पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डी शहरातील भर व्यापारी पेठेत प्लॉट विक्रीतून मिळालेली रक्कम घेऊन जाणार्या दीपक सुधाकर येळाई (वय 62, रा. क्रांती चौक, पाथर्डी) यांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. घटनेच्या बारा दिवसांनंतर चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, या गुन्ह्याच्या तपासात पाथर्डीपासून सोनई आणि दिल्लीपर्यंतचे धागेदोरे समोर आले आहेत. प्लॉट खरेदी-विक्री व्यवहारातील मध्यस्थ साहिल खान याच्यासह इतर संशयितांची नावे तपासात पुढे आली आहेत. पोलिसांनी 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
1 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी दीपक येळाई हे प्लॉट विक्रीतून मिळालेली रक्कम घेऊन जात असताना दोन विनाक्रमांकाच्या मोटारसायकलींवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवले. लोखंडी सुर्याने त्यांच्या हातावर वार करून कुकरीचा धाक दाखवण्यात आला आणि पैशांची बॅग जबरदस्तीने चोरून नेण्यात आली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गजबजलेल्या व्यापारी पेठेत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. गुन्ह्याचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव व पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, अतुल लोटके, रणजीत जाधव, बाळासाहेब खेडकर, योगेश कर्डिले, किशोर शिरसाठ आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने तपास केला.12 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुदस्सर उर्फ मुज्जु सादिक सय्यद (रा. एडके कॉलनी, पाथर्डी) याला माणिकदौंडी रोडवरील एम.एम. निर्हाळी हायस्कूलजवळून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर सुरज संतोष वडागळे (रा. बेल्हेकरवाडी रोड, सोनई), आकाश शरद हराळे (रा. सोनई, ता. नेवासा) आणि इसाक पापा शेख (रा. दुलेचांदगाव, ता. पाथर्डी) यांना ताब्यात घेण्यात आले. या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांच्या तपासात साहिल खान (रा. तिसगाव, ता. पाथर्डी), राजू ठाकूर (पूर्ण नाव माहीत नाही, रा. दिल्ली), विशाल ब्राम्हणे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. शनिशिंगणापूर), सोमनाथ रमेश काळोखे (रा. पाथर्डी) आणि राजू ठाकूर याचे नाव-पत्ता माहीत नसलेले दोन मित्र यांच्यासह इतर व्यक्तींची नावे समोर आली आहेत. यातील काही जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.प्लॉट विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थी करणार्या साहिल खान याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. व्यवहाराची माहिती आरोपींपर्यंत कशी पोहोचली, लुटीचे नियोजन कोणी केले आणि दिल्लीतील संशयिताची भूमिका काय होती, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
चोरीच्या रकमेतील दोन लाख रुपये स्वतःच्या वाट्याला आल्याचे मुदस्सर याने सांगितले. त्यापैकी 30 हजार रुपये खर्च केले असून उर्वरित रक्कम घरी ठेवल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार पंचांसमक्ष एक लाख 70 हजार रुपये रोख, एक पिशवी आणि दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण एक लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या गुन्ह्याचा पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे करीत आहेत. या कारवाईमुळे व्यापारी आणि नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी फरार संशयितांना पकडणे आणि गुन्ह्याच्या संपूर्ण कटाचा उलगडा करणे हे पोलिसांसमोरील पुढील आव्हान आहे.
मोक्का कारवाई होणार का ?
मुदस्सर उर्फ मुज्जु सादिक सय्यद आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत का, याची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे. या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई होणार का, याबाबत चर्चा सुरू आहे.




