Monday, April 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCentral Election Commission : अखेर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला; केंद्रीय निवडणूक...

Central Election Commission : अखेर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी (Central Election Commission) आज (रविवारी) पत्रकार परिषद घेत आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पदुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (Election) घोषणा केली. त्यानुसार आसाम आणि केरळमध्ये ९ एप्रिलला मतदान होणार असून, या दोन्ही राज्यांत एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

- Advertisement -

तसेच पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिलला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिलला होणार आहे. तर तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, पदुचेरीमध्ये ९ एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होतील, असे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Central Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; पाच राज्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार?

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ७ मे, आसाम विधानसभेचा २० मे, केरळचा २३ मे,तामिळनाडूचा १० मे आणि पुद्दुचेरी विधानसभेचाचा कार्यकाळ १५ मे रोजी संपत आहे. त्यानंतर आज या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.

बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूकीची तारीखही निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत २३ एप्रिलला मतदान होणार आहे. तर ४ मे रोजी निकाल जाहीर होईल, असे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.

उमेदवार कोण?

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. कायद्यानुसार एखाद्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून ६ महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात असून, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तर राहुरी विधानसभा मतदारसंघातून दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे उमेदवार असू शकतात. त्यामुळे आता या जागेवर भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जारी :  ३० मार्च २०२६
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : ०६ एप्रिल २०२६
अर्जांची छाननी : ७ एप्रिल २०२६
अर्ज मागे घेण्याची मुदत : ०९ एप्रिल २०२६
मतदानाची तारीख : २३ एप्रिल २०२६
मतमोजणी : ४ मे २०२६
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : ०६ मे २०२६

पाच राज्यांत एकूण मतदार किती?

पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि केरळ या पाच राज्यांतील मतदारांची संख्या एकूण १७.४ कोटी इतकी असून, ८२४ एकूण विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी एकूण मतदान केंद्रांची संख्या २.१९ लाख इतकी असणार आहे. तर २५ लाख एकूण कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहितीही निवडणूक आयोगाने दिली.

कोणत्या राज्यात किती मतदार?

पश्चिम बंगाल

एकूण मतदार : सुमारे ६.४४ कोटी
पुरुष : ३.२८ कोटी
महिला : ३.१६ कोटी
तृतीयपंथी : १,१५२

तामिळनाडू

एकूण मतदार : सुमारे ५.६७ कोटी
पुरुष : २.७७ कोटी
महिला : २.८९ कोटी
तृतीयपंथी : ७,६१७

केरळ

एकूण मतदार : सुमारे २.७० कोटी
पुरुष : १.३१ कोटी
महिला : १.३८ कोटी
तृतीयपंथी : २७७

आसाम

एकूण मतदार : सुमारे २.५० कोटी
पुरुष : १.२५ कोटी
महिला : १.२५ कोटी
तृतीयपंथी : ३४३

पुदुच्चेरी

एकूण मतदार : सुमारे ९.४४ लाख
पुरुष : ४.४३ लाख
महिला : ५ लाख
तृतीयपंथी : १३९

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील (Firing Case) संशयितांना अखेर दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील...