Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : महापालिकांचं बिगुल वाजलं अन् राऊतांनी टायमिंग साधलं; ठाकरे बंधूंच्या...

Sanjay Raut : महापालिकांचं बिगुल वाजलं अन् राऊतांनी टायमिंग साधलं; ठाकरे बंधूंच्या युतीबाबत केले मोठे विधान

मुंबई | Mumbai

काल (सोमवारी) राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह (Mumbai) राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा कधी होणार? याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन्ही बंधूंच्या युतीबाबत मोठे विधान केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, मुंबईसह (Mumbai) २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या असून, अंगात उत्साह संचारलेला आहे. ही लढाई मराठी माणसाची शेवटची अस्मितेची लढाई आहे. मराठी माणूस कोणत्याही पदावर, अवस्थेत असो, त्याने या लढाईत मुंबई वाचविण्यासाठी उतरायला पाहिजे. आमच्या पाठीमागून वार करा, पैशांचा वापर करा पण आम्ही आमची लढाई लढणार. इतिहासात नोंद राहिली पाहिजे, मराठी माणसाचा एक गट मुंबई मराठी माणसापासून तोडून उद्योगपतींना देण्यासाठी आसूसलेला आहे. शिवसेना, मनसेमधील लोक मराठी माणसाकडे मुंबई राहण्यासाठी शौर्याने धैर्याने लढाईत उतरले हे लोकांना लक्षात राहिलं”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही पोस्टर्स लागले आहेत. मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करण्यासाठी पोस्टर्स लागलेत. त्यात कुठल्याही पक्षाचे नाव नाही. सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्रीत हे पोस्टर काढायला लावले. का तर म्हणे आचारसंहितेचा भंग होत आहे. आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता विरोधी पक्षाला आणि या सरकारच्या लोकांना काय?” असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

तसेच “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या क्षणी एकत्र आले असून, मुंबई , ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे, नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये (NMC) आम्ही एकत्र लढत आहोत. तर इतर ठिकाणी दोन्ही पक्षांचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते निर्णय घेतील. पण ही लढाई २९ महापालिकांपेक्षा मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राची मुख्य लढाई मुंबईसाठी होती. मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी होती. संयुक्त महाराष्ट्राचा लढा १९५६ साली सुरु झाला. त्यासाठी १०६ लोकांनी बलिदान दिलं. त्यामुळे आम्ही मराठी लोकं पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत. पण, ही मुंबई आम्ही अमित शाहांच्या घशात जाऊ देणार नाही”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

रहमान डकैत कोण?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानपरिषदेत बोलतांना उद्धव ठाकरे यांचा रहमान डकैत असा उल्लेख केला होता. त्यावरून संजय राऊत यांनी आज पलटवार केला. ते म्हणाले, या महाराष्ट्राला माहिती आहे की, रहमान डकैत कोण आहे? कोणाला मुंबई विकायची आहे. त्यांना पाठबळ देणारे कोण आहेत. मुंबईचं कराचीतील ल्यारी शहर कोणी केलेला आहे हे अख्खा मुंबईला माहित आहे, असा हल्लाबोल देखील राऊत यांनी केला. तसेच येत्या आठवड्यात मनसे आणि शिवसेना युतीची घोषणा व्हायला हरकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर ते मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अनिल परब देखील उपस्थित आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीबाबतची पुढील वाटचाल आणि निवडणुकीची रणनीती यासंदर्भात राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा मंगळवारी मोर्चा; शासन निर्णय...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाचे उपवर्गीकरण (Sub Categorization) करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवार (दि. २९ सप्टेंबर) रोजी राज्यभरातून पाच लाख...