नवी दिल्ली | New Delhi
पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तनानंतर राजकीय संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच सोनारपूर येथे तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्यावर हल्ला (Attack) झाल्याची घटना घडली आहे. निदर्शकांनी त्यांचा मार्ग अडवत अंडी आणि दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत त्यांना सुरक्षित बाहेर काढले. ही घटना सोनारपूरमधील कमराबाद परिसरात शनिवारी सायंकाळी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक बॅनर्जी हे टीएमसीच्या (TMC) एका कार्यकर्त्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते परिसरात पोहोचले असता, काही कार्यकर्ते आधीपासूनच तेथे जमले होते. यावेळी अभिषेक हे घटनास्थळी पोहोचताच त्यांच्या वाहनावर अंड्यांचा मारा करण्यात आला. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून त्यांनी कार रस्त्यात सोडून मोटारसायकलद्वारे पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पीडित कार्यकर्त्याच्या घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर त्यांना रोखण्यात आले. यावेळी काही लोकांकडून घोषणाबाजी करण्यात आली तसेच रस्त्यावर मोटारसायकली टाकून मार्ग अडवण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप केला जात आहे. संतप्त जमावाकडून दगड आणि अंडी फेकण्यात आल्यानंतर पोलिसांनी अभिषेक बॅनर्जी यांना हेल्मेट घालून गर्दीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
स्थानिकांचा संताप का?
काही स्थानिक रहिवाशांनी परिसरातील खराब रस्ते, पाणी साचण्याची समस्या आणि अपुरा पाणीपुरवठा याबाबत नाराजी व्यक्त केली. “आम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही. अनेकदा तक्रारी करूनही मूलभूत समस्या कायम आहेत,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.
टीएमसीचा भाजपावर आरोप
घटनेनंतर अभिषेक बॅनर्जी यांनी हा हल्ला “भाजपा प्रायोजित” असल्याचा आरोप केला. “माझी अवस्था तुम्ही पाहू शकता. हा लोकशाहीचा नमुना आहे. येथे पुरेसा बंदोबस्तही नव्हता,” असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, या आरोपांवर भाजपाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.




