नाशिक । प्रतिनिधी Nashik
संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर शहर पोलिसांनी सलग आठवडाभर कारवाई केली. यात वाहनचालकांचा देखील समावेश आहे. सात दिवसातच पोलिसांनी ६ हजार नागरिकांवर ही कारवाई केली आहे.
शहरात करोनाचा प्रभाव धोकादायक पद्धतीने वाढतो आहे. यामुळे १ जुलैपासून लॉकडाऊन शिथिलता दिली असली तरी नियम कडक करण्यात आले आहेत. याचे उल्लंघन करणारांवर शहर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. बाजारपेठ सुरळीत करण्याचा प्रयत्न पुन्हा थांबवावा लागला. अस्थापनांच्या वेळा १० ते ५ अशी करण्यात आली असून, सांयकाळी ७ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी नियम कडक करण्यात आले आहे. या नियमांकडे दुर्लक्ष करणार्यांवर शहरातील सर्व १३ पोलिस ठाण्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
मास्क न वापर करणार्या २ हजार ४५ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरात मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. करोना रोखण्यात मास्कचा हातभार लागतो. दुर्दैवाने नागरिक याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र शहरात दिसून येते आहे. शहर पोलिसांनी७ जुलै रोजी दिवसभरात मास्कचा वापर न करणार्या तब्बल ६०५ नागरिकांवर कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला. २३ मार्चपासून आतापर्यंत अशा प्रकारे ६ हजार २०५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
दुचाकी तसेच चार चाकी वाहन वापरण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहे. मात्र, वाहनचालक हे नियम डावलतात. डबल शीट प्रवास केल्या प्रकरणी ३९५ तर, विनाकारण फिरणार्या पाच कारचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. नाईट पॅट्रोलिंग, नाकाबंदी कडक असून, रात्रीच्या वेळी संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याने थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असून, मास्कचा, वाहनांचा योग्य पद्धतीने वापर करणे महत्त्वाचे असल्याचे उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी स्पष्ट केले आहे.
दुकानचालकांवर कारवाई
१ जुलैपासून नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून पाच वाजता अस्थापन बंद न करणार्या ३४ अस्थापना चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. तर, संचारबंदी नियमाचे उल्लंघन करणार्या ४८ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मागील सात दिवसात एकत्रीतपणे ६ हजारांहून अधिक केसेस झाल्या आहेत.




