सातारा | Satara
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येने महाराष्ट्र हादरला असून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहून डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणांमध्ये सुरू असलेल्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज महत्वाचे खुलासे केले आहेत. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असून दोन्ही आरोपी मृत युवती डॉक्टरच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आल्याचे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.
डॉक्टर युवतीच्या मृत्यू प्रकरणात राज्यभरातून रोष व्यक्त होत असताना विविध राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामनाही रंगला आहे. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वीय सहाय्यकांवर गंभीर आरोप झाल्याने त्यांच्या चौकशीची मागणी देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाची माहिती देताना, मृत महिला डॉक्टर आणि आरोपी यांच्यात वारंवार चॅटिंग सुरू होते, असा खळबळजनक दावा पोलीस अधिक्षकांनी केला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल करण्यात आला, तो आत्महत्येचा गुन्हा आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपी सध्या अटकेत आहेत, दोन्ही आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून त्यांचा डीवायएसपी यांच्यामार्फत तपास सुरू आहे. सीडीआर असेल किंवा इतर पुरावे, यामार्फत आरोपीविरुद्ध काय पुरावे मिळतात याचा तपास सध्या सुरू आहे. सध्या प्राथमिक पीएम रिपोर्ट मिळाले असून अंतिम पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आज किंवा उद्या आम्हाला मिळतील. त्याचबरोबर काही फॉरेन्सिक रिपोर्ट देखील लवकरच हाती येतील. त्यानुसार मयत आणि आरोपी यांचे काही नक्की संबंध होते का हे तपासातून समोर येईल, असे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी म्हटले.
सीसीटीव्ही कुठलीही संशयास्पद बाब दिसली नाही
मृत डॉक्टर यांच्या हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले जात आहेत. येथील डीव्हीआर पोलिसांनी घेतला आहे. सीसीटीव्हीमध्ये हॉटेलचे बुकिंग स्वतःहून घेतल्याचे दिसत आहे. कुठलीही संशयास्पद बाब या ठिकाणी दिसली नाही, असेही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.
मृत डॉक्टर आणि आरोपींमध्ये वारंवार चॅटिंग
या प्रकरणाच्या तपासा संदर्भामध्ये आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. गृह विभागाकडून हा तपास पूर्णपणे निष्पक्ष व्हावा, अशा सूचना आम्हाला मिळाल्या आहेत. त्या अनुषंगाने हा तपास पूर्णपणे निष्पक्षपणे सुरू आहे. सध्याचे सीडीआर आणि चॅटिंग समोर आले आहे. त्याच्यातून असे दिसत आहे की, मृत डॉक्टर आणि आरोपी यांच्यामधील वारंवार चॅटिंग सुरू होते. डॉक्टर महिला ही आरोपींच्या संपर्कामध्ये होती, अशी माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिली.
तपासावर कोणाचाही दबाव नाही
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप झाल्याने तपासावर दबाव आहे का असे विचारले असता, डॉक्टर युवतीच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावर कोणाचाही दबाव नाही. गृहमंत्र्याच्या आदेशानुसार हा तपास मी निपक्षपणे सुरू आहे, असे तुषार दोशी यांनी स्पष्ट केले.
आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी
दरम्यान, महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदनेला पोलिसांनी अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
डॉक्टर युवतीने आयसी कमिटीकडे तक्रार केली नव्हती. मात्र पोलीस आणि डॉक्टर यांच्या एकमेकांबद्दल तक्रारी होत्या. आरोपींच्या बाबतीत फिट आणि अनफिट रिपोर्ट देण्यावरून डॉक्टर आणि पोलिसांमध्ये मतभेद होते. आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेने तीन वेळा बदलीच्या बाबतीत विचारणा होऊन देखील फलटणमध्येच काम करेन, यासाठी तिचा आग्रह होता. त्यासाठी विशेष ऑर्डर करून बदली थांबविण्यात आली होती. पोलिसांनी घटनेतील मोबाईलचा सीडीआर काढला आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी डॉक्टर युवती प्रशांत बनकर यांच्या घरी होत्या. यावेळी फोटो काढण्यावरून त्यांच्यात वाद झाला. युवतीचा पीएम रिपोर्ट लवकरात लवकर मिळवा असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच फॉरेन्सिक लॅबचा अहवाल देखील लवकरात लवकर मिळावा यासाठी आदेश दिल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





