Friday, March 13, 2026
HomeनगरAhilyanagar : पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रविवारी

Ahilyanagar : पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रविवारी

जिल्हा पोलीस दलातील 73 पदांसाठी 934 उमेदवार पात्र

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील 73 रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणून लेखी परीक्षा येत्या रविवारी (15 मार्च) आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी मैदानी चाचणीतून एकूण 934 उमेदवार पात्र ठरले असून ही परीक्षा अहिल्यानगर शहरातील न्यू आर्ट्स कॉलेज येथे सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे (हॉल तिकिट) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परीक्षेची वेळ सकाळी 11 वाजता असली तरी उमेदवारांनी सकाळी 9:30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच सकाळी 10:30 नंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस घटकाच्या आस्थापनेवरील 73 रिक्त पदांसाठी 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान पोलीस मुख्यालय येथे उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या प्रक्रियेसाठी एकूण चार हजार 148 उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार 497 उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणीत सहभाग नोंदविला.

मैदानी चाचणीत सहभागी झालेल्या उमेदवारांपैकी 1 हजार 380 उमेदवारांना 25 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले. शासनाच्या 1:10 या नियमाप्रमाणे उपलब्ध 73 पदांच्या प्रमाणात 934 उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी तात्पुरते पात्र घोषित करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांची यादी जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. या यादीसंदर्भात काही आक्षेप किंवा हरकती असल्यास उमेदवारांनी 3 मार्च पर्यंत अधिकृत ईमेलवर लेखी स्वरूपात हरकती सादर करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले होते. दरम्यान, लेखी परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 12:30 या वेळेत पार पडणार असून परीक्षेचा कालावधी दीड तासाचा असेल. एकूण 100 गुणांची ही परीक्षा असणार आहे.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेसाठी आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे.

ताज्या बातम्या