नाशिक | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दिग्गज नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशावरून आणि दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात लिहिलेल्या एका लेखात विलिनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडेच जाणार होते, असा दावा केला आहे. तसेच अजित पवार विलिनीकरणाची अधिकृत घोषणा १२ फेब्रुवारीला करणार होते, असे शरद पवारांच्या पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचे बघायला मिळत आहे. याच विलिनीकरणाच्या चर्चांवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, “मला हे कळत नाही की रोज विलिनीकरणाची चर्चा का होत आहे. विलिनीकरण आजही करता येईल. एक महिन्याने, दोन महिन्याने करता येईल. घाई करण्याचे कारण काय आहे? सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर आता लवकरच आम्ही त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करणार आहोत. यानंतर पक्षातील जे प्रमुख लोक आहेत ते विलिनीकरणाबाबतची चर्चा करण्यासाठी ज्या नेत्यांना बोलावतील त्यांच्यासोबत चर्चा होईल. आता नवीन कॅप्टन आल्या आहेत. त्यांना बसू द्या, काम करुन समजून घेऊ द्या. मग काय करायचे ते बघू, असे मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Narhari Zirwal : “मंत्री झिरवाळ नॉट रिचेबल नव्हे तर जवळच्या…”; आदिवासी संमेलनालाही होते गैरहजर, नेमके आहेत कुठे?
तर राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी विलिनीकरणाबाबत केलेल्या वक्त्यावर बोलतांना भुजबळ म्हणाले की, “मोघमपणे बोलण्यात काही अर्थ नाही. आता नवीन कॅप्टन नेमले आहेत ते बघतील. आमदारांची मिटिंग घेतील. हा म्हणतो, तो म्हणतो म्हणून घाई का करत आहात? तीन-चार दिवसात शपथ घेतल्यानंतर घाई केली. मग, पहिल्या दिवसापासून विलीनिकरणाची चर्चा सुरु आहे, ती घाई नाही का? असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. तसेच पक्ष संघटना सगळे मिळून तयार होते, पक्ष बनतो. पक्ष म्हणजे बोर्ड आहे का? ऑफिस (Office) आहे का?. तिथे काम करणारे कार्यकर्ते मिळून संघटना, पक्ष तयार होतो. ते सगळे बसून विचार करतील, असंही त्यांनी म्हटले.





