
नवी दिल्ली | New Delhi
नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आज (सोमवारी) अत्यंत नाट्यमय वळण मिळाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेला ‘संसद मोर्चा’ पोलिसांनी जंतरमंतरवरच अडवला. यावेळी पोलीस आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र झटापट झाली, ज्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. या कारवाईमुळे दिल्लीत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप दिले आहे.
आंदोलक संसदेकडे जाण्यावर ठाम; पोलिसांचा बळाचा वापर
मिळालेल्या माहितीनुसार, कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी जंतरमंतरवरून संसदेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडून आंदोलक पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना रोखले. आंदोलक मागे हटण्यास तयार नसल्याने अखेर पोलिसांनी जंतरमंतर परिसरातच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला.
इंटरनेट ठप्प, मेट्रो स्टेशन बंद
या आंदोलनाची तीव्रता पाहता प्रशासनाने दिल्लीत कडक पावले उचलली आहेत. जंतरमंतर आणि संसदेच्या परिसरातील सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक मेट्रो स्टेशन्स प्रवाशांसाठी बंद करण्यात आली आहेत. तसेच, आंदोलक आणि नागरिकांमध्ये समन्वय होऊ नये यासाठी संपूर्ण परिसरात मोबाईल जॅमर्स बसवून इंटरनेट सेवा देखील ठप्प करण्यात आली आहे.
विरोधकांची मोठी फळी आंदोलनात सामील
या ‘संसद मार्च’ला विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीचे (AAP) नेते मनीष सिसोदिया, संजय सिंह, आझाद समाज पार्टीचे प्रमुख व खासदार चंद्रशेखर आझाद हे थेट सहभागी झाले आहेत. याशिवाय, प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या पत्नी यांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
वज्र वाहन, वॉटर कॅनन अन् RAF चा फौजफाटा तैनात
गेल्या काही तासांपासून जंतरमंतर आणि लगतच्या परिसरात दिल्ली पोलीस, रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि निमलष्करी दलांचा प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी घटनास्थळी वॉटर कॅनन (पाण्याचे फवारे मारणारे वाहन) आणि दंगल नियंत्रण ‘वज्र’ वाहने तैनात ठेवण्यात आली आहेत.
CCTV बंद केल्याने संशय वाढला; वांगचूक रुग्णालयात दाखल
दरम्यान, रविवारी रात्रीपासून जंतरमंतरवरील पोलिसांच्या हालचालींमुळे आंदोलकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे अचानक बंद करण्यात आले असून, तेथील काही बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. यामुळे पोलिसांकडून मोठ्या बळाचा वापर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर याच आंदोलनात सलग २० दिवस आमरण उपोषणाला बसलेले पर्यावरण शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांना रविवारी पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतले आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. वांगचूक यांच्यानंतर आता अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी जंतरमंतरवर उपोषणाला बसले असून, पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांना येथून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.




