नवी दिल्ली | New Delhi
निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) प्रक्रियेत मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आयोजित या आंदोलनात देशातील २० हून अधिक विरोधी पक्षांचे प्रमुख नेते आणि लाखो नागरिक उपस्थित होते. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली.
ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात जावेच लागेल
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “ही कोणतीही साधी चोरी नसून सामान्य माणसाच्या आवाजाची आणि मताची चोरी आहे. ज्ञानेश कुमार यांनी मतचोरीचा कट रचला असून त्यांना पदावरून पायउतार व्हावेच लागेल आणि या गुन्ह्यासाठी त्यांना तुरुंगात जावेच लागेल.ज्ञानेश कुमार यांच्या कृपेमुळेच नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शाह (Amit Shah) गृहमंत्री बनू शकले, असे म्हटले.
तसेच २०२४ च्या निवडणुकीनंतर साडेतेरा कोटी (सुमारे १५ टक्के) मतदारांची नावे यादीतून बेकायदेशीरपणे वगळण्यात आली, त्यामुळे ती निवडणूकच अवैध होती. ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्यानंतर हा मोर्चा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधातील कायदेशीर कारवाईसाठी वळेल, असा थेट इशाराही राहुल गांधींनी दिला.
मल्लिकार्जुन खर्गे आणि ममता बॅनर्जी यांचा आक्रमक पवित्रा
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर ताशेरे ओढताना, मोदी आज लोकांना विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आजचे केंद्र, बिहार आणि उत्तर प्रदेश सरकार हे सर्व चोरीचे सरकार आहेत. जरी ते अंडरवर्ल्डमध्ये लपले तरी आम्ही त्यांना शोधून आणू आणि सोडणार नाही, असा इशारा दिला. तर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आम्ही लढणार आणि लोकशाही वाचवणार. आमच्या केवळ मतांची नव्हे तर संपूर्ण मतमोजणीची चोरी करण्यात आली आहे, पण आम्ही हरलेलो नाही, तर आम्हाला हरवले गेले आहे, असे म्हटले.
अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्यासह कोण काय म्हणाले?
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचा संदर्भ देत, “जे एकदा उत्तर प्रदेशातून आले होते, ते आता तेथूनच निश्चितपणे जातील. २०२७ मध्ये त्यांचे प्रस्थान निश्चित आहे, अशी टीका केली. तसेच आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी या आंदोलनाचे वर्णन ‘महाभारत’ आणि ‘कुरुक्षेत्र’ असे करत मतचोरांविरुद्धचा लढा तीव्र करण्याचे आवाहन केले. तर सीपीएमचे सरचिटणीस एम. ए. बेबी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनीही संविधानाचे रक्षण करण्यासाठी देशवासीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले.




