मुंबई | Mumbai
पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत शहरातील दापोडी -फुगेवाडी परिसरातील ८ व्यक्तींचा एकाचवेळी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दापोडी-फुगेवाडीमधील मृत्यूचे तांडव हे विषारी दारुमुळे झाले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी योगेश वानखेडे हा दारू विक्रेता असून, यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह आठ जणांना आतापर्यंत अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा मृत्यू झाला असून, पुण्यातील काळेपडळ भागात तीन तर हडपसर भागात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही विषारी स्पिरिटयुक्त दारू योगेश वानखेडे याने तयार केली होती. ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांमध्ये विकली गेल्याचे समोर आले आहे. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरातील दारू प्राशन केलेल्या काही जणांचा तोंडाला फेस येऊन मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कोणतीही हयगय न करण्याचे आणि कडक कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कथित विषारी दारू बळी प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही शहरांच्या पोलीस आयुक्तांना अत्यंत कठोर कारवाई करण्याचे थेट आदेश दिले आहेत. “या प्रकरणात कोणाचीही गय करू नका, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर अशी कारवाई करा की पुन्हा असा गुन्हा करायला कोणीही धजावणार नाही,” असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “माझे स्वतः दोन्ही शहरांच्या पोलीस आयुक्तांशी सविस्तर बोलणे झाले आहे. ही विषारी दारू नेमकी कुठे तयार केली जात होती, त्या मुख्य केंद्राचा (मॅन्युफॅक्चरिंग युनिट) शोध पोलिसांनी यशस्वीरित्या लावला आहे. या विषारी दारुमध्ये मिथेनॉलसारखा विषारी घटक असल्याची माहिती समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना अतिशय संवेदनशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
घटना अत्यंत गंभीर, संपूर्ण साखळी शोधून कडक कारवाई होणार
याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोक यात असू शकतात. ते शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालं त्याच्या पाठीमागे कोण-कोण आहेत हे पोलीस शोधून काढत आहेत. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दल अॅक्टिव्ह झाले असून दोन्ही विभागांकडून संयुक्त आणि समन्वयाने तपास सुरू करण्यात आला आहे. संशयित बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर आणि निर्मितीच्या ठिकाणांवर पोलिसांनी धडक छापे मारले आहेत.




