थाळीनाद आंदोलनानंतर मानधन जमा

पंचायत समितीसमोर 42 ग्रामपंचायत सेवकांचे आंदोलन

देवळा । प्रतिनिधी Deola

ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 महिन्यातील मानधन व जिल्हा परिषदेने तीन महिन्यांपूर्वी पंचायत समितीच्या खात्यावर तीन महिन्यांच्या वेतनाचा फरक जमा केला असतानादेखील तो सातत्याने मागणी करूनदेखील दिला जात नसल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींच्या सेवकांनी मानधन व फरकाची रक्कम मिळण्यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या देत थाळीनाद आंदोलन सुरू केले.

- Advertisement -

जोपर्यंत मागणी मान्य होत नाहीत तोपर्यंत थाळीनाद सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामपंचायत सेवकांनी केल्याने या थाळीनादाची तीव्रता लक्षात घेत गटविकास अधिकार्‍यांनी तासाभरात मानधन व वेतनातील फरक सेवकांच्या खात्यावर वर्ग केल्यानंतरच हे थाळीनाद आंदोलन थांबवण्यात आले.

देवळा तालुक्यातील 42 ग्रामपंचायती असलेल्या सेवकांचे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 चे मानधन पंचायत समितीतर्फे देण्यात आलेले नाही. तसेच शासनाने देऊ केलेल्या 19 महिन्यांच्या वेतनातील सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या वेतनातील फरक जिल्हा परिषदेकडून तीन महिन्यांपूर्वीच पंचायत समितीच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. परंतु पंचायत समितीमार्फत मानधन व वेतनातील फरक ग्रामपंचायत सेवकांच्या खात्यावर वर्ग न करण्यात आल्याने त्यांच्यावर वेतनाअभावी उपासमारीचे संकट ओढवले होते. वेतन व फरकाची रक्कम मिळावी यासाठी ग्रामपंचायत सेवकांतर्फे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मात्र याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने सेवकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण पसरले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ग्रामपंचायत सेवकांना मानधन व फरकाची रक्कम तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशी मागणी राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनतर्फे अध्यक्ष भूषण अहिरे, उपाध्यक्ष पवन देवरे, दीपक सूर्यवंशी, लखन गरूड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गटविकास अधिकार्‍यांना 26 डिसेंबर रोजी निवेदन देत केली होती. मानधनाअभावी ग्रामपंचायत सेवकांच्या कुटुंबियांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यांना उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने 1 जानेवारीपर्यंत सदरचे मानधन व वेतनातील फरक सेवकांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे, अन्यथा ग्रामपंचायत सेवकांसह पंचायत समितीसमोर थाळीनाद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला होता.

मात्र सहा दिवस उलटूनही या निवेदनाची दखल अधिकार्‍यांनी न घेतल्याने संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सेवकांनी आज जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सचिव स्वप्निल अहिरे, शिवानंद देवरे, तालुकाध्यक्ष भूषण अहिरे, उपाध्यक्ष पवन देवरे, दीपक सूर्यवंशी, लखन गरूड आदींच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत पंचायत समिती कार्यालयावर धडक थाळीनाद फेरी काढली.

पंचायत समिती कार्यालयाबाहेर ग्रामपंचायत सेवकांनी ठिय्या देत थाळीनाद आंदोलन सुरू केले. थाळीनादाचा दणदणाट सुरू होताच गटविकास अधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आज कुठल्याही परिस्थितीत वेतन व वेतनातील फरक जमा होईल, असे तोंडी आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत वेतन व फरकाची रक्कम खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत थाळीनाद सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामपंचायत सेवकांनी केल्याने या थाळीनादाची तीव्रता लक्षात घेत गटविकास अधिकार्‍यांनी स्वत: लक्ष घालत तासाभरात वेतन ग्रामपंचायत सेवकांच्या खात्यावर जमा केले. वेतन खात्यावर पडताच सेवकांनी हे थाळीनाद आंदोलन थांबवत गटविकास अधिकार्‍यांचे आभार मानले.

या आंदोलनात संदीप बच्छाव, राहुल बुजवा, प्रकाश शिंदे, सतीश अहिरे, पुंडलिक सावंत, नीलेश साबळे, संजय सोनवणे, सचिन खरे, वैभव आहेर, हितेंद्र बच्छाव, राजाराम पवार, दीपक मोरे, किशोर मोरे, चेतन आहेर, भारत गायकवाड, भास्कर कुंवर, दीपक ठाकरे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सेवक सहभागी झाले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...