Thursday, May 2, 2024
Homeनगरपोलीस निरीक्षक मुकुंद देशमुखांच्या संपत्तीची चौकशी करा

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुखांच्या संपत्तीची चौकशी करा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या संपत्तीची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी मुंबई लाचलुचपत विभागाचे पोलीस महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे केली आहे. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी पुढील कार्यवाहीसाठी सदर तक्रार नाशिकच्या लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांच्याकडे पाठविली आहे.

- Advertisement -

याबाबत अमोल खताळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार घेतला आहे. तेव्हापासून ते संगमनेरातील एका महागड्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी त्यांनी वरिष्ठांकडून घेतलेली नाही. सदर हॉटेलचे भाडे दिवसाला 1700 ते 2500 रुपये आहे. तेव्हा मासिक भाडे 51 हजार रुपये होतात. नियुक्तीपासून ते आत्तापर्यंत सुमारे 8 लाख रुपये निवासासाठी खर्च केले आहेत. एका सामान्य पोलीस निरीक्षकांच्या पगारामध्ये हे परवडणारे नाही. या हॉटेलमध्ये त्यांचा रहिवासाबाबत छायाचित्र तक्रार अर्जासोबत जोडले आहे. तसेच हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज व त्यांच्या मोबाईल लोकेशनवरुन त्यांचे रहिवास सिद्ध होवू शकते याची देखील चौकशी व्हावी, असे खताळ यांनी म्हटले आहे.

यापूर्वी सत्ताधारी राजकीय पक्षाच्या प्रमुखाने शहर पोलीस निरीक्षक देशमुख यांच्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडेही तक्रार केली आहे. शहरात विविध अवैध धंदे सुरु असल्याचे प्रसारमाध्यमांमधून समोर येते आहे. यापूर्वी देखील हॉटेलमध्ये राहण्यावरुन प्रश्न उपस्थित झाले होते.

आपण यासंदर्भात आपल्याकडे तक्रार दाखल करीत असून यानंतर आपल्या जीवितास कोणत्याही स्वरुपाचा धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर असेल, असेही अमोल खताळ यांनी लाचलुचपत विभागाचे पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या