Thursday, April 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : राऊतांचे CM फडणवीसांना पत्र; 'या' शिष्टमंडळात सहभागी होण्याची केली...

Sanjay Raut : राऊतांचे CM फडणवीसांना पत्र; ‘या’ शिष्टमंडळात सहभागी होण्याची केली विनंती

मनसेप्रमुख राज ठाकरेही येणार सोबत

मुंबई | Mumbai

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर १४ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Electoral Officer) एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवडणूक आयोगाबरोबर होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे. तसेच या बैठकीला मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

- Advertisement -

याबाबत माहिती देतांना खासदार संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाला (Election Commission) भेटणे ही आता एक औपचारिकता असली, तरी लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवणे अत्यावश्यक आहे. या शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, राज ठाकरे यांच्यासह विविध प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. या बैठकीचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील दिल्याचे राऊत यांनी सांगितले.

तसेच हे राजकारण (Political) नाही, तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. तर १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता बैठकीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सर्व नेते एकत्रितपणे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. निवडणूक आयोग हे संविधानिक पद आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाचा विषय आहे. प्रत्येकाच्या काही समस्या आहेत. भाजपच्या देखील काही समस्या आहेत. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण दिले आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राऊतांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

प्रिय श्री. देवेंद्र फडणवीसजी

जय महाराष्ट्र!

मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा लवकरच घोषीत होतील. जिल्हा परिषदा, नगरपालिका व राज्यांतील महानगर पालिकांचा यात समावेश आहे. अत्यंत महत्वाच्या असलेल्या या निवडणुकांच्या यंत्रणेवर आणि प्रकियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष पध्दतीने संविधानाचे पूर्ण पालन करून व्हाव्यात ही राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका आहे. सध्याच्या निवडणूक प्रकियेबाबत काही शंका नक्कीच आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी एक सर्वपक्षिय शिष्टमंडळ दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. शिष्टमंडळात सहभागी होण्याबाबत श्री. शरद पवार, श्री. उध्दव ठाकरे, श्री. राज ठाकरे, श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना कळविले आहे व त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. माझी आपणास विनंती आहे की या शिष्टमंडळात आपण स्वतः सहभागी होऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रतिष्ठा वाढवावी. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून लोकशाही बळकट व्हावी व निवडणूक यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ व्हावी हीच भावना आहे.

कळावे,

आपला नम्र,

(संजय राऊत)

ताज्या बातम्या

२ मे रोजी जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल

0
पुणे । प्रतिनिधी Pune राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी लेखी परीक्षेचा निकाल , शनिवारी 2 मे...