नाशिक | फारुख पठाण | Nashik
नाशिक आणि रायगड (Nashik and Raigad) जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांवरून महायुती सरकारमध्ये (Mahayuti Government) वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या स्थगिती दिलेली आहे. तर आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी कामे रखडल्याने तसेच मित्र पक्ष असलेल्या महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शांत करण्यासाठी आता नवीन पर्यायांची चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार नाशिकचे पालकमंत्रिपद आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आपल्याकडे घेणार असल्याचे समजते.
२०२६ ते २८ या काळात नाशिकमध्ये भव्य स्वरुपात सिंहस्थ कुंभमेळ्याचे (Simhastha Kumbh Mela) आयोजन होणार आहे. विभागीय आयुक्तांच्या देखरेखीत नियोजन सुरू झालेले आहे. एकट्या मनपाचाच सुमारे ७ हजार कोटींचा आराखडा झाला असून, जिल्ह्याचा वेगळा आराखडा आहे. मात्र, पालकमंत्री नसल्याने मोठ्या प्रमाणात कामे रखडल्याचे चित्र आहे. नाशिकचे पालकमंत्री म्हणून भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती झाली होती. मात्र शिवसेना व राष्ट्रवादीने देखील नाशिकवर दावा केल्याने या वादामुळे राज्य सरकारने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे.
दरम्यान, या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न होत असतांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच नाशिकच्या पालकमंत्रिपदाची (Guardianship) जबाबदारी जाणार असल्याचे समजते, आगामी कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या दृष्टीने आणि राजकीय वाद टाळण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. तथापि, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
असा होणार फायदा
मुख्यमंत्री नाशिकचे पालकमंत्री झाले तर त्याचा राजकीय (Political) तसेच प्रशासकीय दृष्टिकोन नाशिकच्या विकासासाठी चांगला परिणाम होणार, तर कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय लवकर घेता येणार आहेत. त्याचप्रमाणे निधीची कमी देखील राहणार नाही. मुख्यमंत्री पालकमंत्री झाले तर कुंभमेळ्याची तयारी अधिक प्रभावी आणि वेगवान होण्याची शक्यता आहे. निधी मंजुरी, पायाभूत सुविधा, सुरक्षाव्यवस्था आदींवर थेट मुख्यमंत्री लक्ष ठेवू शकतात. नाशिकच्या विकास प्रकल्पांना वेग येईल. मुंबई-नाशिक समृद्धी महामार्ग, मेट्रो प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना यांसारख्या महत्वाच्या प्रकल्पांना प्राधान्याने चालना मिळेल.
पद भाजपकडेच राहणार
नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी ७ आमदार राष्ट्रवादीचे असून दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत तर पाच आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. राष्ट्रवादीला दोन कॅबिनेट तर शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे, मात्र पाच आमदार असलेल्या भाजपने (BJP) जिल्ह्यात मंत्रिपद घेतलेले नाही. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजप आमदारच बसणार आहे. गिरीश महाजन ऐवजी जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री झाले तरी पालकमंत्री पद भाजपकडेच राहणार हेही निश्चित आहे.