मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधिमंडळाच्या अधिवेशनात मोबाईलवर (Mobile) रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ समोर आणला होता. त्यामुळे कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यामुळे कोकाटे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी होणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अजित पवारांनी त्यांना पुन्हा अभय दिल्याचे दिसून आले.
काल (मंगळवारी) मंत्रिमंडळ बैठकीआधी (Cabinet Meeting) अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची वेगळी बैठक झाली. यावेळी अजित पवारांनी तुमच्यामुळे सरकारची (Goverment) बदनामी होत आहे. बोलताना भान ठेवायला हवे, असे म्हणत त्यांचे कान टोचले. त्यावर कोकाटे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत यापुढे बोलतांना, वागताना काळजी घेईल, असे म्हटले.
दुसरीकडे कोकाटे यांनी रमी गेम (Rummy Game) खेळतानाच्या व्हिडीओवर स्पष्टीकरण देतांना आपण रमी गेम खेळतच नव्हतो, असे म्हटले होते. तसेच व्हिडीओ चौकशीसाठी विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सभापतींना पत्र देईल, असे म्हटले होते. तर अजित पवारांनी या संदर्भात विधिमंडळ प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता हा चौकशी अहवाल समोर आला असून राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे विधिमंडळात किती वेळ रमी गेम खेळत होते, असा दावा करत त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी पोस्ट करत म्हटले की, कृषिमंत्री (Agriculture Minister) सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल आला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री (DCM) यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? असं ते म्हणाले आहेत . तसेच सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना टोला लगावला आहे.
अजितदादांकडून कोकाटेंचा राजीनामा नाहीच!
काल (मंगळवारी) अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अजितदादांनी कोकाटेंना कडक शब्दांत समज दिली. झाले ते खूप झाले. खरेतर तुमचे मंत्रिपदच काढायला हवे; पण आपले ज्येष्ठत्व लक्षात घेऊन आणि यापुढे आपण कुठलेही गैरवर्तन करणार नाही, या अटीवर तुम्हाला तूर्तास मंत्रिपदी कायम ठेवतोय. दर आठ-पंधरा दिवसांनी मला तुमच्या वागण्या-बोलण्यावर नजर ठेवावी लागेल आणि काही चुकीचे आढळले तर मंत्रिपद काढावे लागेल, असे अजित पवार यांनी कोकाटेंना सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांकडून माणिकराव कोकाटे यांना अभय मिळाल्याचे बघायला मिळत आहे.





