कोतूळ |वार्तहर| Kotul
मुळा धरणाच्या अकोले तालुक्यातील पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने मुळा नदी उगम परिसरात असणारे आंबित धरण काल रविवारी 27 जून रोजी सकाळी ओव्हरफ्लो झाले. आता पिंपळगाव खांड धरणात नवीन पाण्याची आवक सुरू असून 150 दलघफूच्या पुढे 25 टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणाची क्षमता 600 दलघफू आहे. काल पावसाळी वातावरण टिकून होते. पण पावसाचा जोर नव्हता.
घाटघरला 80 मिमी पाऊस
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
भंडारदरा पाणलोटातील घाटघर आणि रतनवाडीत पावसाचा जोर वाढल्याने काल सकाळी संपलेल्या 24 तासात धरणात नव्याने 22 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 2436 दलघफू झाला होता. घाटघर येथे 80, रतनवाडीत 39 मिमी पावसाची नोंद झाली.
गत तीन दिवसांपासून पाणलोटात मान्सून सक्रीय झाला असला तरी पावसाचा वेग फारसा नाही. त्यामुळे आवकही कमी अधिक होत आहे. निळवंडे धरणातही फारशी आवक नसल्याने साठा स्थिर आहे. वाकी पाणलोटात पाऊस होत असल्याने या तलावातही धिम्या गतीने वाढ होत आहे. काल या तलावातील साठा 47.13 दलघफू होता. काल सकाळी संपलेल्या 24 तासांतील पाऊस असा- भंडारदरा 20, निळवंडे 6, आढळा 6, अकोले 13, पांजरे 27, वाकी 16.
कुकडी प्रकल्पात 77 दलघफू नवीन पाणी दाखल
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्प समूह धरण पाणलोटात रविवारी झालेल्या पावसामुळे सोमवारी धरणात नव्याने 77 दलघफू पाणी दाखल झाले होते. काल पावसाचा जोर ओसरला होता. येडगाव धरण पाणलोटात सर्वाधिक 91 मिमी पावसाची नोंद झाली. माणिकडोह 52, वडज 44, पिंपळगाव जोगे 62, डिंभे पाणलोटात 82 मिमी पावसाची नोंद झाली. परिणामी काल सकाळी एकूण पाणीसाठा 1556 दलघफू झाला होता.




