शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
राज्य शासनाने राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. मात्र, गुटखा बंदी प्रमाणे प्लास्टिक बंदी ही कागदावर राहिल्याचे चित्र आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे साई मंदिरात हार फुलं सुरु करण्यात आल्याने भाविकांना हार फुलांसाठी देण्यात येणार्या प्लास्टिकच्या पिशव्या थेट साई समाधी मंदिरात जात असल्यामुळे संस्थान प्रशासन व शिर्डी नगरपरिषदेला प्लास्टिक बंदीचा विसर पडला आहे का? असा सवाल पर्यावरणप्रेमी साईभक्तांनी उपस्थित केला आहे.
राज्य शासनाकडून पर्यावरण हानीकारक असलेल्या एकल प्लास्टिक वापरावर 1 जुलै 2022 पासून संपूर्णतः बंदी घातली आहे. तरी देखील प्रत्येक शहरासह गावागावात एकल प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा निर्णय हा गुटखा बंदीप्रमाणे झाल्याचे चित्र शिर्डी शहरात पाहावयास मिळत आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला जाग येईल, तशी अवैध गुटख्यांवर कारवाई केली जाते. त्याप्रमाणे एकल प्लास्टिक बंदीसंदर्भात नगरपरिषदेला जाग येईल, तशी कारवाई सुरू केली जाते. शहरात मोठ्या प्रमाणात साई मंदिरात तसेच आस्थापनांमध्ये सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून आले.
त्यावर आता कुणाचेच लक्ष नसल्याचा प्रकार समोर आला आहे. साई मंदिरात हार फुले सुरु करून फुल उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळाला आहे. मात्र हार फुल विक्रेते दुकानदार भाविकांना प्लास्टिकच्या पिशवीत प्रसाद, हार, फुले घालून देत असल्यामुळे भाविकाकडून ते थेट समाधी मंदिरात पोहचले आहे. याचा विसर साई संस्थान आणि शिर्डी नगरपरिषदेला पडला असून प्लास्टिकबंदी कायद्याची पायमल्ली होत आहे. शिर्डी नगरपरिषदेने स्वच्छता अभियानात दोनवेळा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकवला आहे. मात्र शहरातील प्लास्टिक बंदीची कारवाई का थांबवण्यात आली यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सदरची कारवाई तातडीने सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ व साईभक्तांनी केली आहे.