नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळमधील एर्नाकुलम येथे सभा पार पडली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धावर भाष्य केले. पश्चिम आशियात सुरू असलेले युद्ध आपल्या सर्वांसाठी चिंताजनक आहे, असे मोदी म्हणाले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश आपल्या मंत्र्यांना दिले आहेत. सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन देशात घबराट पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांवर कडक नजर ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या चर्चेत पंतप्रधानांनी मंत्र्यांना देशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले. विशेषतः सोशल मीडियावर चुकीची माहिती किंवा अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याला तत्काळ उत्तर देण्याचे अथवा कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. तसेच विरोधकांकडून होणाऱ्या प्रचाराला ठोस आणि आक्रमक पद्धतीने प्रत्युत्तर देण्यासही सांगितले.
यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काल बुधवारी तामिळनाडूमध्ये एका सभेला संबोधित केले. या परिस्थितीने घाबरून जाऊ नका. आमचे सरकार लोकहित जपेल असे आश्वासन त्यांनी दिले. पेट्रोलियम क्षेत्राचा विस्तार होणे महत्वाचे आहे, सध्या उद्भवलेल्या परिस्थितीने पुन्हा एकदा दाखवून दिले की आपल्याला आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
जागतिक संकटात काँग्रेसला राजकारण सूचत आहे
काँग्रेस व डाव्या पक्षांकडून आत्मनिर्भर भारत उपक्रमाची थट्टा केली जात आहे, असा आरोप मोदींनी केला. तसेच केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेस व डाव्या पक्षांना लक्ष्य केले. “आपले लाखो बंधु-भगिनी तिकडे (पश्चिम आशिया) काम करतात. आज भारतात भाजपा-एनडीएचे सरकार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा भारतीय नागरिक संकटात अडकले, तेव्हा आम्ही त्यांच्या मदतीसाठी पूर्ण शक्तीने धावून गेलो. आज उद्भवलेल्या जागतिक संकटात काँग्रेसला राजकारण सूचत आहे. परिस्थिती आणखी बिकट व्हावी म्हणून काँग्रेस जाणीवपूर्वक चिथावणी देणारे व बेजबाबदार विधाने करत आहे. मोदींवर रिल्स बनवून टीका करण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आहे. हा त्यांचा खेळ आहे.” , असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
फारुक अब्दुल्लांवर गोळी झाडणाऱ्याचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, दैव बलवत्तर म्हणून…
आत्मनिर्भर भारत उपक्रमाची काँग्रेस आणि डाव्या पक्षांकडून थट्टा
मोदी पुढे म्हणाले, “आत्मनिर्भर भारत उपक्रमाची काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी थट्टा केली आहे. काँग्रेस व डाव्या पक्षांनी सरकार चालवताना विदेशी शक्तींवर भारताला अवलंबून राहावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण केली होती. आता ते एकत्र मिळून अफवा पसरवत आहेत. युद्धासारख्या परिस्थितीत काँग्रेस व डावे पक्ष त्यांची सगळी शक्ती वापरून देशात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. काँग्रेस व डाव्या पक्षांकडून होणाऱ्या अपप्रचाराला बळी पडू नका.”, असे आवाहन मोदींनी केले.
भारताची तयारी अधिक सक्षम
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्याची परिस्थिती केवळ एका देशापुरती मर्यादित नसून, संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होत आहे. मात्र संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी भारताची तयारी मजबूत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, शेजारील देशांशी तुलना करता भारताची तयारी अधिक सक्षम आणि प्रभावी आहे.
नागरिकांनी घाबरू नये
दरम्यान, इराणमधील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असून, देशातील काही भागांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या उपलब्धतेवर ताण जाणवत आहे. अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी तमिळनाडूमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना घाबरू नये, असे आवाहन केले. त्यांनी सरकार जनहिताचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सांगितले.





